भूमिदान यज्ञ
सुहास बाळाजी आठवले
‘पूर्वीच्या काळी यज्ञ होत असत. राजसूय, अश्वमेध इत्यादी यज्ञ प्राचीन काळात असत. पू. विनोबाजींनी सध्या ‘भूमिदान यज्ञा’ची मोहीम चालू केली आहे. काही लोकांजवळ बरीच जमीन आहे. काही जणांजवळ काहीच जमीन नाही. ही विषमता नाहीशी करण्यासाठी ही मोहीम आरंभीली आहे. या मोहिमेमुळे गरीब लोक सुखी होतील.
या यज्ञात सर्वांनीच भाग घ्यावयाचा आहे. भूदान यज्ञाचा उगम दि. १८ एप्रिल रोजी नालगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली (सध्याच्या तेलंगणा राज्यातील एक गाव) या गावी झाला. तेव्हापासून हजारो एकर जमीन जनतेने भूमीदान यज्ञास अर्पण केली आहे. ‘सर्व सेवा संघा’चे अनेक कार्यकर्ते भारताच्या वेगवेगळ्या भागांत हिंडून भूमी मिळवीत आहेत. विशेष गोष्ट ही की, विनोबांचा दौरा-नव्हे, यात्रा पायीच चालू आहे. यात्रेत ते खेडुतांच्या अडीअडचणी समजून घेतात. खेड्यांच्या परिस्थितीचे निरीक्षण करतात. तेथील शेतकर्यांना योग्य सल्ला देतात. त्यांना अहिंसेचे पाठ शिकवितात. लोकांच्या मनावर श्रमाचे महत्त्व बिंबवितात.
विषमता नष्ट करण्याचे दोन मार्ग आहेत. एक हिंसेचा आणि दुसरा अहिंसेचा-प्रेमाचा-हृदयपरिवर्तनाचा. ‘कम्युनिस्टांचा मार्ग काहीसा हिंसामय आहे’, असे पूज्य विनोबाजींचे मत आहे. गेल्या दोन महायुद्धांमुळे जग युद्धास आणि त्यामुळे होणार्या भीषण संहारास विटले आहे. अशा वेळी प्रेमाचा अन् अहिंसेचा मार्गच अधिक श्रेयस्कर होय. जसे या आंदोलनांत कार्यकर्ते अधिक संख्येने भाग घेतील, तसा त्यास अधिक जोर येईल. पू. विनोबांनी कमीत कमी पाच कोटी एकर जमीन मिळविण्याचा संकल्प केला आहे.
जमिनी बरोबरच (भूमीसह) पू. विनोबा संपत्तीचाही स्वीकार करतात. त्या पैशांत शेतीचे साहित्य विकत घेण्यात येऊन ते गरीब शेतकर्यांना देण्यात येते. जमीन भूमीहीनांना वाटण्यात येते. जमिनीचे वाटप करतांना हरिजन आणि मागासलेल्या जातीतील माणसे यांना प्राधान्य देण्यात येते. हैद्राबाद सरकारने भूमिदान यज्ञात दिल्या गेलेल्या जमिनीचा तीन वर्षेंपर्यंत सारा न घेण्याचे जाहीर (घोषित) केले आहे. जमिनीची वाटणी करण्यासाठी आणि नवीन जमीन मिळविण्यासाठी एकेका प्रांतात एकेक ‘शून्य समिती’ स्थापन करण्यात आली आहे. ज्यांना पू. विनोबांच्या कार्याची रूपरेषा माहीत आहे आणि जे पू. विनोबाजींच्या सान्निध्यात राहिलेले आहेत, असे लोकच या समितीचे सदस्य आहेत.
जे कां रंजले गांजले । त्यांसि म्हणे जो आपुले ।
तोचि साधु वोळखावा । देव तेथेंचि जाणावा ।।
– संत तुकाराम महाराज
हे साधुत्वाचे आणि देवत्वाचे लक्षण पू. विनोबाजींच्या ठिकाणी दिसून येते. त्यांच्या ‘भूदानयज्ञा’च्या महान कार्याची गंगा अल्पावधीत संपूर्ण भारतदेश व्यापून सार्या भारतियांना पुनीत करील, यात काय संशय !’