निर्मल पंचायती आखाड्याच्या संत संमेलनात सनातन धर्माच्या रक्षणासाठी सर्व आखाड्यांना एकत्र येण्याचे आवाहन !

प्रयागराज, २६ जानेवारी (वार्ता.) – सनातन धर्माच्या रक्षणासाठी सर्व आखाड्यांची एकजूट आवश्यक आहे. सनातन धर्माच्या रक्षणासाठी शीख नेहमीच तत्पर राहिले आहेत. गुरु तेग बहाद्दूर यांनी केवळ शिखांसाठी नव्हे, तर सनातन धर्माच्या रक्षणासाठी हौतात्म्य पत्करले, असे वक्तव्य निर्मल पंचायती आखाड्याचे पीठाधीश्वर महंत स्वामी ज्ञानदेव सिंह महाराज यांनी केले. निर्मल पंचायती आखाड्याच्या वतीने २५ जानेवारी या दिवशी महाकुंभमेळ्यामध्ये संत संमेलनाचे आयोजन केले होते. या संत संमेलनामध्ये विविध आखाड्यांचे प्रमुख संतगण उपस्थित होते. शिखांचे धर्मगुरु तेग बहाद्दूर यांच्या ३५० व्या हौतात्म्य वर्षानिमित्त हे संमेलन त्यांच्या चरणी समर्पित करण्यात आले. भाजपचे खासदार स्वामी साक्षी महाराजही या संमेलनाला उपस्थित होते. निर्मल पंचायती आखाड्याच्या तसेच उपस्थित असलेल्या अन्य आखाड्यांच्या प्रतिनिधींनीही या वेळी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनामध्ये सर्वच मान्यवरांनी सनातन धर्माच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. या वेळी संत संमेलनाला उपस्थित विविध मान्यवरांनी महंत स्वामी ज्ञानदेव सिंह महाराज यांचा सन्मान केला.
पीठाधीश्वर महंत स्वामी ज्ञानदेव सिंह महाराज पुढे म्हणाले, ‘‘एका बोटाने प्रतिकार करता येत नाही. पाच बोटांची मूठ झाली, तर मात्र एका मुठीने प्रहार करता येतो. असा संघटितपणा सनातन धर्माच्या रक्षणासाठी दाखवायला हवो. गुरु तेग बहाद्दूर यांचा त्याग आणि शौर्य यांचे स्मरण करून सनातन धर्माच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र यावे.’’
शीख गुरुंची हिंदु धर्म आणि राष्ट्र रक्षणाची परंपरा सनातन धर्माचे वैशिष्ट्य ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
गुरु तेग बहाद्दूर यांनी हिंदूंच्या रक्षणासाठी विशेषत: काश्मिरी पंडितांच्या रक्षणासाठी बलिदान दिले आहे. हिंदु धर्मांसाठी शीख गुरुंची परंपरा हे सनातन धर्माचे वैशिष्ट्य आहे. नामधारी, निलंग किंवा निर्मल पंथांचे शीख शेकडो वर्षांपासून हिंदु धर्म आणि भारत यांच्या रक्षणाचे कार्य करत आहेत. हे कार्य यापुढेही चालू राहिल. खिस्ती झालेले काही तथाकथित शीख, तसेच काही मोजके जण खलिस्तानची मागणी करत आहेत; परंतु बहुसंख्य शीख भारतातच राहु इच्छितात.