झुरळ (कॉकरोच) पार्टीचे तेच ते अराजकतावादी ‘टेम्प्लेट’ (साचा)… !

स्वतःची विश्वासार्हता रसातळाला गेल्यामुळे निवडणुकांमध्ये विजय मिळवून घटनात्मक मार्गाने आपण कधीही सत्ता मिळवू शकत नाही, हे भारतातील आणि जगभरातील साम्यवाद्यांच्या कधीच लक्षात आले आहे; म्हणूनच लोकशाहीतील स्वातंत्र्याचा वापर करून लोकशाही आणि राज्यघटना यांनाच नष्ट करत अराजक आणि हिंसा यांच्या मार्गाने सत्ता हस्तगत करण्याचा एक मार्ग त्यांनी विकसित केला आहे, ज्याचे नाव आहे, ‘अल्टर्नेटिव्ह पॉलिटिक्स’ किंवा ‘पर्यायी राजकारण.’

१. ‘झुरळ पार्टी’चा उगम : साम्यवाद्यांनी सत्तापालटासाठी वापरलेले नेहमीचे ‘टेम्प्लेट’ !

‘राजकीय पक्ष, न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, सुरक्षादले यांसारख्या घटनात्मक संस्थांची सतत अपकीर्ती करून, त्यांच्याविषयी शंका निर्माण करत, जनतेचा सनदशीर मार्गावर काडीमात्रही विश्वास उरणार नाही अशी परिस्थिती निर्माण करायची; यानंतर जनतेचे तारणहार आणि आशास्थान म्हणून आपल्याच कंपूतील काही ‘एन्.जी.ओज्’ (स्वयंसेवी संस्था) आणि ‘ॲक्टिव्हिस्टस्’ (सामाजिक कार्यकर्ते) यांना उभे करायचे; ‘मॅगसाय’से छाप पुरस्कार वगैरे देऊन त्यांचे प्रचंड महिमामंडन करायचे; एखादा भावनिक मुद्दा घेऊन आंदोलन चालू करायचे किंवा इतर कुणी चालू केलेले आंदोलन ‘हायजॅक’ (बळकावणे) करायचे; ज्यांच्याविषयी लोकांना सहज सहानुभूती वाटेल अशा महिला, शेतकरी, विद्यार्थी यांपैकी कुठल्या तरी गटाला पुढे करायचे; या आंदोलनाविरुद्ध बळाचा वापर करण्यासाठी काहीही करून सरकारला भाग पाडायचे आणि एकदा का या कारवाईत काही जणांचा मृत्यू झाला की, सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन अराजक अन् हिंसेचा आगडोंब माजवून सत्तापालट घडवून आणायचा…’, ही ‘टेम्प्लेट’ साम्यवाद्यांनी गेल्या काही दशकांपासून विकसित केली आहे.

वर्ष २०१०-२०११ मध्ये झालेल्या ‘अरब स्प्रिंग’पासून कालपरवा झालेल्या श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळ येथील सत्तापालटांसाठी हीच ‘टेम्प्लेट’ वापरण्यात आली. हे तीनही देश भारताचे शेजारी आहेत, हा योगायोग नक्कीच नाही; कारण खरे लक्ष्य भारत हेच आहे. यासाठी कधी केजरीवाल, तर कधी सोनम वांगचुक असे चेहरे पुढे करून ही ‘टेम्प्लेट’ कार्यान्वित करण्याचे प्रयत्न आजवर झाले आहेत. ते अयशस्वी ठरल्यानंतर आता ‘झुरळ पार्टी’चा (‘कॉकरोच पार्टी’चा) पत्ता टाकण्यात आला आहे. देशातील विरोधी पक्ष आणि ‘लेफ्ट-लिबरल इकोसिस्टम’ (साम्यवादी आणि उदारमतवादी यंत्रणा) इतकी दिवाळखोर झाली आहे की, ‘आता मोदी सरकार गेलेच’, असे समजून ही मंडळी हुरळून गेली आहेत.


मुखवट्यांमागचा अराजकतावादी चेहरा ओळखायला हवा !


