(यूपीआय म्हणजे युनिफाइड पेमेंट इंटरफेस. विविध बँक आस्थापनांतून पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी हे भ्रमणभाषवरील अॅप वापरले जाते.)
माले (मालदीव) – मालदीवचे नागरिक आता भारतीय ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय) वापरू शकणार आहेत. यासाठी २ महिन्यांपूर्वी दोन्ही देशांमध्ये करार झाला होता. मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुइज्जू यांनी २० ऑक्टोबरला वरिष्ठ मंत्र्यांच्या शिफारसींनंतर ‘यूपीआय’ चालू करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचा निर्णय घेतला. मुइज्जू यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार मंत्रीमंडळाच्या या निर्णयामुळे मालदीवच्या अर्थव्यवस्थेला महत्त्वपूर्ण लाभ होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समावेशकता वाढवणे आणि डिजिटल पायाभूत सुविधा वाढवणे यांचा समावेश आहे.
१. ‘यूपीआय’ लागू करण्याच्या निर्णयानंतर मुइज्जू यांनी मालदीवमध्ये ‘यूपीआय’ चालू करण्यासाठी एक आस्थापन स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तसेच देशात कार्यरत बँका, दूरसंचार आस्थापने, सरकारी मालकीची आस्थापने आणि आर्थिक तंत्रज्ञान आस्थापने यांचा या आस्थापनात समावेश केला जावा, असेही ते म्हणाले.
२. ऑक्टोबरच्या आरंभी भारताने मालदीवमध्ये ‘रुपे कार्ड’ चालू केले होते. यामुळे मालदीवला भेट देणार्या भारतीय पर्यटकांसाठी, तसेच भारताला भेट देणार्या मालदीवच्या नागरिकांसाठी पैसे देण्याची सुलभता वाढू शकणार आहे.