‘ज्योतिष सेवेतील साधकांनी माझ्या जन्मपत्रिकेचा अभ्यास करून मला रवि आणि शनि या ग्रहांचा जप ठराविक संख्येने करण्यास अन् नंतर ग्रहांची शांती करण्यास सांगितली. आरंभी रवि आणि शनि या ग्रहांचे जप करतांना मला पुष्कळ त्रास झाला. २५.९.२०२४ या दिवशी माझा दोन्ही ग्रहांचा जप पूर्ण झाला. त्यानंतर ग्रहशांती होईपर्यंत दोन्ही जप प्रतिदिन प्रत्येकी १ माळ करण्यास मला सांगण्यात आले. त्यानुसार ते जप मी सध्या करत आहे. सांगितलेली जपसंख्या पूर्ण झाल्यानंतर दोन्ही ग्रहांचे जप करतांना मला त्रास झाला नाही. असे साधारण १५ दिवस झाले. त्यानंतर म्हणजे १०.१०.२०२४ पासून हे जप करतांना मला पुढीलप्रमाणे जाणवत आहे.
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2023/09/16004444/2023_May_Rajashree_Sakhdev_H_C.jpg)
१. रवीचा जप एका लयीत होतो.
२. शनीचा जप करतांना आलेल्या अनुभूती
अ. प्रथम जपाची पहिली ओळ आणि नंतर दुसरी ओळ एका लयीत म्हटली जाते. असा जप बराच वेळ होतो. कधी दोन ओळींचा जप म्हणतांना ‘मी झोके घेत आहे आणि त्यावर जप म्हणत आहे’, असे मला जाणवते.
आ. कधी जपाचे एकूण ४ भाग होऊन श्वासावर त्यांचे आलंबन होते.
इ. जप करतांना माझा भाव जागृत होतो.
ई. हा जप शांतपणे होतो. त्या वेळी माझ्या मनात कोणतेच विचार नसतात. त्यामुळे जप सहजतेने होतो आणि ‘जप कधी पूर्ण होतो’, ते कळत नाही.
उ. या जपातून मला पुष्कळ आनंद मिळतो.
ऊ. ‘एकदा जप केला, तरी तो प्रत्यक्षात पुष्कळ संख्येने होतो’, असे मला जाणवते. ‘एका जपाच्या अनेक प्रतिकृती (रेप्लिका) तयार होतात (आवृत्त्या होतात)’, असे मला वाटते.
ए. जप १०८ वेळा करायचा असल्याने मी तो मोजून करते; परंतु ‘आणखी जप करत रहावा’, असे मला वाटते.
३. शनीचा जप करतांना तो स्वतःच्या पाठीमागे जाऊन पडून त्याचे डोंगर तयार होणे आणि पाठीमागे शनिदेवाचे अस्तित्व जाणवणे
२२.१०.२०२४ या दिवशी शनीचा जप करतांना माझा जप सहजतेने होत होता. जप करतांना माझे मन पुष्कळ शांत होते. माझ्या मनात कोणतेच विचार नव्हते. काही वेळाने माझ्या लक्षात आले, ‘हा जप माझ्या पाठीमागे जाऊन पडत आहे आणि त्या जपाचे डोंगर तयार होत आहेत.’ असे अनेक डोंगर तयार झालेले होते. नंतर माझ्या पाठीमागे मला शनिदेवाचे अस्तित्व जाणवले आणि माझा भाव जागृत झाला. मला शनिदेवाचे रूप इत्यादी दिसले नाही; पण त्यांचे अस्तित्व मात्र जाणवले.