भ्रष्टाचार, बेरोजगारी हे खरोखरच महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि त्यांचा गांभीर्याने विचार व्हायला हवा, हे खरेच आहे; पण त्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता, ‘क्वांटम कॉम्प्युटिंग’, ‘सेमीकंडक्टर’ अशा भविष्यवेधी तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण, कौशल्यविकास अशा गोष्टींवर भर असणारी रचनात्मक जनचळवळ चालू व्हायला हवी, तरच तरुणांना अपेक्षित असलेल्या सुधारणा घडून येतील आणि देशाची प्रगती होईल; पण परिस्थितीत सुधारणा करणे, हे साम्यवाद्यांचे उद्दिष्टच नाही अन् देशाची प्रगती हे तर अजिबातच नाही. उलट त्यांचे म्हणणे असते की, ‘परिस्थिती जितकी सुधारेल तितकी क्रांती दूर जाईल. परिस्थिती जितकी बिघडेल आणि रसातळाला जाईल, तितक्या लवकर तरुण क्रांतीसाठी सिद्ध होतील’; पण अशा अराजकतावादी क्रांतीतून आजवर कुठेही, कधीही आणि काहीही चांगलं घडलेले नाही; म्हणूनच तरुणांनी राज्यघटना, लोकशाही, शांततामय आंदोलन… वगैरे मुखवट्यांमागचा अराजकतावादी चेहरा ओळखायला हवा आणि त्याच्या विध्वंसक परिणामांपासून लांबच रहायला हवे.

– श्री. अभिजित जोग

२. ‘कॉकरोच जनता पार्टी’ची असत्य विधाने आणि त्यांचे खंडण

अमेरिकेतील अभिजित दिपके आणि त्यांचे ऑस्ट्रेलियातील एक सहकारी यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’चा प्रारंभ केला. हा पक्ष आहे कि चळवळ ? याविषयी मतभेद  आहेच; पण हे जे काही आहे त्याला समाजमाध्यमांवर विक्रमी ‘फॉलोअर्स’ (अनुयायी) मिळावेत यासाठी प्रचंड पैसा ओतण्यात आला. अमेरिकेतील ‘टॉपिका’ या १ लाख २६ सहस्र लोकवस्तीच्या गावातून त्यांना ८ लाख ६० सहस्र फॉलोअर्स मिळाले आहेत ! असे ‘बॉट्स’ (विकत) घेण्यासाठी लागणारा पैसा ‘बेरोजगार विद्यार्थ्यांकडे’ कुठून आला ?, हे गौडबंगालच राहिले. यानंतर नक्षली आणि जिहादी यांचे खुले समर्थक असलेल्या ३ उच्चभ्रू तरुणांना या पक्षाचे (कि चळवळीचे) प्रवक्ते म्हणून घोषित करण्यात आले. या कॉकरोच जनता पार्टीचे प्रवर्तक आणि प्रवक्ते यांच्या आजवरच्या विधानांवरून यांचा पायाच खोटेपणावर आधारित असल्याचे स्पष्ट होते. कसे ते बघूया.

श्री. अभिजित जोग

अ. असत्य क्र. १

‘देशात क्रांती करण्यासाठी ६ जून या दिवशी अभिजित दिपके भारतभूमीत अवतरणार, त्या वेळी तरुणांनी पक्षांचे झेंडे बाजूला ठेवून विमानतळावर यावे’, असे आवाहन करून ही चळवळ (?) अराजकीय असल्याचा भ्रम निर्माण करण्यात आला. यातला खोटेपणा खालील उदाहरणांवरून स्पष्ट होतो –

१. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलेल्या ‘झुरळ’ या उल्लेखामुळे निर्माण झालेला राग केंद्र सरकारकडे वळवण्यामागे कुठले अराजकीय कारण आहे ?

२. ‘नीट’ परीक्षेतील गदारोळामुळे धर्मेंद्र प्रधान यांच्याविरुद्ध राग हाच मुद्दा असेल, तर दिपके यांनी ‘भाजपला अनफॉलो करा’, हे सांगण्यात कुठली अराजकीयता आहे ?

३. ‘झुरळ पार्टीचे सगळे प्रवर्तक आणि प्रवक्ते झाडून आम आदमी पक्षाचे (‘आप’चे) कार्यकर्ते आहेत’, हा अराजकीय योगायोग मानायचा का ?

या सगळ्यावरून हे स्पष्ट होते, ‘सूर्यकांत और धर्मेंद्र प्रधान तो बहाना है, मोदी सरकार असली निशाना है.’ झुरळ पार्टी पूर्णतः राजकीय आहे. भेद इतकाच की, त्यांचे राजकारण घटनात्मक पद्धतीचे नाही, तर ‘अल्टर्नेटिव्ह’ पद्धतीचे, म्हणजेच अराजकतावादी आहे.

