‘स्पॉट रिडक्शन’ ही ‍व्यायामाची पद्धत अवलंबल्याने शरिराच्या विशिष्ट भागातील चरबी न्यून होते का ?

निरोगी जीवनासाठी व्यायाम – भाग २५

या लेखाच्या आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/851666.html

‘शरिराच्या विशिष्ट भागाचा व्यायाम करून त्या भागातील चरबी न्यून करणे’, ही व्यायामाची पद्धत अलीकडे प्रचलित झाली आहे, उदा. पोटाचा घेर न्यून करण्यासाठी पोटाचे व्यायाम करणे, मांड्यांची चरबी न्यून करण्यासाठी बैठका मारणे इत्यादी. या पद्धतीला ‘स्पॉट रिडक्शन’, असे म्हणतात; पण यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. व्यायाम चालू केल्यावर शरीर केवळ त्या विशिष्ट भागावर कार्य न करता संपूर्ण शरिरातील चरबी न्यून (फॅट बर्न) करण्यास आरंभ करते. त्यामुळे चरबी न्यून होण्याची प्रक्रिया पूर्ण शरिरातच घडते.

श्री. निमिष म्हात्रे

विशिष्ट भागाचा व्यायाम केल्याने तेथील स्नायूंमध्ये अधिक स्फूर्ती येऊन त्या भागाचा आकार पालटू लागतो. या प्रक्रियेला ‘Targeted Toning’, असे म्हणतात. चरबी न्यून करण्याऐवजी केवळ शरिराला आकार देण्याचा उद्देश असल्यास या प्रक्रियेचा अवलंब करण्यात येतो.

शरिराच्या विशिष्ट भागातील चरबी न्यून करायची असली, तरीही ‘नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि योग्य जीवनशैली’, यांच्या संयोजनाद्वारे शरिरातील एकूण चरबी न्यून करणे आवश्यक आहे. ‘संपूर्ण शरिराची कसरत होण्याच्या दृष्टीने व्यायाम करणे आणि योग्य दिनचर्या’, हा चरबी न्यून करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचा अन् एकूण आरोग्य सुधारण्याचा सर्वांत प्रभावी मार्ग आहे.’

– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट), फोंडा, गोवा. (३०.९.२०२४)

निरोगी जीवनासाठी ‘व्यायाम’ या सदरात प्रसिद्ध होणारे सर्व लेख वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा –
https://sanatanprabhat.org/marathi/tag/exercise