थोडक्यात महत्त्वाचे : ०९.०६.२०२६

महापौरांच्या आदेशाने ‘स्केट पार्क’ची सुधारणा !

मुंबई – हिंदमाता उड्डाणपुलाखालील ‘स्केट पार्क’ला भेट देऊन मुंबईच्या महापौर सौ. रितू तावडे यांनी त्याच्या दुरुस्तीच्या सूचना दिल्या. त्याच्या दुरवस्थेविषयीचा व्हिडिओ मुंबई महापालिकेला ‘टॅग’ करण्यात आला होता. स्वच्छता, वृक्षारोपण, रंगरंगोटी, प्रकाश व्यवस्था, सुरक्षारक्षक आदी सोयी करण्यात आल्या. येथे स्केटिंगसह मल्लखांब यांसह अन्य खेळाच्या सुविधाही आहेत.


टँकर व्यावसायिक संपावर जाणार !

मुंबई – पाण्याचे संकट वाढत असतांना टँकर व्यावसायिक संपावर जाणार आहेत. केंद्रीय भूजल प्राधिकरणाने भूमीतील पाणी उपसा आणि अनुमती यांविषयी नियम घातले आहेत. या नियमांच्या कार्यवाहीमुळे टँकर व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी टँकरने होणार्‍या पाणीपुरवठा होतो, तेथे परिणाम होईल. बांधकाम प्रकल्पांसह झोपडपट्टया आणि व्यावसायिक आस्थापने यांच्यावर परिणाम होईल. महापालिकेची रुग्णालये, अत्यावश्यक यंत्रणा, तसेच अन्य विविध सेवांवरही संपाचा परिणाम होऊ शकतो.

संपादकीय भूमिका : भूमीतील पाणीउपसाही होता कामा नये आणि जनतेला पुरेसे पाणीही मिळाले पाहिजे, अशी उपाययोजना हवी !


कल्याण-डोंबिवली-पाली बस चालू !

पाली (जिल्हा रायगड) – रायगड जिल्ह्यातील पेण जवळील आणि अष्टविनायकांपैकी एक स्थान असलेल्या पाली येथे जाण्यासाठी कल्याण आणि डोंबिवलीवरून बससेवा चालू झाली आहे.


मृणाल गोरे उड्डाणपुलावर खड्डे !

मुंबई – येथील मृणाल गोरे उड्डाणपुलाच्या नुकत्याच झालेल्या उद्घाटनानंतर नागरिक पुलावर गेले असता त्यांना त्यावर असंख्य खड्डेच निदर्शनास आले. २४८ कोटी रुपये खर्चून हा पूल बांधला आहे. पुलावर डांबराचे उखडलेले असंख्य भाग दिसत असल्याने सामाजिक माध्यमांवर याचे व्हिडिओ प्रसारित होत आहेत. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

संपादकीय भूमिका : नागरिकांनो, खड्डे पाहून संताप व्यक्त न करता या दुःस्थितीविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाला जाब विचारा !


अटल सेतूवरून तरुणाची आत्महत्या !

नवी मुंबई – अटल सेतू पुलावरून प्रतीक सुभाष रासकर (वय २८ वर्षे) या तरुणाने समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. उलवे पोलिसांनी समुद्रात शोध घेतला; पण त्याचा मृतदेह सापडला नाही. ७ जूनच्या मध्यरात्री १.२९ वाजता त्याने पुलावरून उडी मारली. तो मूळचा पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रहिवासी होता. कुटुंबियांना ‘बाहेर जेवण्यासाठी जातो’, असे सांगून तो घराबाहेर पडला होता.