महाराष्ट्र मंदिर महासंघाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

सावंतवाडी – महाराष्ट्रातील देवस्थानांच्या शेतभूमींवर भूमाफियांचा डोळा असून अनेक ठिकाणी भूमी हडपण्याचे गंभीर प्रकार घडले आहेत. या वाढत्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आणि देवस्थानांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मंदिर महासंघाच्या वतीने सविस्तर निवेदन सावंतवाडीच्या नायब तहसीलदार सौ. सविता कासकर यांना सादर करण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की,
१. महाराष्ट्रामध्ये देवस्थानांचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अमूल्य आहे. अनेक वर्षांपासून राजे-महाराजे, भाविक आणि समाजातील दानशूर व्यक्ती यांनी देवस्थानांना शेतभूमी दान केल्या आहेत, जेणेकरून मंदिरांचे व्यवस्थापन, धार्मिक विधी आणि आवश्यक खर्च व्यवस्थित करता येईल.
२. या भूमी देवस्थानांच्या मालकीच्या असून त्यांचा उपयोग केवळ धार्मिक कार्यांसाठी आणि देवस्थानाच्या व्यवस्थापनासाठीच केला जातो; परंतु गेल्या काही वर्षांपासून या भूमींवर भूमाफिया आणि काही स्वार्थी लोक यांची दृष्टी पडली आहे. त्यांनी संगनमताने आणि गैरमार्गाने या भूमी हडपण्याचे प्रयत्न चालू केले आहेत.
३. काही ठिकाणी भूमींच्या खोट्या कागदपत्रांच्या आधारे मालकी पालटण्यात आली आहे. इनाम भूमी, ज्या भोगवटादार वर्ग-२ च्या अंतर्गत येतात आणि सहज हस्तांतरित करता येत नाहीत, त्याही बेकायदेशीरपणे हडपल्या गेल्या आहेत. कुळ कायद्याचा गैरवापर करून काही लोकांनी देवस्थान भूमींवर आपले नाव लावले आहे, ज्यामुळे देवस्थानांची मोठी आर्थिक हानी झाली आहे. याखेरीज, महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संगनमताने भूमी हडपण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे.
४. उच्च न्यायालय आणि सर्वाेच्च न्यायालय यांनी वेळोवेळी देवस्थान भूमींच्या संरक्षणाबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. ‘या भूमी केवळ धार्मिक कार्यांसाठी आणि देवस्थानांच्या व्यवस्थापनासाठीच वापरल्या जाव्यात’, असे न्यायालयाने अनेक प्रकरणांमध्ये म्हटले आहे, तसेच देवस्थानाच्या भूमी हडपण्याच्या प्रकरणांमध्ये कठोर कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत; परंतु दुर्दैवाने या आदेशांचे योग्य पालन होतांना दिसत नाही आणि भूमी हडपण्याचे प्रकार अजूनही चालू आहेत.
महाराष्ट्र मंदिर महासंघाने ‘अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ (भूमी अतिक्रमण विरोधी कायदा) आणण्याची आग्रही मागणी केली आहे. ‘या कायद्याच्या माध्यमातून भूमी हडपणार्यांवर कठोर कारवाई करता येईल’, असा विश्वास महासंघाने व्यक्त केला आहे, तसेच देवस्थान भूमींच्या संरक्षणासाठी आणि हडपण्याच्या प्रकरणांचे अन्वेषण करण्यासाठी विशेष पथक नेमण्याची मागणीही महासंघाने केली आहे. या पथकात अनुभवी अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश असावा, जेणेकरून या प्रकरणांची योग्य चौकशी होऊन दोषींवर कारवाई करता येईल.
तहसीलदारांना निवेदन देतांना सर्वश्री जगन्नाथ सावंत, सुहास भालेकर, प्रकाश सावंत, बाबुराव सावंत, सुनील परब , बाळकृष्ण देसाई, राजन सावंत, रघुनाथ सावंत, दिगंबर सावंत, बाळा डांगी, सानू गावकर, सुभाष परब, प्रमोद सावंत, झिपाजी परब, श्रीधर गावकर, संतोष परब, चंद्रकांत बिले, शिवराम देसाई आदी उपस्थित होते.
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !