कणकवली – सोमवार, ११ नोव्हेंबरला रात्री २ वाजता ३० टन सिमेंटने भरलेला ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने फोंडाघाटात खड्डयात जाऊन अडकला होता. या वेळी ट्रकचे काही टायर फुटले आणि अन्य भाग तुटला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यानंतर अथक प्रयत्नानंतर १२ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता म्हणजे तब्बल १४ घंट्यांनी या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आले. या कालावधीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक चालू होताच एका कंटेनरने बाजारपेठेत विजेच्या एका खांबाला धडक दिली. यामुळे खांब वाकला आणि त्यावरील वीजवाहिन्या तुटल्या. सुदैवाने विद्युत् प्रवाह बंद असल्याने अनर्थ टळला. यामुळेही वाहतुकीवर परिणाम झाला होता.