अमली पदार्थविरोधी जनप्रबोधनासाठी गीतस्पर्धेत ५१ सहस्र रुपयांचे पारितोषिक ! – चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

‘अमली पदार्थ टास्क फोर्स’च्या बैठकीत (मध्यभागी) पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि इतर अधिकारी

सांगली, १ मार्च (वार्ता.) – व्यसनमुक्ती, नशामुक्तीसाठी अमली पदार्थांच्या विरोधात शाळा-महाविद्यालयात प्रबोधन करण्याच्या हेतूने ‘गीतस्पर्धा’ असून त्यासाठी ५१ सहस्र रुपयांचे पारितोषिक देणार असल्याचे राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी १ मार्च या दिवशी सांगली येथे घोषित केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात आयोजित ‘अमली पदार्थ टास्क फोर्स’च्या चौथ्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी अशोक काकडेंसह सर्व प्रमुख विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, सांगली जिल्हा अमली पदार्थमुक्त करण्यासाठी उपाययोजना करून राज्यात अमली पदार्थविरोधी सांगली जिल्ह्याचे आदर्श ‘मॉडेल’ सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत. आगामी शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये प्रार्थनेनंतर अमली पदार्थविरोधी प्रतिज्ञा, प्रबोधनगीत आणि व्यसनाचे दुष्परिणाम सांगणारे व्याख्यान किंवा चित्रफीत असा उपक्रम राबवण्यात येईल. प्रार्थनेच्या वेळी अमली पदार्थविरोधी प्रबोधन करण्यासाठी चालीसह ३ मिनिटांपर्यंत गीत सादर करण्यासाठी स्पर्धा आयोजित करावी.

गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस चौक्या निर्माण करणार !

चंद्रकांत पाटील म्हणाले की, सांगली, मिरजसारख्या शहरांत गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे १० सहस्र लोकसंख्येच्या परिक्षेत्रासाठी छोट्या चौक्या निर्माण कराव्यात. तिथे गस्त देण्यासाठी ३ पाळ्यांमध्ये गृहरक्षक दलाच्या स्वयंसेवकांना नेमावे. ‘क्राईम टास्क फोर्स’च्या कामकाजाचा आढावा प्रतिआठवड्याला घेणार आहे.