संपादकीय : विदेश दौरा आणि राष्ट्रोत्कर्ष !

इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विदेश दौरा भारतियांसह जगासाठीही तितकाच महत्त्वपूर्ण ठरतो. १२ आणि १३ फेब्रुवारी या दिवशी त्यांचे अमेरिकेच्या दौर्‍याचे नियोजन होते. राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर मोदींनी तेथे प्रथमच भेट दिली. याआधी मोदी यांनी फ्रान्सला भेट दिली होती. तेथील ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ परिषदेतही ते सहभागी झाले होते. त्यामुळे या दोन्ही देशांच्या भेटी ऐतिहासिक ठरणार आहेत.

फ्रान्स आणि भारत !

१४ जुलै २०२३ या दिवशी फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली होती. २६ जानेवारी २०२४ या दिवशी भारतीय प्रजासत्ताकदिनाला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आले होते. फ्रान्सने नुकत्याच झालेल्या तिसर्‍या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ परिषदेचे संयुक्त अध्यक्षपद भारताला दिले होते. ही भारतासाठी मोठी सन्मानाची गोष्ट आहे. या परिषदेला सुमारे ८० देशांचे वरिष्ठ नेते, तसेच आघाडीच्या जागतिक आस्थापनांचे प्रमुख उपस्थित होते. ज्या काळात बहुतेक देश भारताकडे केवळ वसाहतवादी वर्चस्वाच्या दृष्टीकोनातून पहात होते, तेव्हा फ्रान्सचे नोबेल पारितोषिक विजेते रोमेन रोलँड यांनी म्हटले होते, ‘भारत ही आपल्या संस्कृतीची जननी आहे.’ भारत आणि फ्रान्स यांच्यातील मैत्रीचा प्रारंभ जुलै १९९८ मध्ये पोखरणमध्ये भारताने अणूचाचणी केल्यापासून झाला. त्या चाचणीला अमेरिकेसह इतर पाश्चिमात्य देशांनी विरोध केला होता. भारतावर निर्बंध आणत त्याला एकप्रकारे वाळीतच टाकले होते; पण अशा संकटात केवळ फ्रान्सने त्याला पाठिंबा देत साहाय्याचा हात दिला होता. फ्रान्सने भारताची आण्विक क्षमता वाढवण्यातही साहाय्य केले. त्यामुळे फ्रान्स भारताच्या प्रगतीच्या वाटचालीतील प्रमुख भूमिका बजावणारा देश ठरत आहे.

पंतप्रधानांकडून ‘एआय’ची हमी !

फ्रान्समधील ‘एआय’च्या (कृत्रिम बुद्धिमत्तेच्या) परिषदेत मोदींनी एआयची आवश्यकता अधोरेखित केली आणि ते कालसुसंगत कसे आहे, तेही विशद केले. ‘एआय’च्या तंत्रज्ञानाचा वेगाने विकास होत आहे. त्याचे भवितव्य नेमके कसे आहे, याविषयी अद्याप सर्वांनाच साशंकता आहे; कारण या तंत्रज्ञानामुळे धोके वाढत आहेत. एआयचा वापर नेमक्या कोणत्या गोष्टींसाठी केला जातो, याचा अभ्यास व्हायला हवा. एखाद्याला हानी पोचावी किंवा एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी एआयचा वापर व्हायला नको. ‘सर्व कामे ‘एआय’च करत असेल, तर नोकरी-व्यवसाय संपुष्टात येणार कि काय ?’ असाही प्रश्न सर्वांना भेडसावत आहे. अनेकांना ‘एआय’ची भीतीच आहे; पण मोदी यांचे परिषदेतील संबोधन सर्वांनाच दिशा देणारे ठरले. ते म्हणाले, ‘‘एआय ही काळाची आवश्यकता आहे. भारताकडे जगातील सर्वांत मोठे ‘टॅलेंट’ (कौशल्य) म्हणून हे एआय आहे. आम्ही लोकांचा डेटा (माहिती) सुरक्षित ठेवण्यासाठी व्यवस्था सिद्ध केली आहे. एआयचे भविष्य पुष्कळ चांगले असून त्यातून सर्वांचे हितच होणार आहे. अनेकांचे आयुष्य पालटण्याचे सामर्थ्य एआयमध्ये आहे. एआयमुळे नोकरीच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे रोजगाराचे संकट निर्माण होणार नाही, याची शाश्वती बाळगावी.’’ अनेक देशांमध्ये आज तंत्रज्ञानाची स्पर्धा चालू आहे. भारताचे शत्रू असलेले देशही प्रतिदिन नवनवी आव्हाने निर्माण करत आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी समाज आणि सुरक्षा या दृष्टीने विचारविनिमय करणे आवश्यक आहे. एकूणच तंत्रज्ञानातील प्रगती आणि एआयचे भविष्य या पार्श्वभूमीवर मोदी यांनी ‘फ्रान्सचे साहाय्य घेत असून फ्रान्सनेही त्यासाठी पुढाकार घ्यावा’, असे सांगितले. नवोन्मेष आणि वैज्ञानिक सहकार्याला चालना देण्याची सहमती दर्शवणे, संशोधन आणि विकास यांना चालना देण्यासाठीचा करार, भारतीय ‘स्टार्टअप्स’ना पाठिंबा, अणूभट्टी तंत्रज्ञानावर सहकार्य वाढवण्याचे आश्वासन, अणूऊर्जा सहकार्या विषयीच्या सामंजस्य कराराचे नूतनीकरण, पर्यावरणीय भागीदारी या पार्श्वभूमीवर भारत आणि फ्रान्स यांची आंतरराष्ट्रीय भेट यशस्वी ठरली. नरेंद्र मोदी फ्रान्सहून अमेरिकेला जाण्यासाठी निघतांना राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन त्यांना विमानतळावर सोडण्यासाठी आले होते. तेव्हा दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली. हे दृश्य परराष्ट्रनीती आणि विकास यांच्या दृष्टीने भारतासाठी निश्चितच आशादायी ठरेल !

