खाण मंत्रालय आज गोव्यात भारताचा पहिला उत्खनन परवाना लिलाव चालू करणार

पणजी, १२ मार्च – देशाचा पहिला उत्खनन परवाना लिलाव चालू करण्यासाठी खाण मंत्रालय सज्ज झाले असून भारताच्या अद्याप वापर न झालेल्या महत्त्वाच्या आणि भूगर्भात खोलवर असलेल्या खनिज स्रोतांचे भांडार खुले करण्यासाठी एक महत्त्वाची सुधारणा असलेला हा लिलाव १३ मार्च या दिवशी गोव्यात ‘ताज कन्वेन्शन सेंटर’ येथे होणार आहे. या कार्यक्रमात अतीमहत्त्वाच्या खनिज खंडांच्या पाचव्या टप्प्याविषयी ‘रोड शो’ (रस्त्यावर प्रदर्शन) आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून खनिजांना लक्ष्य करण्यावर आधारित ‘खनिज उत्खनन हॅकेथॉन’, ‘एआय हॅकेथॉन २०२५’चे आयोजनही होणार आहे.

केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी अन् गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या कार्यक्रमाला उपस्थित रहातील.

एम्एम्डीआर् – माईन्स अँड मिनेरल्स (डेव्हलॉपमेंट अँड रेग्युलेशन (खाण आणि खनिज (विकास आणि नियंत्रण)) कायदा, २०२३ लागू झाल्यानंतर कायद्याच्या नवीन सातव्या अनुसूचीमध्ये सूचीबद्ध केलेले लिथियम, तांबे, कोबाल्ट, सोने, चांदी, आर्ईई आणि पीजीईसह अतीमहत्त्वाच्या आणि खोलवर असलेल्या २९ खनिजांच्या उत्खननासाठी खासगी सहभागास अनुमती देण्यासाठी अनुज्ञप्त्या (परवाने) चालू करण्यात आले. सुरळीत कार्यवाहीसाठी केंद्र सरकारने एम्एम्डीआर् कायद्याच्या कलम २० ए अंतर्गत तिच्या अधिकारांचा वापर केला आणि २१.१०.२०२४ या दिवशी उत्खनन परवाना लिलाव प्रक्रिया चालू करण्यासाठी एक आदेश प्रसारित केला.

पहिल्या टप्प्यात मंत्रालय १३ उत्खनन खंडांचा लिलाव करेल. आर्ईई, जस्त, हिरा, तांबे आणि पीजीई यांच्या या खाणी असून त्यांचा लिलाव ऑनलाईन निविदा प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवून केला जाणार आहे. या टप्प्यासाठी निविदा कागदपत्रे एम्एस्टीसी लिलाव प्लॅटफॉर्मवर २० मार्चपासून उपलब्ध होतील.

अधिक तपशिलासाठी : https://www.mstcecommerce.com/auctionhome/mlcln/