अभिजात मराठी भाषेची साहित्‍य चळवळ पुढे नेतांना…

आज भलेही आपल्‍या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. भले यात पुढे अधिक साहित्‍यसंपदा निर्माण होईल. प्रमाणित भाषेचा व्‍याप वाढेल, प्रसार वाढेल; पण ज्‍या काळात गाव गावातल्‍या मातीवर प्रेम करत होता, शेतीत राबत होता, वेगवेगळे व्‍यवसाय करत होता, त्‍यावेळीची बोलीभाषा, त्‍या बोलीभाषेतील शब्‍दसंपदा, त्‍या त्‍या बोलीभाषेतील मौखिक साहित्‍य आज पडद्याआड गेले आहे. जर अभिजात मराठी भाषेला अधिक श्रीमंत करायचे असेल, तर आता तग धरून असलेल्‍या गावांकडे साहित्‍यप्रेमी, लेखक आणि कवी यांनी आपले पाय वळवायला हवेत. शासनाच्‍या कोणत्‍याही पाठबळाविना बुद्धीजीवी कोकणात जसा मराठी भाषेतील बोलीभाषा जपण्‍याचा प्रयत्न आम्‍ही मंडळी करत आहोत, तसेच महाराष्‍ट्रातील विविध प्रांतांत तेथील बोलीभाषा जपणारी संमेलने बोलीभाषांवर प्रेम करणारी आस्‍थावान साहित्‍य रसिक मंडळी साजरी करत असतात. एकीकडे सरकार विश्‍व मराठी संमेलन आयोजित करत आहे. महाराष्‍ट्राच्‍या सीमेबाहेर अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलने कोट्यवधींची उड्डाणे असलेला खर्च करून साजरी करत आहेत, त्‍याचे दुःख नाही; मात्र त्‍याच वेळेला महाराष्‍ट्राच्‍या विविध प्रांतांत खर्‍या अर्थाने मराठीचा अभिजात भाषेचा दर्जा उंचावू पहाणार्‍या ज्‍या स्‍वयंसेवी, सामाजिक, साहित्यिक संस्‍था आहेत, त्‍यांचा शोध घेऊन त्‍यांच्‍याही पाठी भक्‍कमपणे उभे रहाण्‍याची आवश्‍यकता आहे. तेव्‍हाच खर्‍या अर्थाने अभिजात मराठी भाषेची साहित्यिक चळवळ पुढे जाते आहे, असे म्‍हणता येईल.

– श्री. सुभाष लाड, अध्‍यक्ष, राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई. (१८.२.२०२५)