२२.२.२०२५ या दिवशी (माघ कृष्ण नवमीला) सनातनच्या १२३ व्या संत पू. (सौ.) मनीषा पाठक यांचा ४३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त पुणे येथील साधिकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
पू. (सौ.) मनीषा पाठक यांना वाढदिवसानिमित्त सर्व साधकांच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. सौ. कीर्ती महाजन
१ अ. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पू. मनीषाताईंच्या माध्यमातून कुलदेवीने महाप्रसाद ग्रहण केल्याची अनुभूती येणे : आषाढ पौर्णिमा, म्हणजेच गुरुपौर्णिमा (२१.७.२०२४) या दिवशी गुरुदेवांच्या कृपेने मला पू. मनीषाताईंसाठी महाप्रसाद बनवण्याची सेवा मिळाली. गुरुपौर्णिमेच्या काही दिवस आधी मला शारीरिक त्रास होत होते. त्यामुळे ‘महाप्रसाद बनवण्याची सेवा मला करता येईल ना ?’ असा विचार माझ्या मनात येत होता. त्या दिवशी मला ‘कुलदेवीचा कुळाचार करावा’, असे वाटत होते; परंतु मला सासरची कुलदेवी ठाऊक नसल्याने मी ‘पू. मनीषाताईंसाठी, म्हणजे आमच्या कुलदेवीसाठीच महाप्रसाद बनवत आहे’, असा भाव ठेवला. पू. ताईंनी महाप्रसाद ग्रहण केल्यावर ‘सर्व पदार्थ छान झाले आहेत’, असे सांगितले. तेव्हा ‘कुलदेवीने कुलाचार स्वीकारला’, असे जाणवून माझी भावजागृती झाली आणि गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’
२. सौ. प्रीती कुलकर्णी
‘१९.१.२०२५ या दिवशी माझ्याकडे एका कार्यक्रमाच्या आयोजनाची सेवा होती. कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी पू. मनीषाताईंनी सभागृहात येऊन सेवांमध्ये काही पालट सांगितले. तेव्हा मला त्यांच्याकडून पुढील सूत्रे शिकायला मिळाली.
अ. पू. मनीषाताई काही क्षणांतच निरीक्षण करून आवश्यक ते पालट आणि उपाययोजनाही सांगतात.
आ. सेवेतील पालट सांगतांना त्या ‘समोरच्या साधकाला ताण येणार नाही’, याची काळजी घेतात.
इ. पू. ताईंना ‘प्रत्येक कृती ‘सत्यं शिवं सुन्दरम् ।’ अशी आणि गुरुदेवांना अपेक्षित अशी व्हावी’, असा ध्यास असतो.
ई. ‘प्रत्येक सेवेतून साधकांची साधना व्हावी’, अशी त्यांना तळमळ असते. त्यांच्याकडून ‘तत्त्वनिष्ठता, प्रेमभाव आणि सकारात्मक रहाणे’ हे गुण शिकायला मिळतात.’
३. कु. प्राची शिंत्रे
३ अ. पू. ताईंनी धर्मप्रेमींसाठी खाऊ घेऊन जाण्यास आवर्जून सांगणे आणि खाऊ मिळाल्यावर धर्मप्रेमींनाही कृतज्ञता वाटणे : मी सेवेला जातांना किंवा धर्मप्रेमींना संपर्क करायला जातांना पू. ताई मला नेहमी काहीतरी खाऊ घेऊन जाण्यास सांगतात. त्या व्यस्त असल्या, तरीही ‘मी धर्मप्रेमींसाठी खाऊ घेतला आहे ना ?’ हे त्या पहातात. तेव्हा ‘त्या खाऊतून (प्रसादातून) धर्मप्रेमींना साधनेचे प्रयत्न करण्यासाठी ऊर्जाच देत आहेत’, असे मला वाटते. खाऊ मिळाल्यावर धर्मप्रेमींची पुष्कळ भावजागृती होते. ‘आम्ही एवढ्या लांब असूनही आणि आमच्याकडून पुष्कळ प्रयत्न होत नसले, तरी संत आमची आठवण काढतात’, या जाणिवेने त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटते. त्यामुळे ‘त्यांचे साधनेचे प्रयत्न वाढतात’, असे पुष्कळदा लक्षात आले आहे.
३ आ. सेवाकेंद्र चैतन्यमय रहाण्यासाठी प्रयत्न करणे : सेवाकेंद्रातील चैतन्य टिकून रहावे आणि त्यात वाढ व्हावी, यासाठी पू. ताई सतत प्रयत्नशील अन् सतर्क असतात. सेवाकेंद्रात आलेल्या प्रत्येक साधकाला ‘गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवता आले पाहिजे’, असा पू. ताईंचा सतत प्रयत्न असतो.
३ इ. पू. ताईंनी साधिकेला श्रीकृष्णाचे एक चित्र देऊन त्याकडे पाहून नामजप करायला सांगितल्यावर साधिकेला अनुभूती येणे : पू. ताईंकडे पुष्कळ वर्षांपासून श्रीकृष्णाचे एक चित्र होते. (त्या काही काळ अमेरिकेत वास्तव्यास असतांना त्यांच्याजवळ हे चित्र होते.) पू. ताईंनी ते चित्र एका साधिकेला दिले आणि त्या चित्राकडे पाहून नियमित नामजप करायला सांगितले. त्या साधिकेने त्याप्रमाणे प्रयत्न केल्यावर तिला ‘श्रीकृष्णच तिच्याकडून साधनेचे प्रयत्न करून घेत आहे’, असे अनुभवता आले. यातून ‘संतांच्या प्रत्येक कृतीमागे कार्यकारणभाव असतो. त्यांचा प्रत्येक विचार हा साधकांच्या साधनेसाठीच असतो’, हे लक्षात येते. संतांचे जीवन हे समष्टीसाठीच असते’, हे मला यातून शिकायला मिळाले.
३ ई. साधकांप्रती निरपेक्ष प्रीती
३ ई १. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या छपाईची सेवा करणार्या साधकांची विचारपूस करून त्यांना खाऊ पाठवणे : पुणे येथे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या छपाईची सेवा वर्षभर चालू असते. ही सेवा करणारे साधक प्रतिदिन विविध अडचणींवर मात करून ही सेवा करतात. ऊन, पाऊस, थंडी, वारा आदी कशाचीही तमा न बाळगता ते अव्याहतपणे ही सेवा करत असतात. पू. ताई या सर्व साधकांची वेळोवेळी विचारपूस करतात आणि त्यांच्यासाठी खाऊ पाठवतात.
३ ई २. साधकांसाठी सत्संगाचे नियोजन करणे : काही दिवसांपूर्वी पू. ताईंनी पुणे सेवाकेंद्रात छपाईच्या सेवेतील साधकांसाठी सत्संग घेतला होता. त्या सत्संगातून ‘साधकांचे साधनेचे प्रयत्न वाढावेत, त्यांना सेवाकेंद्रातील चैतन्य मिळावे’, असा त्यांचा उद्देश होता. या सत्संगात सहभागी झालेल्या सर्व साधकांची पुष्कळ भावजागृती होत होती.
त्या वेळी ‘गुरुदेवांचे संदेशपत्र (‘सनातन प्रभात’) सर्वांपर्यंत पोचवणार्या या सर्व गुरुसेवकांची मी सेविका आहे. त्यांची काळजी घेणे, ही माझी सेवाच आहे’, असा पू. ताईंचा भाव होता’, असे मला जाणवले.
३ उ. पू. ताईंच्या प्रत्येक कृतीतून गुरुदेवांचेच दर्शन होते. त्यांच्या प्रत्येक कृतीतून त्यांचे साधकांवरील निरपेक्ष प्रेम आणि वात्सल्यभाव पहायला मिळतो.
गुरुदेवांच्या कृपेने मला पू. मनीषाताईंच्या सहवासात रहाण्याची आणि त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळत आहे. त्याबद्दल मी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
४. सौ. तपस्विनी शेटे
४ अ. सेवाकेंद्रातील सर्व सेवांत सहभागी होणे : ‘सेवाकेंद्रात साधकसंख्या अल्प असेल, तर पू. ताई स्वतः सेवेत साहाय्य करतात. त्या सर्व सेवांमध्ये सहभागी होतात. त्या सांगतात, ‘‘कोणतीही सेवा लहान किंवा मोठी नाही. प्रत्येक सेवेतून आपली साधनाच होत असते.’’
४ आ. पू. मनीषाताईंच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
४ आ १. पू. ताईंच्या टाचेवर पुष्कळ दैवी कण दिसून ‘स्वतःला चैतन्य मिळत आहे’, असे जाणवणे : एकदा मी पू. मनीषाताईंच्या पायांना मर्दन (मालीश) करत असतांना मला त्यांच्या टाचेवर पुष्कळ दैवी कण दिसले. ते पाहून माझी भावजागृती झाली. या कणांचा माझ्या हाताला स्पर्श झाल्यावर ‘व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठी चैतन्य मिळत आहे’, अशी मला अनुभूती आली.
४ आ २. गुरुदेवांच्या कृपेने आणि पू. मनीषाताईंमधील चैतन्याने पुणे येथील सेवाकेंद्रात आता पालट जाणवत आहेत.
४ आ ३. पू. मनीषाताईंशी बोलल्यावर सदनिकेतील खंडीत वीजप्रवाह पुन्हा सुरळीत होणे : एक दिवस आमच्या घरी काही साधक निवासासाठी येणार होते. त्या कालावधीत आमच्या सदनिकेतील वीजप्रवाह खंडीत होऊन ३ ते ४ घंटे होऊनही तो पूर्ववत चालू झाला नाही. त्या वेळी मी पू. ताईंना भ्रमणभाष करून सर्व परिस्थिती सांगितली. त्या म्हणाल्या, ‘‘आपण १० मिनिटे वाट पाहू.’’ त्यांच्याशी बोलणे पूर्ण होताच सदनिकेतील वीजप्रवाह सुरळीत चालू झाला.
गुरुदेवांच्या कृपेने पू. मनीषाताईंकडून शिकायला मिळालेल्या सूत्रांचे लिखाण करतांना मला खालील ओळी सुचल्या.
साधी रहाणी आणि देहभान विसरून समष्टी सेवा करणार्या ।
सदा साधकांचा विचार करून सर्वांवर प्रीती करणार्या ।। १ ।।
वात्सल्याची मूर्ती पू. मनीषाताई असे जणू गुरुदेवांचीच सावली ।
कोटीशः कृतज्ञता अशा पू. मनीषाताईंच्या चरणी ।। २ ।।
‘पू. मनीषाताई यांच्यासारखे गुण आमच्यामध्ये येवोत’, हीच गुरुदेव आणि पू. मनीषाताई यांच्या चरणी प्रार्थना आहे.’
सर्व सूत्रांसाठी दिनांक (११.११.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |