महाराष्‍ट्रात उत्तर भारतातील स्‍थलांतरित आणि बांगलादेशातील घुसखोर यांचा प्रश्‍न गंभीर ! – अजित पवार, उपमुख्‍यमंत्री

बांगलादेशी घुसखोर

पुणे – महाराष्‍ट्रात उत्तर भारतातून येणारे स्‍थलांतरित आणि बांगलादेशातील घुसखोर यांचा प्रश्‍न गंभीर आहे, असे विधान उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी केले. नगरविकास आणि नगररचना विभागाच्‍या वतीने आयोजित पुरस्‍कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

गावामध्‍ये उत्‍पनाचे साधन नसल्‍याने लोक शहरामध्‍ये स्‍थलांतरित होत आहेत. परिणामी शहरातील झोपडपट्ट्यांमध्‍ये वाढ होत आहे. तेथे रहाणार्‍या लोकांना पुनर्वसन योजनेच्‍या अंतर्गत चांगली घरे मिळाली की, ते आपल्‍या नातेवाइकांना बोलावतात. त्‍यामुळे शहरातील गर्दी वाढते. वर्ष २०५४ पर्यंत पुण्‍याची लोकसंख्‍या (पिंपरी-चिंचवडसह) २ कोटी होईल. या वाढत्‍या लोकसंख्‍येसाठी वाहतूक, वीज, पाणी व्‍यवस्‍था अपुरी पडेल. त्‍यामुळे आम्‍हाला वेगाने विकास करणे आवश्‍यक आहे.