गांभीर्याची ऐशीतैशी !

काही दिवसांपासून भंडारा जिल्‍ह्यात पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्‍थिती निर्माण झाल्‍याने शेतकरी हैराण झाले आहेत. जिल्‍ह्यातील काही भागात पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. त्‍यांना हानीभरपाई देण्‍याची मागणी जनतेकडून होत आहे. भंडारा गोंदिया लोकसभेचे काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार प्रशांत पडोळे शेतीची झालेली हानी पहाण्‍यासाठी तुमसर तालुक्‍यात गेले. बोरी गावातील शेताची पहाणी करून परतत असतांना रस्‍त्‍यावर आलेल्‍या पुराच्‍या पाण्‍यात त्‍यांना ‘स्‍टंट’ करण्‍याची हुक्‍की आली. प्रशांत पडोळे हे गाडीच्‍या बोनेटवर बसले. गाडी पाण्‍यात जोरात नेली आणि त्‍याचा व्‍हिडिओ बनवला. विशेष म्‍हणजे पाणी उडाले नाही; म्‍हणून दुसर्‍यांदा पुन्‍हा तशीच कृती करून व्‍हिडिओ बनवण्‍यात आला. खासदारांचा हा व्‍हिडिओ समाजमाध्‍यमांवर प्रसारित झाल्‍यानंतर प्रचंड संताप व्‍यक्‍त केला गेला. त्‍यानंतर खासदारांच्‍या फेसबुकवरून हा व्‍हिडिओ काढण्‍यात आला. पूर पहाणीच्‍या नावाखाली खासदार महाशयांनी चारचाकीच्‍या बोनेटवर बसून स्‍टंट करत बालिशपणाचे आणि गांभीर्याच्‍या घोर अभावाचे दर्शन घडवले. पुरामुळे हानी झालेल्‍या शेतकर्‍यांविषयीच्‍या संवेदना पुराच्‍या पाण्‍यात वाहून गेल्‍या कि काय ? असा प्रश्‍न पडला.

हानीची पहाणी करणे, सखोल अहवाल सिद्ध करणे, पुरामुळे निर्माण झालेल्‍या तात्‍कालिक अडचणींवर तोडगा काढून प्रशासकीय अधिकार्‍यांना उपाययोजनात्‍मक सूचना देणे, पीडितांच्‍या समस्‍या सरकारपर्यंत पोचवणे, पीडित शेतकर्‍यांना मानसिक आधार देणे, आर्थिक, तसेच धान्‍य आणि खाद्यपदार्थ स्‍वरूपात साहाय्‍य करणे आदी अपेक्षित असतांना खासदार महाशय पावसाच्‍या पाण्‍याचे ‘रील्‍स’ (छोटी ध्‍वनीचित्रफीत) बनवत बसले. ‘हे रोम जळत असतांना नीरोप्रमाणे फिडल वाजवणे’, असे झाले. लोकप्रतिनिधींना ‘आपण कुठे आहोत आणि काय करत आहोत ?’ याचे भान अन् गांभीर्य राहिलेले नाही. जनतेच्‍या प्रश्‍नांप्रती त्‍यांची असलेली असंवेदनशीलता यातून दिसली. जनतेने जनतेसाठी निर्माण केलेल्‍या लोकशाही प्रक्रियेतून आपली निवड संसदेत जनतेच्‍या अडीअडचणी  सोडवण्‍यासाठी झाली आहे, याचा खासदारांना पूर्णतः विसर पडलेला दिसतो. एखाद्या बालकाप्रमाणे बालीश कृत्‍य करणारे जनतेच्‍या अपेक्षा पूर्ण कशा करतील ? खासदार पदाची कर्तव्‍ये काय आहेत ? हे जनतेनेच त्‍यांना समजावून द्यायला हवे. ‘शेतकरी अडचणींनी त्रस्‍त आहेत, तर मला काय त्‍याचे ?’, अशा अस्‍सल काँग्रेसी भूमिकेमुळे इतक्‍या संवेदनशील विषयावरील कामगिरीवर गेल्‍यानंतर त्‍यांना ‘रील्‍स’ काढण्‍याचे सुचले. शेतकर्‍यांच्‍या दुःखाशी त्‍यांना काहीच देणे-घेणे नाही, हेच यातून लक्षात आले. प्रासंगिक गांभीर्य आणि अंतर्मुखता न ठेवू शकणारे लोकप्रतिनिधी जनतेच्‍या दुःखावर काय पांघरूण घालतील ? मतदारांनी हे जाणून त्‍यांना त्‍यांची योग्‍यता दाखवून द्यावी !

– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.