जनावरांची अमानुष वाहतूक रोखण्यासाठी केलेले उपाय स्पष्ट करावेत !

मुंबई उच्च न्यायालयाचा परिवहन विभागाला आदेश

संग्रहित छायाचित्र

मुंबई – मुंबईत जनावरे किंवा पशूधन यांची अमानुष पद्धतीने वाहतूक केली जाते. या प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत ?, हे परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. जनावरे किंवा पशूधन यांची विशेष पद्धतीने वाहतूक करण्यासंबंधीच्या केंद्रीय कायद्यातील प्रावधानांची कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी ‘विनियोग परिवार ट्रस्ट’ने केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपिठाने उपरोक्त आदेश दिले.

प्राण्यांची अमानुष पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे दाखवणारी काही छायाचित्रेही याचिकाकर्त्यांनी न्यायालयात सादर केली. त्याची नोंद घेऊन नियमांची कार्यवाही का केली जात नाही ? कायदे केवळ पुस्तकांपुरते आणि न्यायाधीश-अधिवक्त्यांच्या ग्रंथसंग्रहालयापुरते मर्यादित आहेत का ? असा संतप्त प्रश्न न्यायालयाने केला.