आ. असत्य क्र. २

दिपके यांनी असा आव आणला आहे की, ते फार मोठा धोका पत्करून भारतात येत आहेत. ‘मी माझे भवितव्य राज्यघटनेच्या हाती सोपवून भारतात येत आहे’, असे भावनेने ओथंबलेले संवाद म्हणत त्यांनी ‘व्हिक्टिम कार्ड’ (पीडितांची खेळी) खेळायला प्रारंभ केला आहे; पण त्यांच्या प्रवक्त्यांनी जे सांगितले, त्यावरून यांचा घटनात्मक मार्गावर थोडाही विश्वास नाही, हे स्पष्ट होते.

‘६ जूनपासून जंतर मंतर येथे आम्ही धर्मेंद्र प्रधान यांच्या त्यागपत्रासाठी आंदोलन करणार’, असे या प्रवक्त्यांनी सांगितले. (६ जून या दिवशी हे आंदोलन पार पडले. – संपादक) अशा आंदोलनासाठी पोलीस अनुमती आवश्यक असते आणि त्यासाठी एक आठवडा आधी अर्ज करावा लागतो, हे लक्षात आणून दिले. त्यानंतर त्यांनी सांगितले की, ६ जून या दिवशी दिपके अमेरिकेहून भारतात पोचले की, ते सरळ पोलीस ठाण्यामध्ये जाऊन अनुमती मागतील; कारण अशी अनुमती पक्षाच्या वतीने तेच मागू शकतात. आता ज्या पक्षात / चळवळीत साधा पोलीस अनुमतीचा अर्ज करण्याचे अधिकारही पक्ष प्रमुखाच्या व्यतिरिक्त इतर कुणाकडे नाहीत, त्या पक्षात नावापुरतीही लोकशाही अस्तित्वात नाही, हे स्पष्ट आहे.

याखेरीज त्यांनी हेही सांगितले की, ‘प्रोटेस्ट’ (आंदोलन) करण्यासाठी असा पोलीस अनुमतीचा कायदाच त्यांना मान्य नाही. याचा अर्थ ‘कायद्याचे राज्य’ आणि ‘राज्यघटनेची चौकट’ या संकल्पनाच त्यांना अमान्य आहेत.

थोडक्यात काय, तर दिपके पोलीस ठाण्यामध्ये पोचले की, अनुमतीच्या प्रक्रियेचे पालन न केल्यामुळे त्यांचा अर्ज अमान्य होणार; मग ‘देशात लोकशाही नाही, आता रस्त्यावर उतरण्याविना आमच्याकडे पर्याय नाही’, असे म्हणून अराजक माजवण्याचा प्रयत्न केला जाणार, हीच योजना दिसते. त्यांच्या एका समर्थकाने ‘येतांना मिरपुडीचे स्प्रे वगेरे सामग्री घेऊन या’, असे आवाहन केलेच आहे. नुकतेच असे वाचनात आले की, ‘लोकांची गैरसोय होईल, म्हणून कुणीही विमानतळावर येऊ नये’, असे दिपके यांनी घोषित केले होते. हे कितपत खरे आहे आणि असल्यास त्यानंतरचे आवाहन काय असेल, हे बघणे महत्त्वाचे आहे.

इ. असत्य क्र. ३

त्यांचे असे म्हणणे आहे की, त्यांचे आंदोलन तरुण विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे. खरेच असे असते, तर २१ जून या दिवशी चालू होणारी ‘नीट’ परीक्षा पार पडल्यानंतर त्यांनी हे आंदोलन चालू केले असते. ६ जूनला आंदोलन चालू करून ते विद्यार्थ्यांच्या सिद्धतेत विघ्न आणून त्यांची हानीच करणार आहेत. विद्यार्थ्यांचे हित हे मुळात त्यांचे उद्दिष्टच नाही. ‘अनुमती न घेता आंदोलन चालू करायचे, त्याला हिंसक वळण द्यायचे, त्यातून पोलिसांनी काही कारवाई करून त्यांना अटक केल्यास विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा हानी होईल आणि त्यांच्या मनातील अप्रसन्नता अन् राग यांचा भडका उडून ते अधिकाधिक हिंसेसाठी सिद्ध होतील’, असे हे साम्यवाद्यांचे ‘कॉपीराईट’ (स्वत्वाधिकार) असलेले ‘टेम्प्लेट’ आहे.

– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे. (५.६.२०२६)