बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी भेंब्रे यांना खडसावले
मडगाव – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिवजयंतीच्या दिवशी पोर्तुगिजांनी केवळ ३ तालुक्यांत प्रारंभी राज्य केले. गोव्यातील ७ तालुक्यांत २५० वर्षे शिवशाही होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचा वर्ष १६८० मध्ये मृत्यू झाल्यानंतर पोर्तुगिजांना संपूर्ण गोवाभर राज्य करणे सुरक्षित वाटू लागले, असे वक्तव्य केले होते. कोकणी साहित्यिक अधिवक्ता उदय भेंब्रे यांनी मुख्यमंत्र्यांचे विधान खोडून काढत गोव्यात छत्रपती शिवाजी महाराजांची राजवट नव्हती, हे सूत्र स्पष्ट करतांना
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही आक्षेपार्ह आणि त्यांची अपकीर्ती होईल, अशी वक्तव्ये त्यांच्या ‘जागोर’ या यू ट्यूब वाहिनीवरून केली. भेंब्रे यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यांवरून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी उदय भेंब्रे यांना २८ फेब्रुवारी या दिवशी खडसावले. त्याचप्रमाणे सत्तरी येथील नामवंत शिवव्याख्याते अधिवक्ता शिवाजी देसाई, प्रा. सुभाष वेलिंगकर आदींनी भेंब्रे यांच्या वक्तव्याचा प्रतिवाद केला आहे.
बजरंग दलाचे कार्यकर्ते २८ फेब्रुवारीच्या रात्री ९ वाजता उदय भेंब्रे यांच्या घरी गेले आणि त्यांनी त्यांना खडसावले. तसेच ‘तुम्ही तुमचे पुरावे घेऊन या आम्हीही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी पुरावे घेऊन येतो’, असे आव्हान दिले.
छत्रपती शिवरायांचे ध्येय आणि उद्दिष्ट हे पोर्तुगीज राजवटीतून गोवा पूर्णपणे मुक्त करण्याचे होते. जर शिवराय जिवंत असते, तर गोवा पोर्तुगिजांच्या तावडीतून तेव्हाच मुक्त झाला असता, असे खणखणीत प्रत्युत्तर गोव्यातील नामवंत शिवव्याख्याते अधिवक्ता शिवाजी देसाई यांनी दिले आहे.
भेंब्रे यांच्या घृणास्पद वृत्तीचा तीव्र निषेध ! – प्रा. सुभाष वेलिंगकर
यापूर्वीही गोव्यातील राष्ट्रवादाशी निगडित विषयांवर सामान्यजनांचा बुद्धीभेद करू पहाणारी विधाने, नेमकी विशिष्ट वेळीच, सुनियोजितपणे मांडण्याच्या कारस्थानात एक मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक अधिवक्ता उदय भेंब्रे हेही सहभागी झालेले पाहून मोठा खेद नि खंत वाटली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या वक्तव्याचा समाचार घेत असतांना अधिवक्ता उदय भेंब्रे यांनी ऐतिहासिक तथ्ये डावलून, गोव्याचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह आणि खोडसाळ विधाने केली. या विधानांचा आणि त्यामागील घृणास्पद वृत्तीचा मी तीव्र निषेध करतो.
‘शिवराय हे पोर्तुगिजांचे मित्र होते. त्यांनी पोर्तुगिजांना हाकलण्याचा कधीच प्रयत्न केला नाही, बार्देश तालुक्यावरील स्वारीच्या वेळी त्यांनी बायका-मुले पळवून नेली आणि ३ निष्पाप पाद्रींना ठार मारले’, ही स्वतःला हवा तसा ऐतिहासिक आधार देण्याचा आव आणत अधिवक्ता भेंब्रे यांनी केलेली विधाने ही केवळ राष्ट्रवादी गोमंतकीय जनतेशीच केलेली प्रतारणा नव्हे, तर इतिहासाशीच केलेला द्रोह आहे. त्यांच्या विधानांमुळे एक चिंताजनक गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे गोव्यातील निखळ राष्ट्रवाद !