महाराष्ट्राच्या कारागृहांतून १९० बंदीवानांना मिळते गीतेतून जीवनाची नवी दृष्टी !

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्या ‘गीता परिवारा’मुळे बंदीवानांच्या आयुष्यात ‘सकारात्मकते’ची पहाट !

प.पू. स्वामी गोविंददेवगिरी महाराज

मुंबई, ३ एप्रिल (वार्ता.) – मागील वर्षभर प.पू. स्वामी गोविंददेव गिरी यांच्या ‘गीता परिवारा’च्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्राच्या केंद्रीय कारागृहात ‘भगवद्गीता संथा वर्ग’ चालू आहेत. महाराजांनी स्थापन केलेल्या गीता परिवारातील स्वयंसेवक या उपक्रमामध्ये प्रशिक्षकाची भूमिका पार पाडत आहेत. गीता परिवाराने आजतागायत १२ लाख साधकांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले गेले आहे. पूर्णपणे निःशुल्क असे हे वर्ग १३ भाषांतून आणि २१ वेळांमध्ये सोमवार ते शुक्रवार प्रतिदिन घेतले जातात. हा वर्ग ४० मिनिटांचा असतो. वर्गामध्ये गीतेच्या श्लोकांचे शुद्ध उच्चारण शिकवले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या उपक्रमासाठी पुढाकार घेतला होता.

सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात डिसेंबर २०२३ मध्ये पहिला वर्ग चालू झाला. आता छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात २५, ठाणे ३५, कोल्हापूर ४५, नाशिक ४०, तळोजा ३५, येरवडा १० बंदीवानांचा समावेश आहे. या कारागृहातील अनुमाने १९० बंदी साधक गीतेचे श्लोक पठण करतात.

या उपक्रमामुळे बंदीवानांच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. अशा उपक्रमांमुळे बंदीवान पुन्हा चांगले आयुष्य जगू शकतील, असा विश्वास कारागृह प्रशासनाने व्यक्त केला आहे.

प्रत्येक अध्यायाचे अर्थ विवेचन ऑनलाईन माध्यमातून केले जाते. सध्या ठाणे, नाशिक, कोल्हापूर आणि तळोजा येथील कारागृहांमध्ये तिसर्‍या टप्प्यांचे प्रशिक्षण पूर्ण होत आले आहे. येथे एकूण १२ अध्यायांचे प्रशिक्षण पूर्ण होत आहे. गीता परिवाराकडून सरळ पठणीय गीतेची पुस्तके साधकांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कारागृह अधिकारी आणि साधक या उपक्रमाविषयी समाधानी आहेत. यासमवेतच येरवडा महिला कारागृहामध्ये प्रत्यक्ष वर्ग घेण्यात आले. पुरुष बंदीवानांसाठी रविवारी उद्बोधनपर व्याख्याने घेतली जात आहेत.

उपक्रमामुळे बंदीवानांना नव्या आयुष्याच्या वळणावर आणण्यास यशस्वी !

शनिवारी आणि रविवारी शिकलेल्या श्लोकांचे विवेचन केले जाते. या वेळी उपस्थित साधकांच्या शंकांचे निरसनही केले जाते. गीता परिवाराचे हे वर्ग ४ टप्प्यांमध्ये चालत आहेत. या ४ टप्प्यांतील वर्गांना ४ स्तर म्हटले जाते. पहिल्या स्तरावर २ अध्याय शिकवले जातात. दुसर्‍या स्तरामध्ये ४ अध्याय शिकवले जातात. तिसर्‍या आणि चौथ्या स्तरमध्ये प्रत्येकी ६ अध्याय शिकवले जातात. या उपक्रमामुळे बंदीवानांच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. हा उपक्रम निश्चितच बंदीवानांना नव्या आयुष्याच्या वळणावर आणण्यास यशस्वी होत आहे. अशा उपक्रमांमुळे बंदीवान आपल्या कुटुंबात परत येऊन एक चांगले आयुष्य जगू शकणार आहेत, असा विश्वास कारागृह प्रशासनाने व्यक्त केला आहे.