माझिया मराठीचे नगरी
मराठीसारख्या भारतीय भाषा या वैश्विक ज्ञानाच्या भाषा नसल्याचे सांगितले गेल्याने इंग्रजी भाषेचे स्तोम भारतात अधिक माजले; परंतु मराठीसारख्या भारतीय भाषांमध्ये विश्वातील नव्हे, तर ब्रह्मांडातील ज्ञान उपलब्ध आहे, हे जेव्हा विश्वाला लक्षात येईल, तेव्हा भारतीय भाषांना पर्याय नसेल ! किंबहुना गेल्या अनेक शतकांच्या प्रदीर्घ इतिहासात विविध देशांतील अनेक विद्वानांना हे ठाऊक झाल्यामुळेच त्यांनी ‘संस्कृत’चा अभ्यास करून त्यातील ‘ज्ञान’ मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच पुढे आधुनिक विज्ञानातीलही अनेक शोध लागल्याचे लक्षात आले.
संतसाहित्याने मराठी भाषेला खर्या अर्थाने ‘ज्ञान’भाषा म्हणून परिपूर्ण केले आहेच. आता आधुनिक काळात मराठी ही वैश्विक ज्ञानाची (म्हणजे तांत्रिक विज्ञानाची !) भाषा होण्यासही कुठे न्यून पडू नये म्हणून शासनाच्या स्तरावर तांत्रिक, वैद्यकीय आदी अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके सिद्ध करणे, विविध विषयांचे कोश सिद्ध करणे आदी उपक्रम चालू आहेत, त्याचप्रमाणे गेली ४५ वर्षे ‘मराठी विश्वकोशा’चे कामही चालू आहे, जे मराठीला वैश्विक ज्ञानगंगा होण्यातील त्रुटी भरून काढण्यास उपयुक्त ठरणार आहे.
मराठी भाषेला अभिजात (समृद्ध) दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर संस्कृतपाठोपाठ क्रमांक एकची सात्त्विक भाषा असणार्या ‘मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो ?’, याचे विचारमंथन या मालिकेतून करण्याचा प्रयत्न आहे. त्या निमित्ताने प्रथम ‘शासन मराठी भाषेच्या विकासासाठी काय काय करत आहे ?’, त्याची तोंडओळख मागील काही लेखांमधून आपण करून घेत आहोत. यामध्ये आपण आतापर्यंत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी शासनाने केलेले प्रयत्न, शासनाच्या ४ महत्त्वाच्या संस्थांपैकी मराठी भाषासंचालनालय, तसेच राज्य मराठी विकास संस्था यांच्या कार्याची थोडक्यात व्याप्ती समजून घेतली. या भागामध्ये आपण शासनाच्या ‘महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ’ या संस्थेचे कार्य थोडक्यात समजून घेऊ.
(भाग १)
१. स्थापना
विश्व भाषा म्हणून ऐट मिरवणार्या इंग्रजी भाषेत ‘एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका’ किंवा ‘विकीपिडिया’ हे ज्ञानकोश जगप्रसिद्ध आहेत. यात जगातील सर्व गोष्टींचे ज्ञान (खरेतर याला माहिती म्हणायला हवे !) उपलब्ध असते. हे ज्ञानकोश मायाजालावरही उपलब्ध असल्याने ते सतत अद्ययावत्ही होत असतात. याच धर्तीवर मराठीतही विश्वकोश सिद्ध करण्यासाठी वर्ष १९८० मध्ये महाराष्ट्र शासनाकडून ‘महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा’ची स्थापना करण्यात आली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे विश्वकोशाचे प्रथम संपादक होते.
विशेष म्हणजे अलीकडच्या काळातील विश्वकोश निर्मितीच्या कार्यापूर्वी ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश’ हा अनेक शास्त्रांचे ज्ञान मराठी भाषेतून करून देणारा प्रकल्प श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी स्वबळावर हाती घेऊन पूर्ण केला होता. वर्ष १९२९ मध्ये त्यांनी एकट्याने तब्बल २२ खंडांचे काम पूर्ण केले होते.
२. उद्देश
आधुनिक जग हे ज्ञान आणि माहिती यांचे जग म्हणून ओळखले जाते. यामध्ये ज्ञाननिर्मिती, ज्ञानसंवर्धन आणि ज्ञानप्रसार या तिन्ही गोष्टींचा समावेश होतो. याचा विचार करून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अंतर्गत मराठी विश्वकोशाचा प्रकल्प हाती घेण्यात आला. ‘मानव्यविद्या (ज्या अभ्यास विषयातून मानव किंवा मनुष्य ही संज्ञा वेगळी करता येणार नाही, त्या सर्व ज्ञानशाखा – जसे भाषा, साहित्य, धर्म, तत्त्वज्ञान, सर्व कला इत्यादी यात येतात.), तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान या ज्ञानशाखांमध्ये जेवढे विषय असतील, त्या सर्वांची माहिती मराठी वाचकांना उपलब्ध करून द्यावी’, हे विश्वकोशाचे प्रमुख उद्दिष्ट होते. ‘मराठी विश्वकोशात जगातील सर्व विषयांचे सर्व शब्द उपलब्ध व्हावेत’, असा प्रयत्न असतो. मराठी विश्वकोशाच्या माध्यमातून मराठीचा प्रचार आणि प्रसार करून जिज्ञासू वाचक, संशोधक, अभ्यासक यांना जागतिक दर्जाचे ज्ञान अन् माहिती उपलब्ध करून देणे, हा मराठी विश्वकोशाचा प्रधान हेतू होता. मराठी विश्वकोशाची निर्मिती सर्वविषयसंग्राहक स्वरूपात करावी, असे ठरवण्यात आले.
३. निर्मितीचा रंजक इतिहास
महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि ज्ञाननिर्मिती यांचा विकास करण्याच्या उद्देशाने वर्ष १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य अन् संस्कृती मंडळाची स्थापना केली. आरंभी त्या अंतर्गत विश्वकोश निर्मितीचा प्रकल्प हाती घेण्यात आला. मंडळाचे प्रशासकीय कार्यालय मुंबईत, तर संपादकीय कार्यालय प्रसिद्ध अशा वाई (सातारा) तीर्थक्षेत्री आहे. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमीपूजन झाले होते. या प्रकल्पाचे काम चालू करण्यापूर्वी ‘एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका’ या कोशाचे संपादकीय कार्य, तसेच त्याची कार्यप्रणाली यांचा अभ्यास करण्यात आला. या सर्व कामात तर्कतीर्थांसमवेत मराठी भाषा आणि साहित्य यांचे अनेक मातब्बर अभ्यासक, समीक्षक आणि तज्ञ कार्यरत होते. विश्वकोशात कुठल्या विषयासाठी किती पृष्ठे ठेवायची ?, चित्रे कुठली घ्यायची ? आदींचा आराखडा ठरवण्यात आला.
अ. संदर्भ ग्रंथालय : विश्वकोशाची निर्मिती ही जागतिक पातळीशी समांतर असणार्या कोशानुरूप करावयाची असल्याने त्या दर्जाचे जागतिक संदर्भमूल्य असणारे ग्रंथालय उभे करण्यात आले. तत्कालीन भारतीय दूतावासांतील त्या त्या देशांनी त्यांच्या देशातील ज्ञान आणि माहिती यांचे अधिग्राह्य ग्रंथ ग्रंथालयास पाठवले. या सुसज्ज ग्रंथालयावरच विश्वकोशाच्या दर्जाची इमारत फळाला येणार होती.
आ. मुद्रणयंत्रणा : मुद्रणाची व्यवस्था हा त्या काळातील मोठा प्रश्न होता. वर्ष १९७२ मध्ये वाई येथील रास्ते वाड्यात मुद्रणालय उभे राहिले. विश्वकोशाचे संपादन आणि मुद्रण यांच्यात योग्य समन्वय होऊन विश्वकोशाचे कार्य चालू झाले.
इ. विषयनिश्चिती : मानव्यविद्या, तसेच विज्ञान आणि तंत्रविद्या हे मराठी विश्वकोशाचे दोन घटक ठरले असले, तरी नोंद म्हणून ज्या विषयांचा समावेश विश्वकोशात करावयाचा आहे, त्या घटकांची निश्चिती, त्याचे निकष ठरवायचे होते. यासाठी महाराष्ट्रीय संस्कृती, भारतीय संस्कृती आणि नंतर जागतिक परिप्रेक्ष्य असा प्राधान्यक्रम ठरवण्यात आला. अंतिमतः १८ सहस्र नोंद विषय ठरवण्यात आले. राज्य आणि देश यांतील अनेक तज्ञ मंडळींचा सहभाग यात लाभला.
४. पारिभाषिक शब्द सिद्ध करण्याचे आव्हान
(पारिभाषिक शब्द, म्हणजे एखादा विषय किंवा ज्ञानशाखा यांतील विशिष्ट संज्ञा वा संकल्पना यांसाठी वापरण्याचे येणारे शब्द, उदा. इतिहासात उदारमतवाद, जागतिकीकरण आदी संकल्पना असतात किंवा वैद्यकीय वा तंत्रज्ञान आदींमध्ये त्या त्या विषयाचे शब्द असतात.)
मराठी विश्वकोशात जगातील सहस्रो भाषांमध्ये विखुरलेल्या ज्ञान-विज्ञानाचे लेखन मराठी भाषेत करावयाचे होते. याचे लेखनकार्य करतांना मराठीतील त्या त्या विषयांच्या पारिभाषिक शब्दांची पुष्कळ अडचण होती. त्यासाठी प्रथम केंद्र सरकारने निर्माण केलेल्या पारिभाषिक शब्दसंग्रहाचा वापर करण्यात आला; मात्र मराठी भाषा अधिक समृद्ध व्हावी आणि तो तो विषय समर्पक परिभाषेतच वाचकांसमोर जावा, यासाठी मराठी विश्वकोशाने आधी परिभाषा कोशाची निर्मिती वर्ष १९७३ मध्ये केली. पालटत्या भाषिक वातावरणासह या परिभाषा संग्रहाच्या आधारे मराठी विश्वकोशातील घटकांचे लेखनकार्य करण्यात आले. जागतिक दर्जाच्या अनेकविध कोशांचा अभ्यास करून त्यांतील शब्दांसाठी मराठी शब्दांची घडण नव्याने करण्यात आली.
५. प्रकाशने
मराठी विश्वकोशाच्या पहिल्या ५ खंडांचे प्रकाशन वर्ष १९७६ मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या हस्ते झाले. वर्ष १९९४ मध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे निधन झाले. तोपर्यंत सर्व खंडांतील सर्व नोंदीचे लिखाण आणि १५ खंडांचे प्रकाशन झाले होते. वर्ष २००३ मध्ये तत्कालीन अध्यक्ष डॉ. श्रीकांत जिचकार यांनी तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या उपस्थितीत ‘विश्वकोश वार्षिकी’ या सर्वविषयक अद्ययावत् माहितीच्या वार्षिक अंकाचे प्रकाशन केले. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसाठी ही वार्षिकी उपयुक्त आहे.
६. सद्यःस्थिती
वर्ष २००८ मध्ये विश्वकोशाच्या १८ व्या खंडाचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले. वर्ष २०१९ मध्ये मंडळाची पुनर्ररचना करण्यात आली. आतापर्यंत मराठी विश्वकोशाचे २० खंड प्रकाशित झाले. जगातील इतर विश्वकोशांच्या तुलनेत मराठी विश्वकोशाला आंतराष्ट्रीय स्थान मिळवून ते महाजालावर (इंटरनेटवर) आणण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करण्यात आला. वर्ष २०१८ मध्ये विश्वकोशाचे ‘अॅप’ विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले. विश्वकोषाच्या आरंभीच्या संकल्पित आराखड्यानुसार काम पूर्ण झाले आहे. आता अजून ४ खंडांचे काम चालू आहे. ३५ वर्षे या कार्याशी संबंधित असणारे श्री. राजा दीक्षित हे वर्ष २०२१ पासून मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष आणि प्रमुख संपादक आहेत. (४.१२.२०२४)
(क्रमशः पुढच्या शनिवारी)
– सौ. रूपाली अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.