कोणतेही व्यसन कालांतराने पचनी पडते आणि मग मनुष्य अधिकाधिक त्याच्या अधीन जातो. अफूचे पहा ! दिवसेंदिवस व्यसनी माणसाला अधिकाधिक अफू लागते. त्याप्रमाणे भगवंताच्या चिंतनाचे आपल्याला व्यसन लागले पाहिजे; पण अगदी थोड्या श्रमात पुष्कळ साधून देणारे नामासारखे दुसरे साधन नाही. म्हणून नेहमी मनाने नाम घेत असावे. नामाचे प्रेम यायला एक, गुरूंना ते आवडते म्हणून घ्यावे तर दुसरे, नामातच माझे कल्याण आहे, या भावनेने ते घ्यावे. पुष्कळ दिवस एका घरात राहिल्याने त्या घराविषयी आपल्याला प्रेम येते ना ? प्रपंचाचे प्रेम आपल्याला सहवासाने आले आहे, तसे नामाच्या अखंड सहवासाने त्याचे प्रेम आपोआपच येईल.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज