‘पोर्शे’ कार अपघात प्रकरणी येरवडा कारागृहातील १० आरोपींची एकत्रित चौकशी होणार !

विशेष न्‍यायालयाने अनुमती दिली !

पुणे – कल्‍याणीनगर ‘पोर्शे’कार अपघात प्रकरणातील येरवडा कारागृहातील सर्व आरोपींची एकत्रितपणे चौकशी करण्‍यास न्‍यायालयाने अनुमती दिली आहे. या प्रकरणी अन्‍वेषण अधिकारी साहाय्‍यक पोलीस आयुक्‍त गणेश इंगळे यांनी ४ डिसेंबर या दिवशी विशेष न्‍यायाधीश यू.एम्. मुधोळकर यांच्‍याकडे अर्ज केला होता. त्‍यावर सुनावणी होऊन चौकशीस अनुमती मिळाली.

अल्‍पवयीन मुलांच्‍या रक्‍ताचे नमुने पालटल्‍याच्‍या प्रकरणी १० जणांवर आरोपपत्र प्रविष्‍ट करण्‍यात आले होते. अपघातातील अल्‍पवयीन चालक हा बांधकाम व्‍यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे, तसेच गाडीतील सहप्रवासी मुलांच्‍या रक्‍ताच्‍या नमुन्‍यातही पालट करण्‍यात आला होता. अल्‍पवयीन मुलांचे रक्‍ताचे नमुने पालटून पुरावे नष्‍ट करण्‍यासाठी ‘ससून’मधील डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरि हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांना किती रक्‍कम दिली जाणार होती ? आमीष दाखवले होते का ? याचे अन्‍वेषण करायचे आहे. आरोपींची येरवडा कारागृहात एकत्रित चौकशी करायची, असा अर्ज न्‍यायालयात प्रविष्‍ट करण्‍यात आला होता.