Mallikarjun Kharge : (म्हणे) ‘संंन्याशासारखे भगव्या रंगाचे कपडे परिधान करणार असाल, तर राजकारणातून बाहेर व्हा !’ – काँग्रेसच अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना योगी आदित्यनाथ यांच्या भगव्या वस्त्राविषयी पोटशूळ !

डावीकडून मल्लिकार्जुन खर्गे आणि योगी आदित्यनाथ

मुंबई – येथील ‘संविधान बचाव संमेलना’मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या भाषणात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते योगी आदित्यनाथ यांच्या भगव्या पोषाखावर टीका केली. ते म्हणाले, ‘‘एक कुणीतरी नेते साधूच्या वेशात रहातात; पण चांगले राजकारणी झाले आहेत. मुख्यमंत्रीही झाले आहेत. ते भगव्या रंगाचे कपडे परिधान करतात. डोक्यावर केसही ठेवत नाहीत.

असे एक नेते आहेत, ज्यांना भाजपने जन्माला घातले आहे. आम्हाला त्याविषयी तक्रार नाही. माझे भाजपला एवढेच म्हणणे आहे की, एकतर त्यांना पांढरे कपडे परिधान करायला लावा; पण जर तुम्ही संन्याशासारखे भगव्या रंगाचे कपडे परिधान करणार असाल, तर मग राजकारणातून बाहेर व्हा. तुम्ही भगवे कपडे परिधान करून राजकारणी होणार असाल, तर मग त्या कपड्यांचे पावित्र्य काय राहिले ? एकीकडे तुम्ही भगव्या रंगाचे कपडे परिधान करता आणि दुसर्‍यांवर टीका करता.

‘बटेंगे तो कटेंगे’ म्हणता. मग संन्याशासारखे कपडे का परिधान करता ? अशा लोकांना निवडणुकीत पराभूत करून जर घरी बसवले नाही, तर राज्यघटनेच्या ठिकाणी मनुस्मृती येईल आणि हे त्याचे महंत बनतील.’’

कपड्यांविषयी आक्षेप व्यक्त करणारी काँग्रेस मौलवींविषयी का बोलत नाही ? – भाजप

शहजाद पुनावाला

भाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला म्हणाले, ‘‘कपड्यांचा विषय असेल, तर खर्गे मौलवींविषयी का बोलत नाहीत ? हा काँग्रेसचा खरा डीएन्ए आहे. तो हिंदुविरोधी आणि सनातनविरोधी आहे. काँग्रेसने भगवा आतंकवाद, हिंदु आतंकवाद हे शब्द वापरले होते; पण ते इतर धर्मांविषयी असे बोलत नाही.

ही काँग्रेसची जातीयवादी विचारसरणी आहे. त्यांना ‘बटेंगे तो कटेंगे’ हे जातीयवादी वाटते; पण ‘वोट जिहाद’ धर्मनिरपेक्ष वाटतो.’’