साधिकेने विचारलेला प्रश्न![]() कु. राजश्री : जप माझ्या पाठीमागे का पडला ? शनिदेवाचे अस्तित्व माझ्या पाठीमागे का जाणवले ? उत्तर : ‘तुमच्या पत्रिकेत सांगितलेली शनिदेवाच्या ग्रहाची शांती करण्यासाठी आवश्यक असलेला त्याचा जप तुमच्याकडून पूर्ण झालेला असल्याने त्यानंतर तुम्ही त्याचा प्रतिदिन करत असलेला १ माळ जप हा अतिरिक्त असल्याने तो शिल्लक पडत आहे; म्हणून तो तुमच्या मागे जात आहे, तसेच शनिदेवाचे अस्तित्वही तुम्हाला तुमच्या मागे जाणवले. तुमची शनिदेवाची उपासना पूर्ण झाल्याने तो तुमच्या समोर तुम्हाला दिसला नाही.’ – (सद़्गुरु) डॉ. गाडगीळ (१३.११.२०२४) |
४. २३.१०.२०२४ या दिवशी शनीचा जप करतांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
अ. आरंभी माझा जप पुष्कळ जलद गतीने झाला. त्या वेळी ‘जलद गतीने जाणार्या आगगाडीत बसल्यावर जसे जाणवते’, तसे मला वाटले.
आ. साधारण ५० इतका जप झाल्यानंतर जप संथ गतीने होऊ लागला. त्या संथ गतीवर माझे आलंबन होऊ लागले. त्या वेळी जप करतांना मला आनंद मिळू लागला.
इ. नंतर माझे श्वासावर आलंबन होऊन जप होऊ लागला. तोपर्यंत माझा १०० इतका जप झाला होता.
ई. त्यानंतर मी केवळ श्वासावर लक्ष दिले. त्या वेळी माझ्या हातातील जप मोजण्याच्या यंत्रावर असलेली बोटांची पकड सैल झाली.
उ. नंतर ‘पहुडून जप करायला हवा’, असे वाटल्याने आणि १०८ ही जपसंख्या पूर्ण झालेली असल्याने मी पलंगावर पहुडून केवळ श्वासावर लक्ष केंद्रित केले. (या दिवशी मी खोलीत भूमीवर बसून जप करीत होते. ‘शरिराला भूमीवर बसण्यासाठी लागणारी शक्ती न वापरता पलंगावर पहुडून जप केला, तर माझी शक्ती वाचेल’, या विचाराने मी पहुडून जप केला.)
ऊ. पुढे साधारण ३० मिनिटे माझे लक्ष श्वासावर केंद्रित झाले. त्या वेळी माझे मन पुष्कळ शांत झालेले होते. ‘वेळ कधी संपला’, हे कळले नाही. ३० मिनिटांनी एक फोन आल्याने ‘इतका वेळ झाला आहे’, हे मला कळले.
५. जपसंख्या मोजण्यासाठी मी प्लास्टिकचा ‘काऊंटर’ (जप मोजण्याचे यंत्र) वापरते. त्या यंत्राचा जेथे हाताच्या बोटांशी संपर्क येतो, तो भाग पिवळा झाला आहे.
६. वैखरीतून आणि मनातून जप करण्यातील भेद
वैखरीतून किंवा पुटपुटून जप करण्यापेक्षा मनातून जप केल्याने तो पुष्कळ गतीने होतो. त्याने माझे मन लवकर स्थिर होते. मन लगेच अंतर्मुख होते. माझ्या मनाला शांतता जाणवते.
७. कृतज्ञता
जन्मपत्रिकेचा अभ्यास करून ज्या ग्रहांचा जितक्या संख्येने जप करण्यास सांगितला, तो करतांना त्रास झाला, म्हणजेच तो जप योग्य असल्याने जप करण्यात अडचणी आल्या. ठराविक संख्येने जप पूर्ण झाल्यानंतर तोच जप पुढे चालू ठेवल्यास मन एकाग्र होण्यासंदर्भातील अनुभूती आल्या. यावरून ‘आपले ज्योतिषशास्त्र किती प्रगल्भ आणि अचूक आहे’, हे लक्षात येते. हे सर्व अनुभवायला देऊन त्याचा अभ्यास करवून घेणार्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’
– सुश्री (कु.) राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१०.२०२४)
|