ब्रिटनचे आरोग्य मंत्री वेस स्ट्रीटिंग यांचे विधान
लंडन (ब्रिटन) – ब्रिटनचे आरोग्य मंत्री वेस स्ट्रीटिंग यांनी ब्रिटनच्या आरोग्य सेवांमध्ये भारतीय वंशाच्या डॉक्टरांच्या योगदानाचे भरभरून कौतुक केले आहे. ब्रिटनची ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’ (एन्.एच्.एस्.) भारतीय स्थलांतरितांची ऋणी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
भारतासमवेतची भागीदारी ब्रिटनला भविष्यासाठी देशाच्या आरोग्य सेवा आधुनिकीकरणाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी साहाय्यभूत ठरेल, असेही स्ट्रीटिंग म्हणाले. ब्रिटनच्या वेळेनुसार २३ ऑक्टोबरच्या सायंकाळी लंडनमध्ये ‘इंडिया ग्लोबल फोरम’च्या वार्षिक दिवाळी कार्यक्रमात ते बोलत होते.
भारतीय किंवा भारतीय वंशाचे डॉक्टर हे ब्रिटनची राष्ट्रीय आरोग्य सेवा, म्हणजेच ‘एन्.एच्.एस्.’च्या पाठीचा कणा असल्याचे मानले जाते. ‘ब्रिटीश असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडियन ओरिजिन’ या संस्थेनुसार, भारतीय वंशाचे अनुमाने ४० सहस्र डॉक्टर ‘एन्.एच्.एस्.’मध्ये कार्यरत आहेत.
वेस स्ट्रीटिंग पुढे म्हणाले,
१. मी गेल्या ७६ वर्षांत एन्.एच्.एस्. ज्या प्रकारे आकाराला आले, याचा विचार करतो, तेव्हा ब्रिटनमधील भारतीय वंशाचे आम्ही पुष्कळ ऋणी रहायला हवे, हे माझ्या लक्षात येते. एका पिढीने वर्ष १९४८ मध्ये एन्.एच्.एस्.ला उभारण्यास साहाय्य केले, तर आज आम्ही त्यांची मुले, नातवंडे आणि परतवंडे त्याचे भविष्य घडवतांना पहात आहोत.
२. भारताच्या प्राथमिक आरोग्य सेवा आणि संशोधन अन् नवोपक्रम हे अत्यंत प्रशंसनीय असून ब्रिटन त्यांच्याकडून शिकू शकेल.
३. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या लस आज जगातील काही गरीब भागांमध्ये लोकांचे जीव वाचवत आहेत.