गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या वेळी यवतमाळ जिल्ह्यातील साधिकांना आलेल्या अनुभूती

वर्ष २०२४ मध्ये गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या सेवा करतांना आणि प्रत्यक्ष महोत्सवाच्या वेळी यवतमाळ जिल्ह्यातील साधिकांना भावाच्या स्तरावर आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सौ. कल्पना लहू खामणकर (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ५५ वर्षे), वणी, जिल्हा यवतमाळ

१. गुरुपौर्णिमेपूर्वी प्रचारसेवा करतांना आलेल्या अनुभूती

अ. ‘मला शारीरिक व्याधी आणि त्रास असूनही गुरुमाऊलींच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेमुळेच माझ्या सेवेत त्यांचा अडथळा आला नाही.

आ. मला सेवेसाठी कुणाचे ना कुणाचे साहाय्य मिळायचे. कधी पती, कधी सहसाधिका, तर कधी श्री गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) सूक्ष्मातून माझ्या साहाय्यार्थ यायचे.

इ. स्थानिक साधकांच्या  नियोजनाप्रमाणे १.६.२०२४ पासून प्रारंभ झालेली सेवा माझ्याकडून श्री गुरुमाऊलींनीच अविरतपणे २ मास करून घेतली.

ई. सेवा करतांना मला कधी माझ्या हृदयमंदिरात, तर कधी माझ्या समवेत गुरुदेवांचे अस्तित्व जाणवत होते. त्या वेळी माझ्याकडून देहभान विसरून सेवा होत होती.

उ. ज्या परिसरात सेवा असायची, तेथे गुरुमाऊलींनी आधीच आपल्या चैतन्याचा वर्षाव केला असल्याने सेवा सहज आणि भावपूर्ण व्हायची.

ऊ. बर्‍याच वेळा मी सेवेसाठी एकटी असूनही मला कधी एकटेपणा जाणवायचा नाही. गुरुदेवांनी मला या सेवेत सतत भावावस्थेची अनुभूती दिली. त्याबद्दल श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

२. गुरुपूजनापूर्वी 

२ अ. गुरुपूजनाच्या सेवेत अडचण येऊनही मन स्थिर असणे : मी गुरुपूजन करण्यासाठी सभागृहात जात असतांना मला एक अडचण आली. त्यामुळे अन्य साधक दांपत्याला पूजेसाठी बसवावे लागले; मात्र माझ्या मनात कुठलाही अविचार आला नाही. ‘माझ्याकडून

२ मास गुरुदेवांनी करून घेतलेली सेवा, म्हणजे ‘ते गुरुपूजनच होते’, असा माझा भाव होता’, त्यामुळे माझे मन स्थिर होते.

३. गुरुपूजन चालू असतांना मला निर्विचार अवस्था अनुभवता आली आणि माझा संपूर्ण देह हलका झाला.

गुरुमाऊलींनी मला या अनुभूती दिल्या, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

सौ. दुर्गा पारधी , यवतमाळ

१. ‘सद्गुरु स्वातीताई खाडये यांचे मार्गदर्शन ऐकतांना ‘त्या प्रत्यक्ष आमच्या जवळ बसून आम्हा सर्वांना मार्गदर्शन करत आहेत’, असे मला वाटले. त्यांच्या वाणीतील प्रत्येक शब्द माझ्या अंतर्मनापर्यंत पोचत होता. आम्हाला सद्गुरु स्वातीताईंच्या त्या शब्दांची जाणीव होऊन गुरुपौर्णिमेच्या सेवा करता आल्या.

२. सभागृहात गुरुपूजन होत असतांना मला ‘व्यासपिठावर आसंदीत परम पूज्य गुरुमाऊली श्रीरामाच्या रूपात विराजमान असून सर्व साधकांना आशीर्वाद देत दैवी कणांचा वर्षाव करत आहे’, असे दिसत होते.

गुरुमाऊलीच्या कृपेने मला भावावस्था अनुभवता आली, तसेच त्यांच्या कृपेने ही अनुभूती आली. त्याबद्दल गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

सौ. शांता घोंगडे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६४ वर्षे), यवतमाळ

१. गुरुपूजनातून चैतन्याचा वर्षाव अनुभवणे 

‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजन करतांना भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेच्या ठिकाणी मला परम पूज्य गुरुदेव दिसले. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ त्यांच्या चरणांजवळ बसून होत्या’, असे मला दिसले. गुरुदेवांच्या चरणांतून पिवळा प्रकाश सर्वत्र पसरतांना आणि सोनेरी कण येतांना दिसले. काही कण हिरव्या, तर काही कण पांढर्‍या रंगांचे होते. चैतन्याच्या वर्षावामुळे माझा भाव पुष्कळ जागृत झाला आणि मला आनंद अनुभवता आला. तो आनंद दिवसभर टिकून राहिला. गुरुदेवांच्या चरणांजवळ बसून मानस कृतज्ञता व्यक्त झाली.’

(वरील सर्व सूत्रांचा दिनांक २१.७.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक