‘एकदा मी एका संगीत नाटकातील ‘नांदी’चा सराव सहज करत होते. ती नांदी गात असतांना माझ्या मनात आले, ‘आपण ‘श्रीविष्णूवर’ आधारित एखादी नांदी लिहावी.’ तेव्हापासून ‘मला काही शब्द अथवा ओळी सुचतात का ?’, यासाठी मी प्रयत्नरत होते; परंतु मला काही सुचले नाही. त्यानंतर ५ – ६ दिवसांनी मी एकदा उपाय करत असतांना माझ्याकडून श्रीमन्नारायणाला आर्तभावाने प्रार्थना झाली, ‘हे नारायणा, ‘आता काही लिहायचे आहे’, अशी इच्छाच माझ्या मनात ठेवू नकोस. तू जेव्हा शब्द देशील, तेव्हा तेच खरे दैवी पद्य आपोआप रचले जाईल.’ त्यानंतर सेवा करत असतांना माझ्या मनात कोणताच विचार नसतांना आपोआप मला श्रीविष्णूवर आधारित नांदी सुचली. साधारण २ मिनिटांमध्ये ३ कडवी आपोआप लिहिली गेली. त्यात कुठेच खाडा-खोड झाली नाही, तसेच या काव्याला १ दिवसात चालही लावता आली. ती नांदी येथे दिली आहे.
(टीप – नांदी : संस्कृत आणि मराठी संगीत नाटकांच्या प्रारंभी देवतांच्या आशीर्वादासाठी स्तुतीगायन केले जाते, त्यास ‘नांदी’ असे म्हणतात.)

१. श्रीविष्णूवर सुचलेली नांदी
वंदन चरणा श्रीकमलाकांता ।
दास आम्ही तव आलो आता ।।
दैवी नाट्य हे घडवूनी घेता ।
कृतज्ञ रहावे सदैव नाथा ।। धृ. ।।
राग मधुर तुज साद घालती ।
तव चरणांची ओढ लागली ।।
हे पद्मनाभा, कमलाकांता ।
दास आम्ही तव आलो आता ।। १ ।।
सुवर्णमंच हा जणू वैकुंठलोक ।
सप्तस्वरही झाले भावुक ।।
नाट्यपुष्प हे कमलपुष्पासम ।
मानून घे श्रीकमलाकांता ।। २ ।।

२. शिकायला मिळालेले सूत्र
या प्रसंगी ‘मला हे खरेच दैवी शब्द सुचले आहेत आणि श्रीमन्नारायण स्वरूप गुरुदेवांनीच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनीच) सुचवलेले हे शब्द आहेत. ‘मी काहीतरी लिहावे’, असा विचार करत असतांना मला काहीच सुचत नव्हते आणि ‘देवाची इच्छा असेल, तेव्हा सुचेल’, असा विचार आल्यावर हे काव्य सुचणे’, ही दैवी अनुभूती मला घेता आली.
कृतज्ञता : गुरुकृपेने ही श्रीविष्णूवर आधारित ‘नांदी’ सुचली. हे ‘नांदीपुष्प’ त्या रंगदेवतेच्या आणि गुरुदेवांच्या सुकोमल चरणी भक्तीपूर्वक अर्पण करते. अनंत कोटी कृतज्ञता गुरुदेवा !
– परात्पर गुरुदेवांची, कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), फोंडा, गोवा. (१२.११.२०२४)
![]() ‘भाव तिथे देव’ या उक्तीप्रमाणे कलेमध्ये देवाप्रती भाव असल्यास देवही तेथे साहाय्य करतो. साधिकेने निरपेक्ष भावाने देवाला आळवल्यावर त्या भगवंताने साधिकेला ही अनुभूती दिली. त्यामुळेच ‘स्वेच्छेपेक्षा ईश्वरेच्छेमध्ये अधिक आनंद आहे. कलेला भावाची जोड दिल्यास ती कला भावपूर्ण होऊन देवाचरणी अर्पण होते’, हेच यावरून लक्षात येते.’ – सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |