India’s relations with China : चीनसमवेत आमचे संबंध चांगले नाहीत ! – परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांची स्‍पष्‍टोक्‍ती

न्‍यूयॉर्क (अमेरिका)- भारत-चीन सीमेवर शांतता कशी ठेवता येईल, यासाठी आम्‍ही चीनसमवेत करार केला होता. वर्ष २०२० मध्‍ये चीनने या करारांचे उल्लंघन केले होते. त्‍याच वेळी दोन्‍ही देशांचे सैन्‍य आघाडीवर तैनात असल्‍याने तेथे तणाव निर्माण झाला आहे. तणाव कायम राहिल्‍यास त्‍याचा परिणाम सहाजिकच नातेसंबंधांवर होतो. त्‍यामुळेच गेल्‍या ४ वर्षांपासून आमचे संबंध चांगले नाहीत, असे विधान भारताचे परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे केले.

अमेरिकी नेत्‍यांना जयशंकर यांनी सुनावले !

अमेरिकेतील राजकीय नेते बर्‍याच वेळ भारतातील लोकशाहीवर भाष्‍य करतात. याविषयी डॉ. जयशंकर यांना विचार असता ते म्‍हणाले की, लोकशाहीचा परस्‍पर आदर केला पाहिजे. परकीय हस्‍तक्षेप हा परकीय हस्‍तक्षेप असतो, तो कुणी केला आणि कुठे झाला तरी फरक पडत नाही. हे एक कठीण क्षेत्र आहे आणि माझे वैयक्‍तिक मत असे आहे की, टिपणी करण्‍याचा प्रत्‍येकाला अधिकार आहे; परंतु मला तुमच्‍या टिपणीला प्रतिसाद देण्‍याचाही पूर्ण अधिकार आहे. त्‍यामुळे तुम्‍ही (अमेरिकेने) केलेल्‍या भाष्‍यावर मी टिपणी केल्‍यास तुम्‍ही वाईट वाटून घेऊ नका.