शेवटचा दिवस !  

एकदा एका प्रवासाच्‍या कालावधीत काही प्रवाशांमध्‍ये मनुष्‍याच्‍या संघर्षमय आयुष्‍याविषयी चर्चा चालू होती. त्‍यांच्‍यापैकी एक सद़्‍गृहस्‍थ एकूणच परिस्‍थितीवर विशाद व्‍यक्‍त करत म्‍हणाले, ‘‘अलीकडच्‍या काळात स्‍मशानभूमीमध्‍येही जागा उपलब्‍ध नसल्‍याने प्रतीक्षा करावी लागते. मृतात्‍म्‍याला स्‍वर्गात अथवा नरकात कुठे स्‍थान मिळेल ?’ हे ठाऊक नाही; मात्र त्‍याचा संतांच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे ‘शेवटचा दिवस गोड व्‍हावा’, असे वाटते. प्रत्‍येक व्‍यक्तीचा किमान शेवट तरी सुखद व्‍हावी.’’ त्‍यांची चर्चा ऐकून मनामध्‍ये पुढील विचारप्रक्रिया झाली.

‘प्रत्‍येक मनुष्‍यप्राण्‍याचे जीवन न्‍यूनाधिक प्रमाणात संघर्ष करतच व्‍यतित होत असते. जीवन संघर्षमय असण्‍यामागे काय कार्यकारणभाव आहे ? मनुष्‍यजन्‍माचा मूळ उद्देश आणि महत्त्व काय ? हे जाणून घेतल्‍यास संघर्षमय जीवनाविषयी विशाद वाटणार नाही. संतांच्‍या सांगण्‍यानुसार ‘शेवटचा दिवस गोड व्‍हावा’, याचा नेमका भावार्थ काय ? त्‍यांनी ते वाक्‍य कुठल्‍या संदर्भात म्‍हटले आहे ? हेच सर्वसामान्‍य हिंदूंना ठाऊक नाही. त्‍यामुळे ते संतांच्‍या या वचनाला सामान्‍य जनतेच्‍या जीवनातील प्राप्‍त संघर्षमय परिस्‍थितीशी जोडू पहात आहेत. ‘संतांच्‍या बोलण्‍याचा शब्‍दार्थ न घेता भावार्थ समजून घेणे आवश्‍यक असते’; मात्र धर्मशिक्षणाअभावी हिंदूंना याची जाणीव नाही; त्‍यामुळेच उपरोक्‍त विधाने सर्रास केली जातात. संत किंवा गुरु हे ईश्‍वराचे सगुण रूप असतात. संत किंवा गुरु समाजाला साधना, उपासना सांगून अध्‍यात्‍माची शिकवण देतात. ‘मोक्षप्राप्‍तीच्‍या मार्गावर वाटचाल करतांना योग्‍य-अयोग्‍य काय ?’, याविषयी संत साधकांना मार्गदर्शन करत असतात. असे असतांना ‘शेवटचा दिवस गोड व्‍हावा’ या संतांच्‍या वचनाचा नेमका भावार्थ काय ? हे समजून घेणे आवश्‍यक आहे. ‘साधना करतांना उपास्‍य देवतेचे नामस्‍मरण सतत व्‍हावे’, हेच आपले अंतिम ध्‍येय असावे’, अशी संतांची शिकवण असते. त्‍यानुसारच ‘मनुष्‍याच्‍या अंतिम समयी मुखी भगवंताचे नाम आणि डोळ्‍यांसमोर भगवंताचे रूप असावे. इतर कुठल्‍याही विषयासक्‍त गोष्‍टींचे विचार मनामध्‍ये असू नयेत; जेणेकरून मरणोपरांत जीवाला पुढची गती, म्‍हणजे पुढील जन्‍म मिळणे सुलभ होईल’, असे संत सांगतात. अंतिम समयी विषयांचे विचार, अपूर्ण राहिलेल्‍या इच्‍छा, वासना मनात राहिल्‍यास जीवाला जडत्‍व येऊन जीवाचा पुढील प्रवास अत्‍यंत कठीण होतो. त्‍यामुळे वरील वचनांचा शब्‍दार्थ जरी ‘जीवनाचा शेवट सुखद व्‍हावा’, असा असला, तरी हिंदूंनी त्‍या वचनांच्‍या भावार्थामध्‍ये दडलेले जीवन-मृत्‍यूचे उपरोक्‍त मर्म जाणून घेणे आवश्‍यक आहे. संतांच्‍या बोलण्‍याचा, लिखाणाचा, प्रसंगी रागावण्‍याचा शब्‍दार्थ आणि भावार्थ यांमध्‍ये असलेला भेद किंवा गल्लत न्‍यून व्‍हावी, यादृष्‍टीने समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्‍यक आहे.’

– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा.