जुन्नर (पुणे) येथे लावले आतंकवादी हसन नसरुल्लाच्या समर्थनार्थ फलक !

जमाव करून आतंकवाद्याच्या समर्थनार्थ मोर्चा !

जुन्नर (जिल्हा पुणे), ४ ऑक्टोबर (वार्ता.) – इस्रायल आणि आतंकवादी संघटना हिजबुल्ला यांच्यात चालू असलेल्या युद्धात या संघटनेचा म्होरक्या हसन नसरुल्ला याला इस्रायलने ठार केले. हिजबुल्लाला अमेरिका आणि अन्य ६० देशांनी आतंकवादी म्हणून घोषित केले आहे. या आतंकवाद्याच्या समर्थनार्थ जुन्नर या गावातील सय्यद वाडा परिसरात काही समाजकंटकांनी या आतंकवाद्याचा आणि त्याच्या संघटनेचा ‘मानवतेसाठी लढा देणारे शहीद’ म्हणून गौरव केला आहे. इस्रायल आणि अमेरिका या भारताच्या मित्र देशांना आतंकवादी संबोधून २ ऑक्टोबर या दिवशी काळा दिवस पाळणे आणि बंद पुकारण्याचे आवाहन केले. हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने फलक लावणार्‍यांच्या विरोधात तक्रार देण्यात येणार आहे.

‘सय्यद वाडा परीवार’ या नावाने काही समाजविघातक कृत्य करणार्‍या व्यक्तींकडून फलक लावण्यात आल्याचे समजते. हे फलक काही वेळानंतर काढून टाकल्याचे समजते. ३ ऑक्टोबर या दिवशी काही धर्मांधांनी जमाव करून सैय्यदवाडा ते सद्दत बाजार जुन्नरपर्यंत सय्यद हसन नसरूल्ला आणि हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेच्या समर्थनार्थ मोर्चा काढून घोषणाही दिल्या.

हे कृत्य हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सान्निध्याने पावन झालेल्या जुन्नर येथे केलेले असून महाराष्ट्र आणि देशाच्या प्रतिमेला काळिमा फासणारे आहे. सदरचे कृत्य हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून यात कोणत्या प्रकारच्या संघटना आणि व्यक्ती सहभागी आहेत ? आणि त्यांचे मनसुबे काय आहेत ? याचे सखोल अन्वेषण होणे आवश्यक असल्याची चर्चा आहे.

संपादकीय भूमिका

हसन नसरुल्ला या आतंकवाद्याला मानवतावादी संबोधून त्याचे उदात्तीकरण करणारे फलक लावले जातात, हे प्रशासनाला लज्जास्पद ! पोलीस आणि प्रशासन काय करत आहेत ? आतंकवाद्याचे समर्थन करणार्‍या सर्वांनाच आतंकवादी आणि राष्ट्रद्वेषी ठरवून त्यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक !