कॅनडा आणि अमेरिका देशांनी पोसलेला खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याची धमकी
नवी देहली – ‘सिख फॉर जस्टिस’ या बंदी घालण्यात आलेल्या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याने ‘१ ते १९ नोव्हेंबर या कालावधीत एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करू नये. वर्ष १९८४ मध्ये देहली येथे झालेल्या शिखांच्या हत्याकांडाच्या ४० व्या दिनानिमित्त एअर इंडियाच्या विमानांवर आक्रमणे होऊ शकतात’, अशी धमकी प्रवाशांना दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय विमानांना सातत्याने बाँबद्वारे त्यांचा स्फोट घडवून आणण्याच्या धमक्या येत आहेत.
पन्नू याने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्येही एका व्हिडिओद्वारे देहलीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव पालटले जाईल आणि ते १९ नोव्हेंबरला बंद राहील, अशी धमकी दिली होती. त्याने त्या दिवशी लोकांना एअर इंडियाच्या विमानांतून प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना जिवे मारण्याची धमकी
खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याने यावर्षी प्रजासत्ताकदिनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि राज्याचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांनाही ठार मारण्याची धमकी दिली होती. त्याने गुंडांना एकत्र येऊन २६ जानेवारीला मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर आक्रमण करण्यास सांगितले होते.
|