कट्टरतावादी विचारसरणींकडे वळलेले ८ सहस्रांहून अधिक तरुण-तरुणी यांना सनातन धर्मात परत आणणारे केरळ येथील आचार्यश्री के.आर्. मनोज !

आचार्यश्री के.आर्. मनोज यांनी वर्ष १९९९ मध्ये सद्गुरु श्री शंकर गुरुदेव यांच्या आशीर्वादाने ‘आर्ष विद्या समाजम्’ची स्थापना केली. ‘आर्ष विद्या समाजम्’ ही केरळमधील थिरुवनंतपूरम येथे स्थित एक आध्यात्मिक आणि शैक्षणिक संस्था आहे, जी सनातन धर्माच्या ‘अध्यायन (पद्धतशीर अभ्यास), अनुष्ठान (सराव), प्रचार (प्रोत्साहन), अध्यापन (शिकवणे), संरक्षण’ या पंचकर्तव्यांच्या पद्धतशीर आणि वैज्ञानिक पूर्ततेसाठी प्रयत्नरत आहे. ‘कृण्वन्तो विश्वमार्यम् ।’ अर्थ : ‘सनातन धर्माद्वारे सर्व जगाला महान बनवा’ या उद्देशाने ही संस्था कार्यरत आहे.

आचार्यश्री के.आर्. मनोज

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक

संस्थापक आणि मार्गदर्शक

आर्ष विद्या समाजम्, शिवशक्ति योगविद्या केंद्रम्, मनीषा सांस्कारिक वेदी, विज्ञानभारती विद्याकेंद्रम्, विज्ञानभारती एज्युकेशनल अँड चॅरिटेबल सोसायटी, विज्ञानभारती चॅरिटेबल ट्रस्ट, आर्ष विद्या समाजम् चॅरिटेबल ट्रस्ट, विश्वभारती चॅरिटेबल ट्रस्ट, विज्ञानभारती लर्निंग सेंटर्स, बौद्धिकम् बुक्स अँड पब्लिकेशन्स, आर्ष ग्लोबल मिशन प्रा. लि., साधना शक्ति केंद्रम्, विज्ञानभारती मासिक

आध्यात्मिक पार्श्वभूमी

लहान वयातच आचार्यश्री के.आर्. मनोज यांना त्यांचे गुरु श्री शंकर गुरुदेव, अत्रेय परंपरेतील महा क्रिया योग मार्गाचे अवधूत महासिद्ध यांच्याकडून आध्यात्मिक मार्गाची दीक्षा मिळाली. आचार्यश्री हे गुरूंच्या सतत आध्यात्मिक मार्गदर्शनाखाली राहिले. गुरूंनीच त्यांना ऐतिहासिक क्रांती घडवून आणण्याचे ध्येय दिले. गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आचार्यश्री के.आर्. मनोज यांनी सर्व प्रमुख आर्ष गुरु परंपरा आणि प्रणाली यांची शिकवण आत्मसात केली.

आचार्यश्री यांनी महर्षि अगस्त्य यांच्यापासून चालू झालेल्या परंपरेतून क्रियायोगाचा सरावही केला. ही परंपरा महावतार बाबाजी, श्री लाहिरी महाशय, श्री युक्तेश्वर गिरी महाराज आणि श्री परमहंस योगानंद यांसारख्या गुरूंचीही परंपरा आहे. हिमालयातील सिद्धाश्रम परंपरेतील श्री सच्चिदानंद परमहंस यांनी निवड केलेले श्री निखिलेश्वरानंद परमहंस यांच्याकडून आचार्यश्री मनोज यांना शक्तिपात दीक्षा प्राप्त झाली आहे. आचार्यश्री त्यांच्या लहान वयातच त्यांच्या आईचे मामा श्री बोधानंद सरस्वतीजी यांच्याकडून ‘हठयोग’ शिकले.

श्री सत्यानंद सरस्वती यांनी स्थापन केलेले ‘बिहार स्कूल ऑफ योग’, डॉ. गीतानंद यांचे पाँडिचेरी येथील ‘आंतरराष्ट्रीय योग शिक्षण आणि संशोधन केंद्र’, विष्णुदेवानंद इत्यादींनी स्थापन केलेल्या ‘वेदांत आंतरराष्ट्रीय विद्यापीठा’तून शिवानंद योग या संस्थांमधून योग विद्या अभ्यासक्रमांचा अभ्यासही आचार्यश्री यांनी केला आहे. त्यांचे भारतातील विविध योग, तंत्र आणि वेदांत गुरु अन् आश्रम यांच्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आहेत.

आचार्यश्री के.आर्. मनोज यांनी स्वत:चे जीवन योग विद्या, अध्यात्म विज्ञान, भारतीय संस्कृती आणि विद्यार्थी उत्कृष्टता यांच्या प्रसारासाठी समर्पित केले आहे. त्यांनी मल्याळम् भाषेमध्ये ‘भारत प्रभावम्’ नावाचे पुस्तक लिहिले आहे.

आचार्यश्री के.आर्. मनोज आणि त्यांच्या संस्था यांना मिळालेले पुरस्कार

१. वर्ष २०१९ मध्ये त्यांना हिंदु संसदेच्या आत्मीय सभेच्या वतीने ‘कर्मरत्न पुरस्कार’

२. ‘शाश्वत सनातन प्रतिष्ठान’च्या वतीने वर्ष २०२३ मध्ये ‘धर्माचरण’ श्रेणीतील ‘अरबिंदो सन्मान’

३. एप्रिल २०२४ मध्ये ‘सनातन धर्म परिषदे’कडून ‘स्वामी मृडानंद स्मारक आध्यात्मिक पुरस्कार’

४. ‘अणियुर श्री दुर्गा भगवती क्षेत्रम्’ यांच्याकडून ‘१० वा श्री चट्टम्पी स्वामी श्री नारायण गुरु प्रथम संगम स्मृती पुरस्कार’

५. धर्म जागरणासाठी १९ मे २०२४ या दिवशी पुण्यात दुसरा ‘अक्षय हिंदू पुरस्कार’

६. ‘आट्टिंगल करिचियिल श्री गणेशोत्सव मंदिर ट्रस्ट’ आणि ‘श्री गणेशोत्सव समिती’ यांच्याकडून संयुक्तपणे १४ जुलै २०२४ या दिवशी वर्ष २०२४ चा ‘गुरु श्रेष्ठ पुरस्कार’

७. केरळमधील कोलाथूर येथील ‘गणेश साधना सेवा समिती’द्वारे  ११ फेब्रुवारी २०२५ या दिवशी ‘२०२५ श्री वेळ्ळक्काट्ट गोपाल कुरुप कीर्ती पुरस्कार’

८. इंडियन मार्शल आर्ट्स अकादमीकडून ‘तिसर्‍या डॅन’चा ‘ब्लॅक बेल्ट’ मिळाला.

९. वर्ष २०२३ मध्ये थायलंडमधील बँकॉक येथे झालेल्या तिसर्‍या ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’मध्ये त्यांनी ‘लव्ह जिहाद’पासून हिंदु तरुणांचा बचाव आणि आर्ष विद्या समाजाचे महत्त्व’ या विषयावर भाषण दिले. या कार्यक्रमाच्या समारोप समारंभात स्वामी मित्रानंद यांनी आचार्यश्री मनोज यांच्या ‘लव्ह जिहाद’च्या विरोधातील कार्याची नोंद घेत त्यांचा आणि त्यांच्या गटाचा विशेष सत्कार केला. ‘उत्राटम् तिरुनाल संस्कृती संस्थान’ने त्यांच्या ‘१० व्या उत्राटम् तिरुनाल संस्मरण कार्यक्रमा’त धर्माच्या निःस्वार्थ आणि अतुलनीय सेवेसाठी आचार्य मनोज यांना सन्मानित केले.

१०. ‘आर्ष विद्या समाजम्’ला केरळ क्षेत्र संरक्षण समितीने धर्मरक्षण कार्यात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल ‘माधवजी पुरस्कार २०२४’ने सन्मानित केले आहे.

देशात रामराज्य किंवा सुशासन स्थापित करण्यासाठी चालू असलेले प्रयत्न

‘रामो विग्रहवान् धर्मः ।’ अर्थात् अवतारी पुरुष श्रीराम हे धर्माचे मूर्त स्वरूप आहेत. त्यांचा ‘रामराज्या’चा सिद्धांत सनातन धर्माच्या मूलभूत तत्त्वांवर आधारित आहे. धार्मिक भविष्यासाठी पात्र नेते आणि लोक सिद्ध करण्यासाठी आर्ष विद्या समाजम् सनातन धर्माच्या शिकवणीचा प्रसार प्रत्यक्ष आणि ऑनलाइन वर्ग, सामाजिक माध्यमे या माध्यमांद्वारे करत आहे.

आर्ष विद्या समाजम्’ने सुव्यवस्थित प्रकल्पांद्वारे वर्ष २०४७ पर्यंत संपूर्ण भारतात आणि जगात रामराज्य स्थापित करण्याचे ध्येय ठेवले आहे.

‘एक कथा प्रत्यावर्तनाची – ओ. श्रुति’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ

आचार्यश्री के.आर्. मनोज यांचे उल्लेखनीय कार्य !

आचार्यश्री के.आर्. मनोज यांनी त्यांच्या अद्वितीय आध्यात्मिक मार्गदर्शनाद्वारे लाखो लोकांना ज्ञान दिले आहे. कट्टरतावादी विचारसरणींकडे आकर्षित झालेले ८ सहस्रांहून अधिक तरुण-तरुणी यांना त्यांनी सनातन धर्मात परत आणले आहे. त्यासह समाजात धर्म आणि सांस्कृतिक जागृती करणार्‍या ३० हून अधिक तरुणांना त्यांनी सनातन धर्माचे ‘पूर्णवेळ प्रचारक’ म्हणून प्रशिक्षित केले आहे.

१. ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांपासून तरुण आणि तरुणी यांना वाचवण्यासाठी करत असलेले प्रयत्न

धर्मांतराची प्रकरणे हाताळण्यासाठी आर्ष विद्या समाजाकडून दुहेरी रणनीती अवलंबली जाते.

१ अ. दीर्घकालीन प्रकल्प (शिक्षण आणि प्रतिबंध)

दीर्घकालीन मोहिमेअंतर्गत वेगवेगळ्या वयोगटांसाठी आणि स्तरांसाठी ‘ऑनलाईन’ अन् प्रत्यक्ष अशा दोन्ही पद्धतींनी पद्धतशीर, वैज्ञानिक अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आले आहेत.

१. आध्यात्मिक शास्त्र (सनातन धर्म, अन्य धर्म यांचा तुलनात्मक अभ्यास, अन्य तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र)

२. भारतीय संस्कृती (भारताचा खरा आणि अखंड इतिहास, सांस्कृतिक आणि सामाजिक पैलू, स्वातंत्र्यलढा, प्रमुख व्यक्तीमत्त्वे, चळवळी, समकालीन समस्या आणि त्यांचे निराकरण)

३. आर्ष योग विद्या (षोडश तत्त्व योग विद्या)

४. विद्यार्थी उत्कृष्टता कार्यक्रम

५. सुदर्शनम् (सर्व प्रकारच्या ‘ब्रेनवॉशिंग’ प्रभावांविरुद्ध एक प्रभावी वैचारिक उपाय)

६. मृत्युंजयम् (समग्र आरोग्य आणि कल्याण कार्यक्रम)

७. विद्याज्योती शिष्यवृत्ती कार्यक्रम

हे अभ्यासक्रम समाजात प्रचलित असलेले सर्व अपसमज, प्रश्न आणि खोट्या संकल्पना यांना दूर करतात अन् सनातन धर्माचे खरे ईश्वर दर्शन (तत्त्वज्ञान) आणि जीवन दर्शन (तत्त्वज्ञान) शिकवतात. त्यासह सनातन धर्माचा खरा इतिहास, संस्कृती आणि वारसासुद्धा शिकवला जातो. लोकांना गोंधळात टाकण्यासाठी आणि त्यांचे ‘ब्रेनवॉश’ करण्यासाठी कार्यरत शक्तींद्वारे वापरल्या जाणार्‍या कथा आणि पसरवला जाणारा खोटेपणा व्याख्यानांतून उघड करण्यात आला आहे.

‘सनातन धर्म शिकवण्यासाठी योग्य अभ्यासक्रम आणि प्रणाली यांचा अभाव’ हे हिंदु समाजातील अनेक अंतर्गत आणि बाह्य समस्यांचे मूळ आहे. सनातन धर्मावरील एक व्यापक अभ्यासक्रम, त्याची मूलभूत शब्दावली हे आपला प्राचीन इतिहास आणि वर्तमान समस्या यांच्याविषयी जागरूकता निर्माण करू शकेल. त्यातूनच स्वाभिमानी अन् उत्तरदायी व्यक्ती निर्माण होऊ शकते.

तरुणांना अडकवण्यासाठी इस्लामी शक्ती ज्या अनेक पद्धती वापरतात, त्यापैकी ‘लव्ह जिहाद’ ही एक पद्धत आहे. आमच्या अभ्यासक्रमांद्वारे आम्ही विद्यार्थ्यांचे बौद्धिक आणि नैतिक धैर्य विकसित करून सक्षम करतो. यामुळे तरुणपिढी सर्व आध्यात्मिक आणि तात्त्विक विचारसरणींचे गांभीर्याने परीक्षण करू शकेल आणि ती अनुसरणासारख्या अन् स्वीकारण्यासारख्या आहेत हे ठरवू शकतील. ती विचारसरणी स्वतःसह समाज आणि संपूर्ण मानवता यांच्यासाठी लाभदायी आहे का ? इतिहास आणि वर्तमान घटनांमधील पुरावे, त्याचा स्वतःच्या वर्तमान आणि भविष्यातील जीवनावर, त्यांच्या भावी पिढ्यांवर, राष्ट्रावर आणि एकूण जगावर होणारे परिणाम आम्ही त्यांना या माध्यमातून समजावून सांगतो. अशा पद्धतीने त्यांनी सहस्रो तरुण आणि वृद्ध, महिला आणि पुरुष यांना शिक्षित केले आहे. परिणामस्वरूप धर्मांतर रोखले जाऊन देवाची खरी संकल्पना आणि सनातन धर्माच्या योग्य शिकवण दिली जाईल.

आचार्यश्री के.आर्. मनोज (डावीकडे) यांना वर्ष २०२३ मध्ये ‘धर्माचरण’ श्रेणीतील ‘अरबिंदो सन्मान’ देण्यात आला.

१ आ. अल्पकालीन उपाययोजना

ज्या तरुणांनी आधीच इतर धर्मांत धर्मांतर केले आहे किंवा ज्यांचे विविध प्रकारे ‘ब्रेनवॉशिंग’ झाले आहे, त्यांच्यासाठी आर्ष विद्या समाजम् आध्यात्मिक शास्त्रावर आधारित ‘डी-ब्रेनवॉशिंग’, मतारोपणाला विरोध (अँटीइंडॉक्ट्रिनेशन) / ‘डी-रॅडिकलायझेशन’ (मूलगामी विचारणाधारणा नष्ट करणे) आदी प्रकारचे समुपदेशन प्रदान केले जाते. ही आध्यात्मिक, वैचारिक आणि मानसिक समुपदेशनाची एकत्रित पद्धत आहे. वैचारिक समुपदेशन हे तर्कशास्त्राच्या तत्त्वांनुसार वादविवादावर आधारित असते.

१. सामान्य ज्ञानाचा वापर

२. चर्चा आणि वादविवादांमध्ये सहभागी होण्याचा उत्साह

३. पुरावे मिळाल्यावर सत्य स्वीकारण्याची सचोटी

वरील ३ अटी पूर्ण करणार्‍या कोणत्याही व्यक्तीला सत्याची जाणीव होते, याची निश्चिती आर्ष विद्या समाजम् देतो.

जे लोक प्रेमसंबंधांमुळे धर्मांतर करत आहेत, त्यांना संतुलित भावनिक स्थितीत तार्किक चर्चेद्वारे योग्य निर्णयापर्यंत पोचू शकतील, असे योग्य वातावरण उपलब्ध करून दिले जाते.

आचार्यश्री के.आर्. मनोज यांचा तरुणांसाठी संदेश

आचार्यश्री के.आर्. मनोज

मी प्रत्येक व्यक्तीने सनातन धर्माच्या ५ महान कर्तव्यांचे पालन करण्याचे आवाहन करतो.

अभ्यास : स्वयं अध्याय पद्धतीनुसार आधारित नियोजनबद्धरित्या अभ्यास करा.

अनुष्ठान : कोणत्याही अनैतिकता, गैरवर्तन किंवा दडपशाही विना सनातन धर्माची तत्त्वे (जीवन सिद्धांत), पद्धती (प्रथा) आणि नियम (सूचना) यांचे पालन करा.

प्रचार : लोकांचे सर्व प्रकारचे प्रश्न, शंका आणि भ्रम दूर करून खर्‍या सनातन धर्माचा प्रचार करा.

अध्यापन : एका निश्चित अभ्यासक्रमाच्या आधारे सनातन धर्माचे वैज्ञानिक आणि पद्धतशीर शिक्षण द्या.

संरक्षण : हिंदु धर्म, ज्ञान, संस्कृती, समाज, राष्ट्र आणि जग यांचे सर्व प्रकारच्या आव्हानांपासून रक्षण करा.

आर्ष विद्या समाजम् त्याच्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांची शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि आध्यात्मिक कौशल्ये, प्रतिभा, क्षमता अन् बळ वाढवण्यास साहाय्य होईल अन् त्यांचा कमकुवतपणा, भीती, असुरक्षितता यांवर मात करण्यासाठी आदर्श मानव बनवण्यासाठी प्रयत्न करतो. सामाजिक दबावांना सकारात्मक पद्धतीने सामोरे जाण्यासाठी सक्षम बनण्यात येते. याामुळे ते अन्यांसाठी प्रेरणा बनून सनातन धर्माच्या प्रसारात आघाडीची भूमिका बजावू शकतील.

अशा पद्धतीने आर्ष विद्या समाजम्’ने मार्च २०२५ पर्यंत ८ सहस्रांहून अधिक तरुण-तरुणी यांना योग्य मार्गावर आणण्यात यश मिळवले आहे. सिरिया, अफगाणिस्तान आणि इराक येथे ‘मानवी बाँब’ बनलेल्या लोकांना योग्य मार्गावर परत आणून आर्ष विद्या समाजम्’ने सहस्रो कुटुंबांसह समाज, राष्ट्र आणि संपूर्ण जगालाही वाचवले आहे.

आर्ष विद्या समाजम्’ने आतापर्यंत १ सहस्राहून अधिक लोकांमध्ये विविध प्रकारच्या कट्टरपंथी विचारसरणींविरुद्ध लढण्याची क्षमता विकसित केली आहे. सनातन धर्म शिकण्यासाठी आलेलेच नव्हे, तर धर्माला तीव्र विरोध करणारे आणि सनातन धर्माचा त्याग करू इच्छिणारेही आज सनातन धर्माचा झेंडा फडकवत आर्ष विद्या समाजम्’चे प्रमुख योद्धे बनले आहेत. ३० हून अधिक लोक पूर्णवेळ सनातन धर्माचे प्रचारक बनले आहेत. त्यापैकी ४ जणांनी त्यांचे धर्मांतर आणि स्वधर्मातील परतीचा प्रवास या अनुभवांवर पुस्तके लिहिली आहेत.

‘ओरु परवर्तनाथिंते कथा – ओ. श्रुति’, ‘इरुलील निन्नू वेलिचत्तीलेक्कू – चित्रा जी. कृष्णन्’, ‘पुनरजनी – संथी कृष्ण’, ‘जन अथिरा –  एस्. अथिरा’ ही पुस्तके मल्याळम्मध्ये उपलब्ध आहेत. यापैकी ‘स्टोरी ऑफ रिव्हर्जन – ओ. श्रुति’, ‘रिबॉर्न’, ‘आय अथिरा’ ही ३ पुस्तके इंग्रजीत, ‘एक कथा प्रत्यावर्तनाची – ओ. श्रुति’ हे मराठीतील अनुवादित पुस्तक, हिंदी भाषेत ‘एक प्रत्यावर्तन की कहानी – ओ. श्रुति’ आणि कन्नडमधील ‘ओंडु परावर्तनेया कथे – ओ. श्रुति’, ‘पुनराजनि – संथी कृष्ण’ ही पुस्तके उपलब्ध आहेत.

२. समाजाला धर्मशिक्षित करण्यासाठी हाती घेण्यात आलेले उपक्रम

आर्ष विद्या समाजम्’ची सनातन धर्म प्रचाराची एक पद्धत आहे, जिचा उद्देश जगभरात सनातन धर्माचा प्रसार करणे, हा आहे. भारतात आणि जगातील सर्व प्रमुख भाषांद्वारे सनातन धर्माचा प्रचार करण्यासाठी प्रशिक्षित आणि पात्र व्यक्ती सिद्ध करून त्यांची नियुक्ती केली जाते.

प्रत्येक घराला भेट देऊन शैक्षणिक आणि सेवात्मक उपक्रम राबवतील अन् प्रत्येक कुटुंबाला सनातन धर्माची महानता दाखवून देतील, असे धर्मप्रचारक निर्माण करणे, या स्वामी विवेकानंदांच्या संकल्पनेवर आधार मानून धर्मप्रचारक सिद्ध केले जातात. हे धर्मप्रचारक हिंदूंमध्ये ‘धर्मांतराचे धोके आणि त्याचे दुष्परिणाम अन् निर्माण करण्यात येणारा मानसिक प्रभाव’ यांविषयी जागृती निर्माण करून सावध करतात. विविध भाषांमधील ‘ऑनलाईन’ आणि प्रत्यक्ष पद्धतीने सर्व अभ्यासक्रमांच्या प्रचाराद्वारे जगभरात सनातन धर्माचा प्रचार करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

३. हिंदूंना धार्मिक शिक्षणासह स्वसंरक्षण किंवा अन्य कौशल्ये शिकवणे

स्वसंरक्षण प्रशिक्षण हा आर्ष विद्या समाजम्च्या अभ्यासक्रमाचा आणि दैनंदिन दिनचर्येचा एक आवश्यक भाग आहे. सर्व विद्यार्थी आणि शिक्षक, महिला-पुरुष, शारीरिक आणि मानसिक आरोग्य अन् स्वसंरक्षण यांसाठी प्रशिक्षित आहेत. त्यात पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही ‘मार्शल आर्ट्स’चा समावेश आहे.

– आचार्यश्री के.आर्. मनोज

संपादकीय भूमिका

तरुण पिढीचे बौद्धिक आणि नैतिक धैर्य विकसित केल्यासच ती सर्व प्रकारच्या संकटांचा सामना करू शकते !