अमेरिका आणि भारत !

डॉनल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोना महामारीचा काळ वगळता नरेंद्र मोदी प्रतिवर्षी अमेरिकेला भेट देतात. नुकतेच अमेरिकेने तेथे अवैधरित्या रहाणार्‍या भारतीय नागरिकांना भारतात परत पाठवून दिले. या सूत्राच्या अनुषंगाने या भेटीकडे बघणे हितावह ठरेल. अमेरिकेने अवैधपणे रहाणार्‍यांना हाकलून लावण्याची जी सडेतोड भूमिका घेतली, तीच भूमिका अंगीकारणे आज भारतासाठी आवश्यक आहे. भारतात तर अमेरिकेपेक्षा अधिक प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट झालेला आहे. भारताच्या मुळावर उठणार्‍या, येथील भूमीवर नियंत्रण मिळवून त्या घशात घालू पहाणार्‍या, आई-बहिणींवर बलात्कार करणार्‍या, भारताचे अस्तित्व संपवू पहाणार्‍या या बांगलादेशी घुसखोरांच्या प्रश्नाचे ‘भिजत घोंगडे’ भारत किती काळ भिजत ठेवणार आहे ? अमेरिकेला इतकी रोखठोक भूमिका घेणे कसे जमले, त्यांनी नेमक्या कोणत्या उपाययोजना राबवल्या, तेही भारताने या अमेरिका भेटीतून जाणून त्यांचा अवलंब येथे आल्यावर करायला हवा. तसे झाल्यासच अमेरिका दौर्‍याची अपेक्षित फलनिष्पत्ती मिळेल. घुसखोरी आणि आतंकवाद यांसह खलिस्तानवादही भारतासाठी डोकेदुखीच ठरत आहे. आजवर अमेरिकेनेच या खलिस्तानवादाला पोसले आणि अजूनही पोसत आहे; पण त्याचे भीषण परिणाम भारत भोगत आहे. अशा वेळी केवळ मैत्रीचा विचार करून चालणार नाही, तर यासाठी विश्वासघातकी अमेरिकेला वेळीच खडसवावेही लागेल. खलिस्तानवाद मुळासह संपवण्याचे वचन अमेरिकेकडून घ्यायला हवे आणि मगच मैत्रीचा हात पुढे करावा. पंतप्रधान मोदी सूज्ञ आहेत. त्यामुळे ते राष्ट्रोत्कर्षासाठी एका भेटीतून अनेक गोष्टी साध्य करतीलही ! भारत-फ्रान्स आणि भारत-अमेरिका या संबंधांचे नवे पर्व परराष्ट्रनीतीच्या दृष्टीने यशस्वी ठरावे, हीच समस्त भारतियांची अपेक्षा !

भारत जसा आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि युद्धसज्ज होत जाईल, तसा त्याचा जगात सर्वांकडून सन्मान केला जाईल !