देयके थकल्याने ठेकेदारांचे काम बंद आंदोलन
रत्नागिरी – जिल्ह्यात गेले अनेक महिने निधी न आल्याने विकासकामे रखडली असून ठेकेदार अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे त्यांनी काम बंद करत असल्याचे पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहे. परिणामी जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेच्या अंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेची कामे ठप्प झाली आहेत.
केंद्र शासनाच्या ‘घरोघरी नळ’ (हर घर नल) या योजनेतून प्रत्येक कुटुंबाला प्रती माणसी ५५ लिटर पाणी देण्यासाठी जलजीवन मिशन योजना राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात या मोहिमेच्या अंतर्गत १ सहस्र ४३२ पाणीपुरवठा योजनांपैकी केवळ ४३९ योजनांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित योजनांची कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात येत आहे. वर्ष २०२४ च्या अखेरपर्यंत ही कामे पूर्ण करायची होती; मात्र त्या कालावधीत कामे पूर्ण न झाल्याने त्यासाठीचा कालावधी पुन्हा वाढवण्यात आला आहे. असे असले, तरी जिल्ह्यात या कामांसाठी ७० कोटी रुपये निधी आवश्यक आहे. असे असतांना गेले अनेक महिने निधी न आल्याने ठेकेदार अडचणीत सापडल्याने ही कामे रखडली आहेत.