छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित असलेला ‘छावा’ हा हिंदी चित्रपट पुष्कळ गाजत आहे. या चित्रपटाविषयी पुरो(अधो)गामी, कथित इतिहासद्रोही संघटना यांनी काही आरोप करून राळ उठवली आहे. चित्रपटातील काही भागावरून खोटा इतिहास पसरवण्याचा प्रयत्नही केला जात आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांविषयी खरा इतिहास कळावा, यासाठी भारताचार्य आणि धर्मभूषण पू. प्रा. सु.ग. शेवडे यांनी स्वतः संशोधन करून ‘शंभूराजे’ हे छोटेखानी चरित्र प्रसिद्ध केले आहे. या चरित्रातील काही भाग या लेखात देत आहोत, जेणेकरून शंभूभक्तांना छत्रपती संभाजीराजांविषयी खरा इतिहास कळेल.
१. फुटण्याचे राजकारण !
छत्रपती शिवाजी महाराज ६० सहस्र मावळ्यांना सोबत घेऊन कर्नाटक स्वारीवर गेले होते. बंडच करायचे होते, तर अशी सुवर्णसंधी पुनः कधी मिळणार होती ?; पण शंभूराजांनी पत्रव्यवहारांत वेळ काढला आणि महाराज येईपर्यंत मोगलांचे आक्रमण होऊ दिले नाही.

एप्रिल १६७८ मध्ये महाराज दक्षिणेच्या स्वारीवरून परत प्रथम पन्हाळ्यालाच आले. त्या वेळी शंभूराजांनी हा सारा वृत्तांत महाराजांना सांगितला असला पाहिजे. मोगली सेनेत फितुरीच्या मिशाने जाऊन तिचे सामर्थ्य जवळून समजून घेऊन, जमल्यास त्यांना झुलवीत ठेवण्याचा डाव महाराजांचाच असावा; कारण महाराज पावणे दोन वर्षे ६० सहस्र मंडळींसह महाराष्ट्राबाहेर होते. सेनेलाही विश्रांती देणे आवश्यक होते. शिवाय मिळवून आणलेल्या द्रव्याची व्यवस्था लावणे आणि नव्याने शस्त्रास्त्रे सिद्ध करणे, यांसाठी उसंत हवी होती; म्हणून बंडखोरीचा आव आणून दिलेरखानाला मिळण्याची ही कामगिरी महाराजांनीच शंभूराजांवर सोपवली. त्यानंतर महाराज रायगडास गेले. महाराजांच्या मागोमाग शंभूराजे गेले नाहीत; पण महाराजांच्या गुप्त सूचना शंभूराजांना मिळालेल्याच असणार. अखेर महाराजांच्या सूचनेनुसार शंभूराजे मोगलांना जाऊन मिळाले. काही इतिहासकारांचा आक्षेप असा आहे की, शंभूराजांची पत्रे हाच फुटून निघाल्याचा पुरावा आहे. आमचे म्हणणे एवढेच की, जर शंभूराजांना आम्ही म्हणतो, तसे खोटे खोटेच सामील होण्याचे नाटक करून मोगली सेनेचे आक्रमण टाळण्याचा हेतू होता, तर त्यांनी पत्रात काय लिहिले असते ? ‘आम्ही आपल्यात शिरून कारस्थाने करू इच्छितो’, असे लिहिले असते का ?
शिवाजी महाराजांनी विजापूरकरांशी सख्य केले आणि आपली सेना घेऊन प्रदेश जिंकत महाराज जालन्यापर्यंत येऊन पोचले. शंभूराजांनी नाटक उत्तम वठविले. लवकरच योग्य संधी साधून शंभूराजांनी मोगली चाकरीला रामराम ठोकला. ‘या दुष्ट राक्षसांना नामशेष करणे, हेच आपले जिवितकार्य’, असा निश्चय करून ते १.१२.१६७९ ला बाहेर पडले आणि तडक पन्हाळ्याला परतले.
२. शिवरायांचे पत्राचे नाटक !
शिवाजी महाराजांनी त्यांचा सावत्र भाऊ व्यंकोजी यास पत्र लिहून कळविले, ‘….चिरंजीव राजश्री संभाजीराजे मोगलाईत गेले होते. त्याला आणावयाचा उपाय बहुत प्रकारे केला. त्यासही कळो आले की, ये पातशाहीत अगर विजापूरचे अगर भागानगरचे पातशाहीत आपले मनोगतानुसार चालणार नाही. ऐसे जाणोन त्याणी आमचे लिहिण्यावरून स्वार होऊन आले. त्यांची आमची भेट झाली. घरोब्याचे रीतीने जैसे समाधान करू ये तैसे केले.’
आता या पत्रावरून शंभूराजे स्वेच्छेने स्वराज्य सोडून गेले होते, हे स्पष्ट दिसते. शिवाय हे खुद्द महाराजांचे स्वत:चे पत्र आहे. मग ?यावरही आमचे उत्तर असे की, हे पत्र शिवाजी महाराजांचे आहे. शिवाजी महाराज राजकारण धुरंधर होते. त्यांचे राजकारण अत्यंत कुशल होते. ते जिकडे जातो म्हणत, तिकडे जात नसत. गणदेवीला जाण्याचे जाहीर केले आणि सुरतेला गेले. यालाच राजकारण म्हणतात. शिवरायांचे राजकारण हिमनगासारखे होते. त्याचे वर दिसणारे टोक खालचा आकार किती प्रचंड आहे, हे कळू देत नाही, त्याप्रमाणेच महाराजांचे राजकारणी धोरण असे. आग्य्राहून परतल्यावर शंभूराजे मृत्यू पावल्याची कंडी त्यांनीच पिकवली होती.
शंभूराजे स्वराज्याला सोडून गेले होते, हेच सकृत् दर्शनी सर्वत्र प्रसारित करायचे होते, तरच त्यांचे काम ते उत्तम प्रकारे करू शकले असते आणि मोगलांचा विश्वास संपादन करू शकले असते.

