‘मोनालिसा’, ‘आयआयटी बाबा’ म्हणजे कुंभमेळ्यात मोहकता दाखवून अपकीर्त करू पहाणारे प्यादे !

कुंभमहापर्वामुळे या कुंभमेळ्याला आलेल्या भाविकांची संख्या प्रचंड होती. यामुळे इतक्या प्रचंड जमावाला नियंत्रित करणे, हे प्रशासनापुढे जरी आव्हान असले, तरी प्रशासन यामध्ये अल्प पडले आहे, याविषयीची वस्तूस्थिती मांडणे पत्रकारांचे काम आहे. विविध वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिनी यांचे काही पत्रकार कुंभमेळ्याच्या कानाकोपर्‍यात जावून वस्तूस्थितीजन्य वृत्ते देण्यासाठी प्रयत्न करत आहेत; मात्र काही पत्रकार आणि समाजमाध्यमांचे प्रतिनिधी महाकुंभमेळ्याची अपकीर्ती करण्यासाठी कुंभमेळ्यात घुसले आहेत. हे एक नियोजित षड्यंत्र, काही प्रमाणात भरकटलेली पत्रकारिता आहे आणि सामाजिक माध्यमांवरील दर्शक संख्या वाढवण्यासाठी आटापिटा करणारेही आहेत. या सर्वांचा अपलाभ साम्यवादी, कथित पुरोगामी आणि मुसलमानांमधील सामाजिक माध्यमांवर सक्रीय असलेले धर्मांध घेत आहेत. कुंभमेळा चालू झाल्याच्या आधीपासूनच हे षड्यंत्र कशा प्रकारे चालू आहे, हे या लेखाद्वारे समजून घेऊ !

मोनालिसा

१. कुंभमेळ्याची अपकीर्ती करण्यासाठीच…

काही दिवसांपूर्वी कुंभमेळ्यामध्ये सेक्टर १९ मध्ये काली मार्गावर काही नास्तिकतावादी मंडळींनी ‘कुंभमेळा अंधश्रद्धा आहे’, असा प्रसार करण्यासाठी कक्ष उभारला होता. या नास्तिकतावादी मंडळींना काही नागा साधूंनी चोप दिला होता, याविषयीचे वृत्त सर्वांच्या वाचनात आले असेल. कुंभमेळ्यामध्ये भर चौकात ही मंडळी केवळ फलक घेऊन उभे होती, असे नाही, तर याविषयी ध्वनीवर्धकावरून घोषणा देत होती आणि यामध्ये मुली होत्या. कडाक्याची थंडी, निवारा आणि भोजन यांची सुविधा आदी सर्व गोष्टींना दुय्यम लेखून जे भाविक देशाच्या कानाकोपर्‍यातून येतात. वर्षानुवर्षे हिमालयात साधनारत असलेले नागासाधू प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी येतात, त्यांच्यापुढे येऊन कुंभमेळा अंधश्रद्धा आहे, असे सांगणार्‍यांची मानसिक सिद्धता काय असेल, याची कल्पना करा.

२. अपकीर्ती करण्यामागे ‘थिंक टँक’ (विचारसमूह) !

भर कुंभमेळ्यात असा प्रचार करणार्‍यांना चोप मिळेल, कदाचित जीवाचे बरेवाईटही होईल, याचा विचार करून जी मंडळी कुंभमेळ्यात आली असतील, ती नागा साधूंनी चोपले म्हणून किंवा कुंभमेळ्यातून पिटाळून लावले म्हणून शांत रहातील का ? त्यांच्या कक्षावर असलेली तेवढीच ही मंडळी असतील, असे कुणाला वाटते का ? जिवावर बेतण्याच्या सिद्धतेने आलेली ही मंडळी केवळ कुंभमेळ्यात कक्ष उभारण्यापुरती नियोजन ठेवतील, असे कुणाला वाटते का ? या सर्व मंडळींची इतकी सिद्धता करून घेणारा जो ‘थिंक टँक’ आहे, त्यांनी उभारलेला कक्ष हा एक छोटासा प्रयत्न होता आणि तो काही काळच असणार, याची त्यांनाही कल्पना होतीच. समाजमाध्यमांचा प्रभावी उपयोग करून ‘कुंभमेळा अंधश्रद्धा असल्याचे, भोंदू साधूंचा भरणा आणि अस्वच्छ असलेला, अश्लीलता पसरवणारा’, असे चित्र निर्माण करण्याचे यांचे मुख्य उद्दिष्ट आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यायला हवे.

श्री. प्रीतम नाचणकर

३. कुंभमेळ्यातील वृत्तांचे ‘बॉलीवूड’प्रमाणे प्रसारण !

कुंभमेळ्याच्या प्रारंभीपासून काही बातम्या क्रमाक्रमाने पेरण्यात आल्या. मॉडेलिंग करणार्‍या हर्षा रिछारिया यांनी दीक्षा घेतल्यावर त्यांचा ‘सर्वांत सुंदर साध्वी’ असा उल्लेख करण्यात आला. लहान, वृद्ध, महिला, अपंग हे गंगामातेविषयीच्या ज्या श्रद्धेने कुंभमेळ्यात सहभागी होतात, तसेच साधूसंतांपुढे श्रद्धेने नतमस्तक होतात. अशा महिला संन्याशांच्या शरिराची सुंदरता पहाणारी ही पत्रकारिता निश्चितच निकृष्ट आहे आणि अशी पत्रकारिता हिंदु धर्माविषयी श्रद्धा बाळगणारा कुणीही करू शकत नाही. कुंभमेळ्याची धार्मिकता न समजलेलाच असे करू शकतो; परंतु हे केवळ अज्ञानातून झालेले नाही. ‘कुंभमेळ्यातील सर्वांत सुंदर साध्वी कोण ?’, अशा बातम्या जाणीवपूर्वक प्रसारित करून कुंभमेळ्याला हिंदी चित्रपटसृष्टीप्रमाणे स्वरूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यातून कुंभमेळ्याच्या धार्मिकतेऐवजी त्याला ‘ग्लॅमर’ (मोहक) रूप देण्याचा प्रकार हा निश्चितच नियोजनबद्ध षड्यंत्राचा प्रकार आहे.

४. घडल्या नाही, बातम्या निर्माण केल्या गेल्या !

कुंभमेळ्यामध्ये जपमाळा विकणार्‍या मोनालिसा या मुलीला देण्यात आलेली प्रसिद्धी ही या प्रकारचीच होती. मोनालिसासारख्या शेकडो मुली आणि लहान मुले कुंभमेळ्यात माळा विकत आहेत. यामध्ये खरेतर त्यांच्या कष्टाचे मूल्य आहे. मोनालिसा ही दिसायला सुंदर आहेच; परंतु तिच्या सुंदरतेचे मार्केटिंग करण्यात आले. वृत्तपत्रांनी तिच्या प्रसिद्धीचा उपयोग स्वत:च्या प्रसिद्धीसाठी केला. सामाजिक माध्यमांनी तिच्या वृत्तांचा उपयोग दर्शक संख्या वाढवण्यासाठी केला; मात्र मुळातच अशा बातम्या निर्माण करण्यात आल्या आणि सामाजिक माध्यमांवर त्या चालू रहातील, याची दक्षता घेण्यात आली.

 

आयआयटी बाबा

५. ‘आयआयटी बाबां’चे वृत्त !

‘आयआयटी बाबा’ म्हणून प्रसिद्धी देण्यात आलेल्या अभय सिंह यांनी नोकरी सोडून संन्यास घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. याला खरोखरच बातमीमूल्य होते आणि ही एक चांगली बातमी होती; मात्र या वृत्तानंतर ही बातमी आयआयटी बाबा यांनी संन्यासाची दीक्षा घेण्याला केंद्रबिंदू करण्याऐवजी त्यांना एखाद्या हिंदी चित्रपटसृष्टीतील तारकाप्रमाणे सादर करण्यात आले. कुंभमेळ्यामध्ये कठोर साधना करणारे अनेक साधू आहेत. प्रसिद्धीपासून अलिप्त राहून ते साधना करत आहेत. ते करत असलेली साधना, त्यांचे कार्य याविषयी माहिती घेऊन समाजाला त्यातून दिशा मिळेल, अशी पत्रकारिता असायला हवी; मात्र उथळ माध्यमांना हाताशी धरून कुंभमेळ्याची अपकीर्त करण्याचा प्रयत्न केला गेला.

६. पाठबळ कुणाचे ?

काट्यांवर झोपणारे म्हणून ‘काटेवाला बाबा’ अशी कुंभमेळ्यात ओळख निर्माण झालेल्या बाबांना भोंदू ठरवण्यासाठी एक मुलगी त्यांचा व्हिडिओ बनवण्यासाठी ती त्यांना काट्यांवर झोपायला सांगत असल्याचा व्हिडिओ माध्यमांवर प्रसारित झाला. या व्हिडिओमध्ये ही युवती वृद्ध असलेल्या काटेवाला बाबा यांच्या वयाचाही विचार न करता त्यांच्याशी ज्याप्रमाणे वाद घालत होती, त्यावरून ती ठराविक उद्देशाने कुंभमेळ्यामध्ये आली आहे का ? असा प्रश्न पडतो.

७. यासाठी सामाजिक माध्यमांचा उपयोग !

सध्या सामाजिक माध्यमे ही एखादा विचार जगभरात काही मिनिटांमध्ये पोचवण्याचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे हिंदूविरोधी शक्ती या माध्यमाचा उपयोग कुंभमेळ्याची अपकीर्ती करण्यासाठी करत आहेत. या वेळी हिंदूंनीही चांगल्या प्रकारे सामाजिक माध्यमांवरून उत्तर दिले आहे. उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे आणि विशेषत: योगी आदित्यनाथ यांची सत्ता असल्यामुळे हिंदुत्वाची अपकीर्ती अन् भाजप नियोजनात अल्प पडले, हे दाखवण्यासाठी विरोधक आघाडीने काम करत आहेत. पत्रकारिता करतांना त्रुटी वस्तूनिष्ठपणे मांडणे हे पत्रकारांचे कर्तव्य आहेच; पण त्या दाखवून देत असतांना द्वेष अपेक्षित नाही. अध्यात्माची उच्च कोटीची अनुभूती देणारा हा कुंभमेळा, म्हणजे अद्वितीय, अविस्मरणीय, अतुलनीय आणि अलौकिक आहे. साम्यवादी, पुरोगामी आणि धर्मांध शक्ती यांनी याची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न करणे, हा दैवी कार्यावरील आघात आहेत. कुंभमेळ्याला अशा प्रकारे प्रसिद्धी देणारे हे काही सर्वच हिंदुविरोधी आहेत, असे नाही; मात्र हिंदुविरोधी शक्तींचे ते प्यादे बनत आहेत, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. लोकांच्या श्रद्धेला अंधश्रद्धा ठरवण्याचा त्यांचा प्रयत्न हा स्वत:च्या अस्तित्वासाठी चाललेला खटाटोप आहे. वृत्तपत्रे आणि समाजमाध्यमांनी वृत्ते देतांना आपणाकडून या दैवी कार्याला अपकीर्त करण्याचे पाप होणार नाही याची काळजी घ्यायला हवी आणि हिंदूंनीही याविषयी सतर्कता बाळगायला हवी. (३०.१.२०२५)

– श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, प्रयागराज, उत्तरप्रदेश.