सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची लूट तात्काळ थांबवा !

जिल्हा परिषद सदस्य रूपेश पावसकर यांची मागणी

प्रतिकात्मक चित्र

कुडाळ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही शासकीय आणि खासगी शाळांमध्ये वह्या, पुस्तके आदी शैक्षणिक साहित्याची विद्यार्थ्यांना नियमबाह्य पद्धतीने विक्री केली जात आहे. त्यासाठी पालकांकडून भरमसाठ शुल्क वसूल केले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ही मनमानी लूट थांबवण्यात यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सदस्य रूपेश पावसकर यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकार्‍यांना पत्र पाठवून केली आहे.

एका संस्थेने शाळांमधून चालणार्‍या या गैरप्रकारांविषयी निवेदन देऊन पावसकर यांचे लक्ष वेधले. त्यानंतर पावसकर यांनी तात्काळ शिक्षणाधिकार्‍यांना पत्र पाठवले.

‘शाळा आणि महाविद्यालये चालवणार्‍या काही संस्थांकडून चालू असलेले हे प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. विद्यार्थी आणि पालक यांच्यावर होणारा कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही. शाळांनी ही लूट तात्काळ थांबवावी, अन्यथा जिल्हा परिषदेच्या सभेत हा विषय उपस्थित करून संबंधित शाळांच्या व्यवस्थापनावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यास भाग पाडू’, अशी चेतावणी पावसकर यांनी या पत्राद्वारे दिली आहे.