शंभूराजांच्या जीवनातील काही आक्षेपार्ह घटना आणि त्यांचे वास्तव !

३. …तर आजच्या नेत्यांत आणि छत्रपती शिवरायांत भेद कोणता ?
सर्वांत महत्त्वाचे सूत्र हे आहे की, खरोखरीच स्वराज्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे हे शंभूराजांचे कर्म असते, तर शिवरायांनी त्यांचा निश्चित शिरच्छेद केला असता, कडेलोट केला असता. त्यांना कठोर शिक्षा केली असती. केवळ आपला मुलगा म्हणून त्याची गय केली असेल, तर आजच्या नेत्यांमध्ये आणि छत्रपती शिवरायांत कोणता भेद करता येईल ?
म्हणून आमचा निष्कर्ष स्पष्टपणे असा आहे की, दक्षिणेच्या स्वारीवर जातांना महाराजांनी शंभूराजांवर मोगलांशी लाडीगोडीचे संबंध निर्माण करून त्यांना थोपवून ठेवण्याची कामगिरी दिली होती. ती २ वर्षे त्यांनी यशस्वी केली. २ वर्षांनी महाराज परतले. आता अंतरंग भेदाचे काम महाराजांनी सोपवले. शंभूराजे आपल्याला सोडून गेल्याचे नाटक केले आणि काम होताच त्यांना परत बोलावले. आल्यावर सर्व लोकांसमोर ‘लेकरा, चुकला होतास. बरे झाले परत आलास. मला सोडू नको. औरंगजेबाचा आतला दावा तुजला दगा करावयाचा होता. परंतु श्रीने कृपा करून सोडून आणिला. थोर कार्य झाले’, असे महाराज बोलले, हेही नाटकच !
हे कारस्थान इतके गुप्तपणे झाले की, महाराजांजवळ वावरणार्या कवींना, विद्वानांना, राजकारण्यांनाही याचा मागमूस लागला नाही. राष्ट्रकार्यासाठी जीवनभर झगडणारे, राष्ट्रकार्यात मृत्यूही पत्करणारे आणि राष्ट्रकार्यासाठी राष्ट्रद्रोहाच्या पातकाचा कलंक ३०० वर्षे आपल्या कीर्तीवर सहन करणारे धन्य ते शंभूराजे !
४. संभाजीराजांविषयी अपसमज पसरवण्यामागील कारण
‘भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे हे ‘शंभूराजे’ या छोटेखानी चरित्र कहाणीत म्हणतात, ‘महाराज, तुम्ही बादशाहच्या पापी हातात सापडल्यावर रायगडावरील तुमच्या कारकीर्दीतील सर्व महत्त्वाची पत्रे जाळली गेली; ज्यातून तुमचे खरे व्यक्तीमत्त्व स्पष्ट झाले असते. ती तुमची तेजस्वी, राष्ट्रभक्त, दैदिप्यमान मूर्ती चक्काचूर झाली आणि मग परकियांच्या दुष्ट हेतूने अन् अर्धवट आधाराने जे लिहिले, ते स्वकियांनीच पूर्वजांच्या हत्येचा सूड म्हणून आपली अपकीर्ती करणारे लिहिले. कुणी स्वकियानेच एकाची स्तुती करण्याच्या भरात आपणास निंदिले. आणखी कुणी आपण जन्माने काफर आणि काफरांचे स्वराज्य उभारायला निघालात म्हणून आपल्याविषयी लिहिले, ते सारे तुकडे एकत्र करून आणि कसेतरी जोडून आपली एक अगदी बीभत्स मूर्ती सिद्ध करण्यात आली.’
लेखक : भारताचार्य आणि धर्मभूषण पू. प्रा. सु.ग. शेवडे, चेंबूर, मुंबई. (साभार : ‘शंभूराजे’ या पुस्तकातून)

‘कॉर्पोरेट जिहाद’च्या षड्यंत्राच्या विरोधात आज चिपळूणमध्ये होणार्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहा !
इस्रायलमध्ये उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याच्या विचारांनी भारलेले अन् हिंदूंसाठी उभे रहाणारे युवक हवे आहेत !
‘कोल्हापूर हायकर्स पवित्र जल संकलन मोहिमे’त विविध नद्या, गड यांवरील पाण्याचे संकलन !
Bhopal University Renaming : बरकतउल्ला विद्यापिठाचे नाव ‘वाग्देवी भोजपाल विद्यापीठ’ होणार !