‘मी गेली काही वर्षे एका गावात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रविवारच्या अंकांचे वितरण करण्याची सेवा करत आहे. त्या गावात जातांना मार्गात एक ओहोळ लागतो. त्या ओहोळावरील ‘कॉजवे’ची (पाण्यावरून पलीकडे जाण्यासाठी भूमीपासून थोड्या उंचावर बांधलेला मार्ग) उंची अल्प असल्याने अतीवृष्टी झाल्यावर अनेक वेळा तेथे पाणी येते आणि वाहतूक बंद होते; मात्र मी वितरण करतांना एवढ्या वर्षांत एकदाही त्या कॉजवेवर पाणी आले नाही. गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने मला त्या भागात दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करतांना कोणताही अडथळा आला नाही.
१. एका व्यक्तीने पुलावर पाणी आल्याचे सांगणे आणि ‘पुलाच्या अलीकडील घरांत दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करून परत येऊया’, असा विचार करून अंक द्यायला आरंभ करणे
‘७.७.२०२४ या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत होती. मी नेहमीप्रमाणे दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करण्यासाठी त्या गावात गेलो होतो. त्या गावात जातांना मार्गात एका व्यक्तीने मला सांगितले, ‘‘पुलावर पाणी आले आहे. तुम्ही पुढे जाऊ नका.’’ त्यामुळे ‘मी त्या पुलाच्या अलीकडील ४ घरांत दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करून परत जाऊया’, असा विचार करून गावात गेलो. मी दैनिक ‘सनातन प्रभात’चे अंक द्यायला आरंभ केला. नंतर मी पुलाजवळ जाऊन पाहिले, तर पुलावर बरेच पाणी आले होते.
२. पाऊस जोरात पडत असल्याने एका वाचकांच्या घरी थांबणे, पावसाची तीव्रता वाढल्याने परत जायला निघणे आणि तेवढ्यात पुलावरून आलेल्या एका व्यक्तीने ‘पुलावरील पाणी न्यून झाले आहे’, असे सांगणे
त्या गावातील एका वाचकांची बहीण दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करते. मी त्यांच्याकडे दैनिक ‘सनातन प्रभात’चे ४ अंक वितरणासाठी देत आहे. ‘पुलावरील पाणी न्यून होते का ?’, हे पहाण्यासाठी त्यांच्या घरी मी थोडा वेळ थांबलो. थोड्या वेळाने पावसाची तीव्रता अधिकच वाढली. त्यामुळे ‘आता पाऊस न्यून होणे शक्य नाही. आपण परत जाऊया’, असा विचार करून मी परत जायला निघालो. तेवढ्यात त्या पुलावरून एक व्यक्ती आली. मी त्यांना विचारले, ‘‘पुलावर पाणी आले आहे ना ! मग तुम्ही कसे आलात ?’’ त्यांनी मला सांगितले, ‘‘पुलावरील पाणी आता न्यून झाले आहे. तुम्ही लवकर निघा. पुलाच्या पलीकडे जा.’’ त्यांचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले.
२ अ. ‘पुलावरील पाणी ओसरले आहे’, असे दिसणे आणि पुलाच्या पलीकडे जाऊन दैनिक‘सनातन प्रभात’चे वितरण करता येणे : ‘आता पावसाची तीव्रता अधिकच वाढली आहे, तर पाणी न्यून कसे झाले ? उलट वाढायला पाहिजे’, असे कसे होईल ?’, अशा प्रकारचे विचार माझ्या मनात येऊ लागले. मी पाहिले, तर तेथील पाणी ओसरून मार्ग पूर्णतः मोकळा झाला होता. त्यामुळे मला पुलाच्या पलीकडे जाऊन दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करता आले.
२ आ. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मधील चैतन्य वाचकांच्या घरी प्रक्षेपित होताच यमुना नदीप्रमाणे ओहोळाने पुराच्या पाण्याचा मार्ग मोकळा करून दिला’, असे वाटणे आणि ही दैवी लीला पाहून भारावून जाणे : माझ्या मनात ‘पाऊस वाढला असतांना पुलावरील पाणी ओसरले कसे ?’, असा प्रश्न येत होता. जेव्हा मी ‘पाऊस वाढला आहे’, असा विचार करून मागे जाण्यासाठी निघालो, तेवढ्यात त्या वाचकांची बहीण वाडीतील दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण पूर्ण करून आली होती. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील चैतन्य तेथील वाचकांच्या घरी, म्हणजे वाडीत प्रक्षेपित झाले होते.
‘श्रीकृष्ण जन्मानंतर वसुदेव बाळकृष्णाला घेऊन यमुना नदी पार करत असतांना बाळकृष्णाचे चरण यमुना नदीला लागताच नदीने मार्ग मोकळा करून दिला’, या लीलेचे मला स्मरण झाले. तेव्हा मला वाटले, ‘दैनिक ‘सनातन प्रभात’मधील
चैतन्य वाचकांच्या घरी प्रक्षेपित होताच यमुना नदीप्रमाणे ओहोळानेही मार्ग मोकळा करून दिला.’ ही दैवी लीला पाहून मी भारावून गेलो.
३. मार्गात दैनिक ‘सनातन प्रभात’चे एक वाचक भेटल्याने त्यांना अंक देणे आणि पुलावरील पाण्यातून त्यांच्या घरी जावे न लागणे
मार्गात तो ओहोळ ३ ठिकाणी आहे. त्यानंतर मी तसाच पुढे गेलो. एका ठिकाणी अधिक उंचीचा लोखंडी साकव (नदी किंवा ओहोळ यांच्या तीराला जोडणारा लहान पूल, जो पाण्याच्या प्रवाहावर बांधला जातो.) असल्याने मला तेथून पलीकडे सहज जाता आले. पुढील पुलावर पाणी येण्याची शक्यता होती, तरीही मी तसाच पुढे जाऊ लागलो.
तेवढ्यात मला एक वाचक पुलाच्या अलीकडे वाटेत भेटले. ते मला म्हणाले, ‘‘पुढील पुलावर पाणी आले आहे. आमचे दैनिक ‘सनातन प्रभात’ इथेच द्या.’’ तेव्हा मी आश्चर्यचकित झालो; कारण आतापर्यंत ते वाचक मला एकदाही वाटेत भेटले नव्हते. त्या वेळी ‘पुलावर पाणी असतांना ते कसे भेटले ?’, असा विचार माझ्या मनात आला. तेव्हा ‘हीसुद्धा एक दैवी लीलाच आहे’, असे माझ्या लक्षात आले.
४. सगळीकडे पूरसदृश्य स्थिती असतांनाही मी दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करून सुखरूप घरी पोचलो. त्या वेळी माझी भावजागृती झाली आणि मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.’
– श्री. राजाराम कृष्णा परब, तेर्सेबांबर्डे, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. (१३.७.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |