नवी देहली : बांगलादेश आता ‘फॅसिस्ट’ (मूलतत्त्ववादी) राजवटीच्या विळख्यात सापडला आहे, जिथे लोकांचे लोकशाही हक्क संपुष्टात आले आहेत. महंमद युनूस आणि त्यांचे सहकारी हे देशातील जुलै-ऑगस्टमधील अशांततेचे मुख्य सूत्रधार आहेत. बांगलादेशाच्या संसदेवर आक्रमण करणारे आणि आतंकवादी यांची या सरकारने सुटका केली. या सूत्रावरून सरकारचा देशात अशांतता पसरवण्यातील सहभाग सिद्ध होतो, अशा शब्दांत बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेश सरकारवर टीका केली. त्या लंडन येथील अवामी लीगच्या समर्थकांच्या मेळाव्याला ऑनलाईन मार्गदर्शन करतांना बोलत होत्या.
शेख हसीना पुढे म्हणाल्या की,
१. अवामी लीगचे १ सहस्राहून अधिक नेते आणि कार्यकर्ते मारले गेले आहेत, त्यांची घरे लुटली गेली आहेत. विद्यार्थी आणि पोलीस यांची हत्या, जाळपोळ आणि अत्याचार यांमागे सध्या अस्तित्वात असलेल्या सरकारचा हात आहे. आपल्या देशाची हानी करणार्या मारेकरी आणि षड्यंत्रकर्ते यांना कायद्यानुसार उत्तरदायी धरले जाईल. ज्याप्रमाणे आम्ही युद्ध गुन्हेगारांवर कारवाई केली, त्याचप्रमाणे आजच्या गुन्हेगारांना शिक्षा दिली जाईल. कायद्यापासून कुणीही सुटू शकत नाही. आपल्या देशाच्या इतिहासातील हा काळा अध्याय कायमचा टिकणार नाही.
२. भ्रष्टाचारविरोधी आयोगाने युनूस आणि त्यांची संस्था असलेल्या ग्रामीण बँकेशी संबंधित आर्थिक अनियमिततेच्या आरोपांकडे दुर्लक्ष केले आहे. युनूस यांच्या हालचालींवर आयोगाचे कोणतेही नियंत्रण नाही, असा आरोपही शेख हसीना यांनी केला.