धारावी (मुंबई) येथे ‘नशामुक्ती भारत अभियान’ अंतर्गत ‘व्यसनमुक्त फेरी’ काढली !

मुंबई – धारावी विभागात अमली पदार्थ आणि व्यसने यांचे वाढते प्रमाण पहाता व्यसनी व्यक्ती अन् व्यसनी पदार्थ विक्रेते यांना त्यापासून परावृत्त करणे आवश्यक आहे. त्यांच्यामध्ये प्रबोधन करण्याच्या उद्देशाने ‘नशामुक्त भारत अभियाना’च्या अंतर्गत धारावी पोलीस ठाणे, नशामुक्त धारावी अभियान, स्थानिक धारावीकर नागरिक, विविध संस्था, संघटना आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने १५ डिसेंबर या दिवशी शीव रेल्वेस्थानक ते ९० फूट मार्ग येथे ‘व्यसनमुक्ती फेरी’चे आयोजन करण्यात आले होते.

व्यसनमुक्ती फेरीत सहभागी कार्यकर्ते

फेरीचे नेतृत्व धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे, ‘नशाबंदी मंडळा’च्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास, ‘धारावी नशामुक्त संघटने’चे पदाधिकारी-कार्यकर्ते, ‘नशाबंदी मंडळा’चे कार्यकारिणी सदस्य – राष्ट्रीय प्रशिक्षक बॉस्को डिसोजा, सामाजिक कार्यकर्ते विनोद साडविलकर यांनी केले. स्थानिक नागरिकांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून फेरीला प्रारंभ झाला.

फेरीमध्ये व्यसनांचे विदारक रूप दाखवणारी चित्रे आणि घोषवाक्ये यांचे फलक जागृतीचा संदेश देत होते. स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेऊन धारावी नशामुक्त अभियानात योगदान देत अमली पदार्थमुक्त धारावी करण्यासाठी सक्रीय रहाण्याचा विश्वास व्यक्त केला. धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांनी उपस्थितांना अमली पदार्थ मुक्तीची शपथ देऊन ‘सर्व स्थानिक नागरिकांनी धारावी नशामुक्त करण्यासाठी सक्रीय सहभाग द्यावा’, असे आवाहन केले. अशी माहिती सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांनी दिली आहे.