कुडाळ येथील सौ. मुग्धा मणेरीकर (पूर्वाश्रमीची कु. श्रावणी पेठकर) यांचा २२.२.२०२५ (माघ कृष्ण नवमी, रामदास नवमी) या दिवशी वाढदिवस आहे. विवाहापूर्वी त्या काही वर्षांपासून रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करायच्या. आश्रमात असतांना त्यांच्याकडे विविध वस्तूंचे जतन करण्याच्या सेवेचे दायित्व होते. त्या वेळी त्यांच्या समवेत सेवा करणार्या साधिकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सौ. मुग्धा मणेरीकर यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
१. एक साधिका (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) फोंडा, गोवा.
१ अ. प्रेमाने सेवा शिकवणे : ‘मी सध्या नव्यानेच सेवा करत आहे. आरंभी काही दिवस श्रावणीताईने मला प्रेमाने सेवा समजावून सांगितली. तिच्या बोलण्यातून ‘मी या सेवेत नवीनच आहे’, असे मला कधीही जाणवले नाही.
१ आ. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांप्रती भाव : श्रावणीताई मला सेवा समजावून सांगतांना तिच्या बोलण्यातून ‘तिचा गुरुदेवांप्रती किती भाव आहे’, हे माझ्या लक्षात येत होते. तिने मला सांगितले, ‘‘गुरुदेवांनी तुला नवीन सेवा शिकण्याची संधी दिली आहे, तर तू त्या सेवेचे सोने कर ! ‘साधकांच्या माध्यमातून गुरुदेवच तुला ही सेवा शिकवणार आहेत’, असा भाव ठेव.’’ तिने असे सांगितल्यानंतर मला नवीन सेवा शिकतांना अधिक भाव ठेवून आणि आनंदाने सेवा शिकता आली.
१ इ. सेवाभाव आणि नियोजनपूर्वक कृती करणे : श्रावणीताईकडे अनेक सेवा होत्या. ती प्रत्येक सेवेचे परिपूर्ण नियोजन करत असे. तिच्याकडून मला ‘प्रत्येक सेवेचे स्वतः नियोजन कसे करायला हवे ?’, हे शिकायला मिळाले.’
२. सौ. अश्विनी कार्तिक साळुंके, फोंडा, गोवा.
२ अ. सहजता असणे : ‘श्रावणीमध्ये सहजता आहे. ती सर्वांशी समभावाने वागते. त्यामुळे तिच्याशी बोलतांना ताण येत नाही.
२ आ. प्रेमभाव : सेवेसाठी आल्यावर श्रावणी सर्व साधकांची आपुलकीने चौकशी करते. कुणी साधिका रुग्णाईत असल्यास ती त्यांना खोलीत जाऊन भेटते आणि ‘त्यांना काही अडचण नाही ना ?’ याविषयी विचारपूस करते. तिच्यातील प्रेमभावामुळे आश्रमातील लहान मुलांनाही तिच्याविषयी आपलेपणा वाटतो.
२ इ. इतरांचा विचार करणे : श्रावणी बैठकीत सेवेची सूत्रे मांडतांना ‘ती कशी मांडायला हवीत, जेणेकरून ती सर्वांना समजतील आणि कुणीही दुखावले जाणार नाही, तसेच साधकांना त्यातून शिकताही येईल’, असा विचार करते. श्रावणीमध्ये ते कौशल्य आहे.
२ ई. आधार वाटणे : श्रावणी वयाने लहान असूनही विभागातील सर्व साधकांना तिचा आधार वाटतो. साधकांना सेवेत किंवा व्यष्टी साधनेचे प्रयत्न करतांना काही अडचणी येत असल्यास साधक तिच्याशी मनमोकळेपणाने बोलतात.
२ उ. सूक्ष्मातील कळण्याची क्षमता असणे : श्रावणीला वस्तूंच्या स्पंदनाचा अभ्यास चांगल्या प्रकारे करता येतो. तिने अल्प कालावधीत प्राणशक्तीवहन पद्धतीने उपाय शोधण्याविषयी शिकून घेतले आहे. त्यामुळे ती साधकांना नामजपादी उपाय शोधून देते.
‘हे गुरुदेवा, आपल्या कृपेमुळे मला श्रावणीसह सेवा करण्याची आणि तिच्याकडून शिकण्याची संधी मिळाली. मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे. देवा, माझ्याकडूनही ‘आपल्याला अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न करवून घ्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
३. सौ. वैशाली शैलेश कोथमिरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
३ अ. ‘श्रावणीला नीटनेटके आणि व्यवस्थित रहायला आवडते.
३ आ. व्यष्टी साधनेचे गांभीर्य : श्रावणी व्यष्टी साधनेच्या आढाव्यामध्ये स्वतःच्या मनाची स्थिती प्रामाणिकपणे सांगते. ‘आपण साधनेमध्ये कुठे न्यून पडतो ?’, असा विचार करून ती साधनेचे प्रयत्न तळमळीने करते. तिच्याकडून एखादी चूक झाली, तर तिला खंत वाटते.
३ इ. आपल्या प्रेमळ स्वभावाने आश्रमातील सर्वांना श्रावणीने आपलेसे केले आहे.
३ ई. भाव : श्रावणीमध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. तिच्या प्रत्येक कृतीतून हा भाव व्यक्त होतो.’
४. श्रीमती मनीषा केळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा आणि सौ. अंजली अरगडे, फोंडा, गोवा.
४ अ. लहानथोरांशी प्रेमाने वागणे : ‘श्रावणीला लहान मुलांबरोबर खेळायला आवडते. ती वयस्कर साधकांशीही आदराने बोलते आणि त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करते. लहान मुले आणि मोठी माणसे यांच्यामध्ये ती अगदी सहजतेने मिसळते.
४ आ. नेतृत्व गुण : श्रावणीला सर्व सेवांचे बारकावे ठाऊक असतात. ती सर्वांना सेवेत साहाय्य करते. ती साधकांना सेवा समजावून सांगते आणि सेवेचे नियोजनही करून देते. विभागातील सर्वांना तिचा आधार वाटतो.
४ इ. आश्रमातील प्रत्येक वस्तूबद्दल तिच्या मनात कृतज्ञतेचा भाव असतो.’
सर्व सूत्रांचा दिनांक (२७.१२.२०२४)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |