‘देवीच्या प्रकारांनुसार त्यांना कोणती वाद्ये आवडतात ? त्यांमागील आध्यात्मिक कारणे कोणती ?’, यांविषयी देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे.
१. कनिष्ठ देवी
काही देवी विशिष्ट क्षेत्राचे रक्षण करतात. त्यांना ‘क्षेत्रदेवी’, असे म्हणतात. काही देवी गावाचे रक्षण करतात. त्यांना ‘ग्रामदेवी’, किंवा ‘कनिष्ठ देवी’ असे म्हणतात.
१ अ. कनिष्ठ देवी कोणत्या आहेत ? : ‘मंगला, सुमंगला, भद्रा, कल्पा, अंबा आणि वत्सा’, या कनिष्ठ देवी आहेत. या देवींना ‘यक्षिणीदेवी’, असेही म्हणतात.
१ अ १. यक्षिणींची माहिती : यक्षिणींनी मागील स्त्री-जन्मात विशिष्ट देवतेची उपासना मनोभावे केलेली असते. मृत्यूनंतर त्यांना स्वर्गलोक प्राप्त होतो. स्वर्गलोकात वास करतांना त्यांच्याकडून काही चुका किंवा पापकर्मे घडलेली असतात. त्यामुळे अशा स्त्रियांना पृथ्वीवर विशिष्ट ठिकाणी काही काळ राहून तेथील लोक किंवा नैसर्गिक संपत्ती (वने, जल इत्यादी) यांच्या रक्षणाची सेवा करण्याचा शाप मिळतो. त्या स्त्रियांच्या लिंगदेहांचा अर्धा भाग स्त्रीचा आणि अर्धा भाग देवीचा असतो. त्यांना देवीस्वरूप मानले आहे. त्यामुळे त्यांना ‘यक्षिणीदेवी’, असे म्हणतात.
१ अ २. यक्षिणींचे कार्य : ‘जल आणि त्या जवळील परिसर, एखादे गाव, वनक्षेत्र, गावांच्या सीमा किंवा एखादे कुटुंब’, यांचे रक्षण करण्याचे कार्य यक्षिणीदेवी करतात.
१ अ ३. यक्षिणींची आवडती वाद्ये : यक्षिणी रज-सत्त्वप्रधान असतात. त्यांना ‘रजप्रधान ढोल, ताशा आणि नगारे’, ही वाद्ये प्रिय असतात. या वाद्यांना यक्षिणीदेवी स्वतः नृत्य करून किंवा हसून प्रतिसाद देतात.
१ अ ४. ‘यक्षिणीदेवी आणि त्यांना आवडणारी वाद्ये’, यांचा परस्परांशी असलेला संबंध ! : यक्षिणीदेवी पृथ्वीतत्त्वाशी निगडित असतात. ‘ढोल, ताशा आणि नगारे’, या वाद्यांतून पृथ्वीतत्त्वाशी संबंधित नादलहरी उत्पन्न होतात. त्यामुळे यक्षिणीदेवींना प्रसन्न करण्यासाठी ही वाद्ये पूरक असतात. त्यामुळे ‘यक्षिणींना ढोल, ताशा आणि नगारे ही वाद्ये प्रिय असतात’, असे म्हटले आहे.
२. रज-तमप्रधान उग्रदेवी कोणत्या आहेत ?
‘काली, चामुंडा, भद्रकाली आणि श्री दुर्गादेवी’, या उग्र अन् रज-तमोगुणी रूपे असलेल्या देवींची आराधना वाईट शक्ती करतात. असुर श्री दुर्गादेवीच्या रज-तम रूपाची उपासना वाईट शक्तींच्या कार्यासाठी करतात आणि साधक श्री दुर्गादेवीच्या सत्त्वरूपाची उपासना स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी करतात.
२ अ. उग्रदेवींची आवडती वाद्ये : ‘मोठ्या आकाराचे टाळ, उच्च नाद करण्याची क्षमता असलेला शंख, तुतारी आणि संबळ’, ही वाद्ये उग्रदेवींना प्रिय असतात.
२ अ १. ‘उग्रदेवी आणि त्यांना आवडणारी वाद्ये’, यांचा परस्परांशी असलेला संबंध ! : उग्रदेवी आप आणि तेज या तत्त्वांशी संबंधित असतात. ‘मोठ्या आकाराचे टाळ, उच्च नाद करण्याची क्षमता असलेला शंख, तुतारी आणि संबळ’, या वाद्यांतून आप अन् तेज या तत्त्वांशी संबंधित नादलहरी उत्पन्न होतात. त्यामुळे उग्रदेवींची उपासना करण्यासाठी ही वाद्ये पूरक असतात; म्हणून ‘उग्रदेवींना मोठ्या आकाराचे टाळ, उच्च नाद करण्याची क्षमता असलेला शंख, तुतारी आणि संबळ’, ही वाद्ये प्रिय असतात’, असे म्हटले आहे.
३. सत्त्वप्रधान देवी कोणत्या आहेत ?
गायत्री, सरस्वती, लक्ष्मी, महालक्ष्मी, पार्वती आणि सात्त्विक रूपातील श्री दुर्गादेवी
३ अ. सत्त्वप्रधान देवींची आवडती वाद्ये : ‘बासरी, वीणा, सतार, मंद आवाजातील टाळ, सनई आणि मृदंग’, ही वाद्ये सत्त्वप्रधान देवींना प्रिय असतात.
३ अ १. ‘सत्त्वप्रधान देवी आणि त्यांना आवडणारी वाद्ये’, यांचा परस्परांशी असलेला संबंध ! : सत्त्वप्रधान देवी वायु आणि आकाश या तत्त्वांशी संबंधित असतात. ‘बासरी, वीणा, सतार, मंद आवाजातील टाळ, सनई आणि मृदंग’, या वाद्यांतून वायु अन् आकाश या तत्त्वांशी संबंधित नादलहरी उत्पन्न होतात. त्यामुळे सत्त्वप्रधान देवींना प्रसन्न करण्यासाठी ही वाद्ये उपयोगी असतात; म्हणून ‘सत्त्वप्रधान देवींना बासरी, वीणा, सतार, मंद आवाजातील टाळ, सनई आणि मृदंग ही वाद्ये प्रिय आहेत’, असे म्हटले आहे.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.८.२०२३)
|