S Jaishankar : मणीपूर येथील हिंसाचारावरून राजकारण करत देशाची प्रतिमा मलिन करणे दुर्दैवी ! – डॉ. एस्. जयशंकर, परराष्ट्रमंत्री

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी विरोधी पक्षांना फटकारले  

डॉ. एस्. जयशंकर

मुंबई – मणीपूर येथील हिंसाचारावरून राजकारण करणे दुर्दैवी आहे, अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी विरोधी पक्षांना फटकारले. ते येथे भाजपच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

जयशंकर पुढे म्हणाले की, मणीपूरमधील प्रश्‍न जुने आणि गुंतागुंतीचे आहेत; पण मणीपूरमधील हिंसाचारावरून भारताची प्रतिमा जगासमोर मलिन करण्याची राजकीय भूमिका योग्य नाही.

वर्ष २०१४ पूर्वीप्रमाणे घुसखोरी होत नाही !

परराष्ट्रमंत्री जयशंकर पुढे म्हणाले की, गेल्या १० वर्षांत देशाच्या सीमाभागात मोठे परिवर्तन झाले असून सीमेवर कुंपण बांधण्यात प्रगती झाल्याने पूर्वीएवढी घुसखोरी आता होत नाही. कुणीही कसेही भारतात घुसावे, ही वर्ष २०१४ पूर्वीची स्थिती आता राहिलेली नाही. आमचे सरकार देशाच्या सीमा सुरक्षित राखण्यासाठी प्रयत्न करत राहील. जेथे कुंपण घालणे आवश्यक आहे, तेथे कुंपणही घातले जाईल.

गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र आदर्श राज्य !

देशातील विदेशी गुंतवणुकीवर बोलतांना डॉ. जयशंकर म्हणाले की, विकसित भारत संकल्पनेच्या पूर्ततेमध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्राला महत्त्वाची भौगोलिक अनुकूलता आहे. त्यामुळे गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र आदर्श राज्य आहे. जर्मनीतील अनेक उद्योगांनी महाराष्ट्राला पसंती दिली आहे.