१२ नोव्हेंबर – पंढरपूर कार्तिक यात्रा विशेष !४ ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस साहाय्य केंद्र आणि वारकर्यांच्या सुरक्षेसाठी ‘माऊली स्क्वॉड’ ! |
पंढरपूर – कार्तिक शुक्ल एकादशी १२ नोव्हेंबर या दिवशी कार्तिक यात्रा कालावधीत येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. त्या अनुषंगाने वारकर्यांच्या सुरक्षेसाठी १ सहस्र ६२५ पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. ४ ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस साहाय्य केंद्र उभारण्यात आले आहेत. वारकरी भाविकांना संरक्षण देण्यासाठी, तसेच चोरी रोखण्यासाठी ‘माऊली स्क्वॉड’ची स्थापन करण्यात आली असून यामध्ये वारकरी आणि नागरिक यांच्या वेशात पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी दिली.
डॉ. अर्जुन भोसले म्हणाले, ‘‘वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नदीपात्र, ६५ एकर, महाद्वार, महाद्वार घाट, पत्राशेड यांसह १० ठिकाणी निरीक्षण पथके उभारण्यात आली आहेत. १५० सीसीटीव्हींच्या माध्यमातून गर्दीवर लक्ष ठेवले जाणार आहे. वारकरी भाविकांना आवश्यक सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. खासगी वाहनधारकांच्या वाहनांना थांबण्यासाठी शहरात आणि शहराबाहेर १६ ठिकाणी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे.’’
कार्तिक एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि परिसरात आकर्षक विद्युत् रोषणाई !
कार्तिक यात्रा सोहळ्याला प्रारंभ झाला असून मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, मंदिर परिसर, संत तुकाराम भवन, श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास, संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप या ठिकाणी रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
ही विद्युत रोषणाई श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती आणि शिवदत्त डेकोरेटर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त श्रींच्या दर्शनासाठी आलेल्या वारकरी भाविकांना मुबलक प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे १ सहस्र ८०० सेवेकरी काम करत आहेत. या स्वयंसेवकांना श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रामध्ये सकाळी अल्पाहार, दुपारी आणि रात्री भोजनप्रसाद उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याचसमवेत पदस्पर्श दर्शनरांगेत भाविकांना विनामूल्य चहा आणि खिचडी वाटप चालू करण्यात आले आहे.