रत्नागिरी – तालुक्यातील स्टरलाईट आस्थापनाच्या झाडगाव येथील जागेत आणि वाटद येथे उभारण्यात येणार्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम्.आय.डी.सी.) अंतर्गत वेल्लोर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क कंपनीच्या (१९ सहस्र ५५० कोटी रुपये) प्रकल्पासमवेत रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा संरक्षण क्षेत्रातील साहित्य निर्मितीच्या (१० सहस्र कोटी रुपये) या दोन्ही प्रकल्पांना राज्यशासनाने संमती दिली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील ३० सहस्र बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नुकतेच महाराष्ट्र राज्यशासनाने मंत्रीमंडळात काही निर्णय घेतले, या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा ते बोलत होते.
उद्योगमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की,
१. रत्नागिरी जिल्ह्यात एवढे मोठे प्रकल्प प्रथमच येत आहेत. या प्रकल्पांचे स्वागत केले पाहिजे. वेल्लोर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क आस्थापनाचा सेमी कंडक्टर बनवण्याचा प्रकल्प आहे.
२. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या अनिल अंबानी यांच्या आस्थापनाकडून धीरुभाई अंबानी यांच्या नावाने एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील साहित्य बनवणे हा प्रकल्प उभारण्यात येत आहे.
३. या दोन्ही प्रकल्पांसाठी २९ सहस्र ५५० पेक्षा अधिक गुंतवणूक केली जात आहे.
४. स्टरलाइट आस्थापनाच्या झाडगाव येथील जागेवर प्रकल्प उभारण्यात येणार आहे. एक सहस्र एकर भूमीवर प्रकल्प उभारण्यात येणार असून ही भूमी अद्यापही एम्.आय.डी.सी.च्या नावावर आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध करण्याचा प्रश्नच येत नाही.
५. भूमिपूजन झाल्यापासून न्यूनतम ३ वर्षे हे प्रकल्प चालू होण्यास लागतील.
६. या प्रकल्पांमुळे कुशल आणि अकुशल कामगारांना प्रशिक्षण टाटा आस्थापनाच्या प्रशिक्षण केंद्रमार्फत देण्यात येणार आहे.
७. येथील ४०० कोटी रुपयांच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचे भूमिपूजन ६ ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून रत्नागिरी शहरातील अंगणवाड्या, शाळा, दवाखाने यांच्या सुधारणेकडे अधिक लक्ष देण्यात येणार आहे. यासमवेत रत्नागिरीत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, तसेच विश्वेश्वर मंदिर येथील भक्तनिवासाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.