रस्‍त्‍यांवरील अपघातांना उत्तरदायी कोण ?

सध्‍या गोव्‍यामध्‍ये रस्‍त्‍यांवर होणार्‍या अपघांताचे प्रमाण पुष्‍कळ प्रमाणात वाढले आहेत. (अपघातांचे असेच प्रमाण अन्‍य राज्‍यांमध्‍येही वाढले आहे.) त्‍यामुळे रस्‍त्‍यावर होणारे अपघात ही गोवा राज्‍याच्‍या दृष्‍टीने गंभीर समस्‍या बनली आहे. हे अपघात घडण्‍याला उत्तरदायी कोण ? आणि या समस्‍येवर कोणती उपाययोजना करता येईल, यांविषयी सरकार, प्रशासन अन् नागरिक यांनी चिंतन करणे आवश्‍यक आहे.

३० सप्‍टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘वर्ष २०२४ मध्‍ये झालेल्‍या गोव्‍यातील अपघातांची आकडेवारी आणि अपघात घडण्‍याचे एक कारण, म्‍हणजे खड्डे पडलेले खराब रस्‍ते अन् त्‍यावरील उपाययोजना’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

भाग १. येथे वाचा – https://sanatanprabhat.org/marathi/839049.html

वाहनाच्‍या अपघाताचे संग्रहित चित्र

४. रस्‍त्‍यांवरील अपघात टाळण्‍यासाठी वाहतूक खात्‍याची भूमिका महत्त्वाची !

सध्‍या गोव्‍यात चालू असलेल्‍या चर्चांमधून अपघात घडण्‍यामागे केवळ रस्‍ते खराब आहेत, असा आभास निर्माण होतो; परंतु अपघात घडण्‍यास अजूनही काही गोष्‍टी कारणीभूत आहेत. वाहतूक खात्‍याने सार्वजनिक बांधकाम खात्‍याला अपघात घडण्‍याविषयी दोष देतांना वाहतूक खात्‍याचे काय उत्तरदायित्‍व आहे, याकडेही लक्ष देणे आवश्‍यक आहे. रस्‍त्‍यावर होणारे अपघात टाळण्‍याविषयी वाहतूक खात्‍याचीही भूमिका महत्त्वाची आहे.

श्री. नारायण नाडकर्णी

५. रस्‍त्‍यावरील अपघात टाळण्‍याविषयी वाहतूक खात्‍याने घ्‍यावयाची दक्षता

अपघात घडण्‍याचे प्रमुख कारण म्‍हणजे नागरिक वाहतूक नियमांचे योग्‍य प्रकारे पालन करत नाहीत. निष्‍काळजीपणे वाहन चालवणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, पुष्‍कळ गतीने वाहन चालवणे, भ्रमणभाषवर बोलत वाहन चालवणे, दुचाकीस्‍वारांनी शिरस्‍त्राण न घालणे वगैरे अपघात घडण्‍याची प्रमुख कारणे आहेत. यासाठी पुढील गोष्‍टींकडे वाहतूक खात्‍याने कटाक्षाने लक्ष देण्‍याची आवश्‍यकता आहे

अ. वाहन चालवण्‍याची क्षमता योग्‍य प्रकारे न पडताळता अनुज्ञप्‍ती (परवाना) देणे : बर्‍याच वेळा एखाद्याची वाहन चालवण्‍याची योग्‍य क्षमता नसतांना त्‍याला वाहन चालवण्‍याची अनुज्ञप्‍ती देण्‍यात येते. त्‍यामुळे अशी व्‍यक्‍ती रस्‍त्‍यावर पुष्‍कळ रहदारी असतांना वाहन चालवतांना गोंधळून जाऊन अपघात घडण्‍याची शक्‍यता असते. त्‍यामुळे वाहतूक अधिकार्‍यांनी अनुज्ञप्‍ती देतांना कडक चाचणी घेणे आवश्‍यक आहे. बर्‍याच वेळा वाहतूक अधिकारी आणि ‘ड्रायव्‍हिंग स्‍कूल’ (वाहन चालवायला शिकवणारे खासगी वर्ग) चालवणारे यांचे साटेलोटे असल्‍याने चाचणी घेतांना योग्‍य ती काळजी न घेता अनुज्ञप्‍ती दिली जाते. काही प्रसंगी पैसे देऊन घरबसल्‍या अनुज्ञप्‍ती मिळवली जाते.

आ. दारु पिऊन किंवा अमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालवण्‍यावर नियंत्रण आणणे : दुसरे कारण म्‍हणजे दारु पिऊन वाहन चालवण्‍यामुळे झालेले अपघात. अशा अपघातांवर नियंत्रण आणण्‍यासाठी वाहतूक पोलिसांनी सतर्क राहून अशा वाहनचालकांना कह्यात घेऊन त्‍यांच्‍यावर दंडात्‍मक कारवाई केली पाहिजे. याखेरीज गोव्‍यात सध्‍या अमली पदार्थ सेवनाचे प्रमाण वाढत आहे. अशा अमली पदार्थांचे सेवन करून बेफामपणे वाहने चालवली जातात आणि ते अपघात घडण्‍यास कारणीभूत ठरतात. बहुतांश वेळा हे अपघात रात्रीच्‍या वेळी घडतात.

इ. स्‍पर्धेपोटी वेगाने चालवणार्‍या बसचालकांवर नियंत्रण ठेवणे : अपघात घडण्‍याचे आणखी एक कारण म्‍हणजे खासगी बसवाल्‍यांमध्‍ये असलेली स्‍पर्धा. काही वेळा ही स्‍पर्धा अपघातांना कारणीभूत ठरत आहे. बर्‍याच वेळा वेळेनुसार ठराविक अंतराने सुटणार्‍या दोन खासगी बसमध्‍ये प्रवासी मिळवण्‍यासाठी स्‍पर्धा लागते आणि यासाठी बस बेफाम वेगाने चालवली जाते. अशा वेळी बसचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्‍याने अपघात होण्‍याची शक्‍यता असते.

ई. वाहतुकीविषयी सूचना दर्शवणारे फलक योग्‍य ठिकाणी हवेत ! : बर्‍याच वेळा रस्‍त्‍यांवर वाहतुकीविषयी सूचना दर्शवणारे फलक योग्‍य ठिकाणी नसतात. काही ठिकाणचे सिग्‍नल योग्‍य प्रकारे काम करत नाहीत. अशा वेळी वाहतूक खात्‍याने त्‍वरित लक्ष देऊन या सर्व गोष्‍टी अद्ययावत् केल्‍या पाहिजेत.

६. अपघातांचे प्रमाण न्‍यून करण्‍याविषयी गोवा पोलिस महासंचालकांकडून प्रयत्न

गोव्‍यात घडणार्‍या अपघातांची नोंद घेऊन गोव्‍याचे पोलीस महासंचालक अपघातांवर नियंत्रण आणण्‍यासाठी प्रयत्न करत आहेत. या वर्षी डिसेंबर मासापर्यंत अपघातांचे प्रमाण ५ टक्‍क्‍यांनी न्‍यून करण्‍याचा त्‍यांचा मानस आहे. ‘टाइम्‍स अ‍ॅाफ इंडिया’च्‍या २२ सप्‍टेंबर २०२४ या दिवशी दिलेल्‍या वृत्तानुसार ‘गोव्‍यात एकंदर घडणार्‍या अपघातांचे विश्‍लेषण केल्‍यानंतर या अपघातांमधील ७० ते ८० टक्‍के अपघाती मृत्‍यू हे राष्‍ट्रीय महामार्ग आणि राज्‍य यांच्‍या अंतर्गत महामार्गांवर घडत आहेत’, अशी माहिती पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी दिली आहे. रस्‍त्‍यांच्‍या खराब स्‍थितीविषयी ते म्‍हणाले, ‘‘खात्‍याअंतर्गत होणार्‍या बैठकांमध्‍ये आम्‍ही रस्‍ते सिद्ध करणार्‍या एजन्‍सींना (आस्‍थापनांना) आम्‍ही उपाययोजना सुचवत असतो. रस्‍ता सुरक्षाविषयक मोहिमेमध्‍ये आम्‍ही पंचायतींना भेटून दीर्घ कालावधीसाठी टिकून रहाणारी उपाययोजना सिद्ध करण्‍याचा विचार करत आहोत. याखेरीज गोव्‍यातील अंतर्गत रस्‍त्‍यांवर वाहने चालवतांना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्‍याविषयी आमच्‍या धोरणाचे परीक्षण करत आहोत. दुचाकीवरील अपघातांमध्‍ये मृत झालेल्‍यांपैकी ६६ टक्‍के जणांचा मृत्‍यू शिरस्‍त्राण न घातल्‍याने झाला आहे. शिरस्‍त्राण न वापरण्‍याची गोव्‍यातील लोकांची मानसिकता सुरक्षिततेविषयी गंभीर विषय झाला आहे. वर्ष २०२१ ते २०२३ या कालावधीत एकूण दुचाकींच्‍या झालेल्‍या अपघातांमध्‍ये ५४१ जणांनी जीव गमावला. यांपैकी ३५७ जणांनी शिरस्राण घातले नव्‍हते.

७. वाहतूक नियमांचे पालन करणे हे नागरिकांचे कर्तव्‍य !

अपघात टाळण्‍यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन काटेकोरपणे करणे आवश्‍यक आहे. वाहने बेफाम गतीने चालवण्‍याने होणार्‍या अपघातांचे प्रमाण पुष्‍कळ आहे. विशेषतः तरुण पिढीतील मुले किंवा मुली यांच्‍याविषयी हे अपघात घडत असतात. बर्‍याच वेळा दुचाकी चालवणारे बहुतांश तरुण पिढीतील मुले शिरस्राण घालत नाहीत. तरुण पिढीमध्‍ये वाढलेली बेफिकीर वृत्ती याला कारणीभूत आहे. त्‍यामुळे या पिढीतील मुलांचे प्रबोधन करण्‍याची आवश्‍यकता आहे. बर्‍याच वेळा दंडाची किंवा शिक्षेची भीती नसल्‍यानेच हे होत असते. त्‍यासाठी नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.

गोव्‍यात प्रतिवर्षी वाहनांचे प्रमाण वाढत आहे. आज सरासरी प्रत्‍येक घरात एक तरी दुचाकी आढळून येते. वाहनांचे वाढते प्रमाण लक्षात घेता येणार्‍या काळात वाहतूक व्‍यवस्‍था सुरळीत होऊन अपघातांचे प्रमाण न्‍यून करण्‍यामध्‍ये सरकार, प्रशासन आणि जनता यांचा सक्रीय सहभाग असणे महत्त्वाचे आहे.

(समाप्‍त)

– श्री. नारायण नाडकर्णी, फोंडा, गोवा. (सप्‍टेंबर २०२४)