(डिजिटल अरेस्ट म्हणजे ऑनलाईन माध्यमातून प्रशासकीय अधिकारी अथवा पोलीस असल्याचे भासवून पीडित व्यक्तीला घाबरवून त्याच्याकडून मोठी रक्कम हस्तगत करण्याचा प्रकार)
नवी देहली – येथील रोहिणी भागात रहाणार्या एका ७७ वर्षीय निवृत्त अभियंत्याला तब्बल १९ दिवस डिजिटल अरेस्ट करण्यात आले. या कालावधीत त्याच्याकडून १० कोटी ३० लाख रुपये लुटण्यात आले.
पीडित अभियंत्याने सांगितले की,
१. मला २५ सप्टेंबरला एका कुरिअर आस्थापनाकडून दूरभाष आला होता. आस्थापनाचा प्रतिनिधी असल्याचे भासवून त्या व्यक्तीने मला सांगितले की, माझ्या नावाने मुंबईहून चीनला पाठवलेल्या संशयास्पद पार्सलची माहिती आम्हाला मिळाली आहे. मी मला याविषयी काहीच माहिती नसल्याचे सांगितल्यावर त्याने मला मुंबई पोलिसांच्या अधिकार्याशी बोलण्यास सांगितले.
२. त्यानंतर मला एक व्हिडिओ कॉल आला. त्यात मुंबई पोलिसांच्या चिन्हासमोर एक माणूस बसलेला दिसला. त्या अधिकार्याने मला पार्सल घोटाळ्याची माहिती देऊन माझ्या बँक खात्याचा तपशील मागितला.
३. नंतर सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगून दुसर्या व्यक्तीने मला संपर्क केला आणि माझ्यावर आणखी दबाव आणला.
४. कुणी नसलेल्या खोलीत बसून संभाषण करण्यासाठी माझ्यावर दबाव आणण्यात आला. मला अनेक प्रश्न विचारले. मला काही कागदपत्रे दाखवण्यात आली. त्यांपैकी एकावर माझ्या आधार कार्डचा क्रमांक होता.
५. मला माझ्या मुलांना किंवा इतर कुणालाही या घटनेसंदर्भात न सांगण्याची धमकी दिली.
६. यानंतर अंमलबजावणी संचालनालयाचा अधिकारी असल्याचे सांगून एकाने मला साहाय्य करण्याचे आश्वासन दिले. यामुळे माझा गोंधळ आणखी वाढला.
७. या संपूर्ण प्रक्रियेला १९ दिवस लागले. या काळात माझ्याकडून ३ टप्प्यांत १० कोटी ३० लाख रुपये ऑनलाईन काढून घेण्यात आले.
८. यानंतर १४ ऑक्टोबरला घोटाळेबाजांनी दावा केला की, माझ्या भावाचीही चौकशी झाली पाहिजे. यामुळे माझ्यावर दबाव आला आणि मी भावालाही सहभागी केले.
९. माझ्या भावाला हा घोटाळा असल्याचे लक्षात आले आणि त्याने रोहिणी जिल्हा पोलीस सायबर सेलमध्ये तक्रार प्रविष्ट (दाखल) केली.