गोव्यातील समुद्रकिनार्‍यांवरील अवैध गोष्टींवर पाळत ठेवण्यासाठी पुढील पर्यटन हंगामात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित होईल ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे

पर्यटनमंत्री रोहन खंवटे

पणजी, ८ जून (वार्ता.) – गोव्यातील समुद्रकिनार्‍यांवर होणारा कचरा, दलालांचा वावर आणि इतर अवैध गोष्टी यांवर पाळत ठेवण्यासाठी पुढील पर्यटन हंगामात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित केली जाईल, अशी घोषणा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी गोव्यातील शॅकमालक संघटनांसमवेत झालेल्या बैठकीनंतर दिली.

ते पुढे म्हणाले, ‘‘समुद्रकिनार्‍यांवरील सुरक्षा, स्वच्छता आणि इतर गोष्टी सुरळीत करण्यासाठी उत्तर अन् दक्षिण गोव्यातील समुद्रकिनार्‍यांवर ड्रोन यंत्रणा बसवली जाईल. ही यंत्रणा ‘बीच व्हिजिल ॲप’शी जोडली जाईल आणि ‘बीच व्हिजिल ॲप’ ड्रोनमधील सर्व माहिती एकत्र करून संबंधित अधिकार्‍याला पाठवल्यानंतर त्याच्या वतीने आवश्यक तेथे कारवाई करण्याचे निर्देश दिले जातील. त्यामुळे नियमांचे योग्य पालन सुनिश्चित होईल. समुद्रकिनार्‍यावर कचरा असल्यास संबंधित कंत्राटदाराला आणि दलाल दिसल्यास पोलीस यांना माहिती मिळेल.’’

गोव्यातील विविध शॅकमालक संघटनांनी पर्यटन भवन पणजी येथे पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि पर्यटन खात्याचे संचालक केदार नाईक यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

शॅक धोरणाला १ वर्षाची मुदतवाढ

सध्या अस्तित्वात असलेल्या शॅक धोरणाच्या अंर्तगत समुद्रकिनार्‍यावरील शॅक व्यावसायिकांना ३ वर्षांसाठी दिलेली लीज (दीर्घ मुदतीसाठी शॅक भाड्याने देण्याविषयी कायदेशीर करार) यावर्षी संपत आहे. शॅकमालकांच्या मागणीवरून याविषयी नवीन धोरण कार्यवाहीत न आणता अस्तित्वात असलेल्या धोरणाच्या अंतर्गत १ वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय पर्यटन खात्याने घेतला आहे.