‘मी वर्ष १९९६ मध्ये सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागले. तेव्हापासून माझा सौ. विद्या जाखोटिया (भाभी) यांच्याशी संपर्क आला. मी सांगली जिल्हा सोडून अन्य जिल्ह्यांमध्ये अध्यात्मप्रसाराच्या सेवेसाठी गेल्यानंतरही आमचा अधूनमधून संपर्क होत होता. मला त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात झालेले पालट पुढे दिले आहेत.
१. सेवेची तळमळ
१ अ. ‘सर्वांना साधना समजावी’, असा ध्यास असणे : जेव्हापासून त्या साधना करू लागल्या, तेव्हापासून त्यांना ‘सर्वांना साधना कशी सांगता येईल ?’, हा ध्यास असायचा. त्या समाजातील व्यक्तींच्या मानसिकतेचा अभ्यास करून ‘साधना’ हा विषय मांडण्यासाठी सूत्रे काढत असत, जेणेकरून ती सूत्रे ऐकून प्रत्येकाला साधना करावीशी वाटेल.
१ आ. ‘सर्वांना गुरुपौर्णिमेचा आध्यात्मिक लाभ व्हावा’, यासाठी तळमळीने प्रयत्न करणे : ‘गुरुपौर्णिमेचा लाभ १ सहस्र पटींनी होत असतो’, हे सूत्र त्यांच्या मनामध्ये खोलवर रुजले होते. त्यामुळे गुरुपौर्णिमा जवळ आली की, त्या स्वतःच्या आणि जिल्ह्यातील साधक अन् समाजातील व्यक्ती यांच्या सेवेचे नियोजन करण्यासाठी पुष्कळ वेळ देत असत. ‘सर्वांना गुरुपौर्णिमेचा लाभ व्हावा’, अशी त्यांची पुष्कळ तळमळ होती. ती तळमळ त्यांच्या कृतीतून दिसत असे.
२. भाव
२ अ. कृतज्ञताभावात असणे : साधनेत आल्यानंतरही भाभींना पुष्कळ व्यावहारिक अडचणी येत असत; परंतु भाभी त्या अडचणींतून सहज बाहेर पडत असत. याविषयी त्या सतत गुरुदेवांप्रतीच्या कृतज्ञताभावात असत.
२ आ. प्रतिदिन गुरुदेवांना आत्मनिवेदन म्हणून दिवसभरात घडलेले प्रसंग लिहिणे : गुरुदेवांना अपेक्षित अशी साधना होण्यासाठी त्या प्रतिदिन आत्मनिवेदन म्हणून दिवसभरात घडलेले प्रसंग लिहीत असत. त्यातून त्यांना पुष्कळ चांगल्या अनुभूती येत असत. त्या अनुभूती सांगतांना त्यांना पुष्कळ कृतज्ञता वाटत असे. आत्मनिवेदनामध्ये त्या ‘स्वतःतील सूक्ष्म अहंच्या पैलूंचा नाश व्हावा’, अशी प्रार्थना आर्ततेने करत असत, तसेच स्वतःकडून झालेल्या चुकांविषयी क्षमायाचनाही करत असत. त्यामुळे ‘स्वतःमध्ये जे काही पालट होत आहेत, ते केवळ गुरुदेवांना आत्मनिवेदन केल्यामुळे होत आहेत’, असा त्यांचा भाव होता.
३. जाणवलेले पालट
मृत्यूपूर्वी काही मास आमचा भ्रमणभाषवर संपर्क झाला होता. त्या वेळी मला त्यांच्यामध्ये पुढील पालट जाणवले.
अ. त्यांची अनेक गोष्टींविषयीची आसक्ती न्यून झाली होती.
आ. स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीविषयी बोलतांना त्या म्हणाल्या, ‘‘मी साधनेचे प्रयत्न करते, असे नाही. जे काही प्रयत्न चालू आहेत, ते गुरुदेवांच्याच कृपेमुळेच होत आहेत.’’ यातून ‘मी साधना करत आहे’, हा त्यांच्यातील कर्तेपणाही न्यून झाला आहे’, असे मला जाणवले.
इ. भाभी अहं-निर्मूलनाच्या प्रयत्नांविषयी पुष्कळ सतर्क होत्या. मागील काही मासांमध्ये त्यांची सूक्ष्म अहंच्या पैलूंविषयीची सतर्कता वाढलेली होती. कोणताही घरगुती किंवा प्रसारातील सहसाधकांच्या समवेत प्रसंग घडला की, त्या ‘स्वतःच्या मनात कोणकोणते विचार आले ?’, याचे चिंतन करून त्यातील सूक्ष्म अहंचे पैलू शोधत असत. स्वतःच्या मनातील अहंविषयीच्या विचारांच्या संदर्भात त्यांना पुष्कळ खंत वाटत असे. ‘आपला अहं लवकर न्यून व्हायला हवा’, असे त्यांना तीव्रतेने वाटत असे.
‘(कै.) सौ. विद्या जाखोटिया यांच्यातील गुण आम्हा साधकांमध्ये येवोत’, अशी गुरुदेवांच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना !’
– वैद्या सुश्री (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.३.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |