‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !

पणजी, ८ जून (वार्ता.) – कुंकळ्ळी येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’  (एन्.आय.टी.) गोवा येथे नोकरीसाठी गोव्याबाहेरील उमेदवारांची निवड झाल्याची तक्रार आहे. यामुळे येथील नोकरभरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नुकतीच देहली भेटीच्या वेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे ‘एन्.आय.टी.’ गोवा येथील नोकरभरती संबंधीचे सूत्र उपस्थित केले होते. या नोकरभरती प्रक्रियेत पात्र गोमंतकीय उमेदवारांना संधी मिळावी आणि प्रक्रियेत पारदर्शकता रहावी, यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘गोव्यातील पात्र उमेदवारांना रोजगाराच्या संधींपासून वंचित रहावे लागू नये, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. नोकरभरती प्रक्रियेचा आढावा पूर्ण होईपर्यंत ही प्रक्रिया तात्पुरती स्थगित राहील. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.’’