Foreign Secretary Vikram Misri : बांगलादेशासमवेतच्या बैठकीत उपस्थित केले हिंदूंच्या सुरक्षेचे सूत्र !

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री बांगलादेशाच्या दौर्‍यावर

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री

ढाका (बांगलादेश) – भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री बांगलादेशाच्या दौर्‍यावर पोचले आहेत. त्यांनी येथे बांगलादेशातील अंतरिम सरकारमधील परराष्ट्र सल्लागार तौहिद हुसेन यांनी भेट घेत चर्चा केली. या दोघांनी दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याची आशा व्यक्त केली. ‘आजच्या चर्चेमुळे आम्हाला दोघांनाही आमच्या संबंधांचा आढावा घेण्याची संधी मिळाली आहे’, असे विक्रम मिस्त्री यांनी सांगितले. मिस्री यांनी चर्चेच्या वेळी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेच्या सूत्रावर भर दिला.

१. ढाका येथे पोचल्यानंतर विक्रम मिस्त्री यांनी बांगलादेशाचे परराष्ट्र सचिव महंमद जशीम उद्दीन यांची वैयक्तिक भेट घेतली. यानंतर दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांची औपचारिक बैठक झाली.

२. यावर्षी ऑगस्टमध्ये शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यापासून बांगलादेश राजकीय अस्थिरतेत आहे. अल्पसंख्यांकांवर आक्रमणे झाल्याच्या घटनांवर भारताने चिंता व्यक्त केली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर विक्रम मिस्री बांगलादेश दौर्‍यावर गेले आहेत.

३. पंतप्रधान शेख हसीना यांच्या हकालपट्टीनंतर भारताचा बांगलादेशातील हा पहिलाच उच्चस्तरीय दौरा आहे. मिस्री बांगलादेशाच्या अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांचीही शिष्टाचार म्हणून भेट घेणार आहेत.

संपादकीय भूमिका

बांगलादेशामध्ये हिंदूंवर सरकार पुरस्कृत आक्रमणे होत असल्याने चर्चा करून काही साध्य होणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळे भारताला याच्या पुढेच जाऊनच हिंदूंचे रक्षण करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. याची सिद्धता भारताने केली आहे का ? हाच प्रश्‍न आहे !