Bangladesh Hindu Minority Seeks Political Representation : बांगलादेशातील हिंदू स्‍वतःच्‍या रक्षणासाठी राजकीय पक्ष स्‍थापन करण्‍याच्‍या सिद्धतेत !

ढाका (बांगलादेश) –  बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्‍चन युनिटी कौन्‍सिल (बी.एच्.बी.सी.ओ.पी.) आणि इतर गट यांच्‍या हिंदु नेत्‍यांनी देशात त्‍यांचा राजकीय पक्ष स्‍थापन करण्‍याचा प्रस्‍ताव मांडला आहे. पक्ष किंवा संसदीय जागा यांची मागणी करण्‍याच्‍या शक्‍यतेवरही हे नेते चर्चा करत आहेत. हिंदू आणि अन्‍य अल्‍पसंख्‍य यांंच्‍या हक्‍कांचे रक्षण करण्‍यासाठी आणि त्‍यांची सुरक्षितता अबाधित राखण्‍यासाठी राजकीय प्रतिनिधित्‍वाचे आवाहनही केले जात आहे.

बी.एच्.बी.सी.ओ.पी.चे अध्‍यक्षीय सदस्‍य काजल देबनाथ यांनी प्रेस ट्रस्‍ट ऑफ इंडिया या वृत्तसंस्‍थेला सांगितले की, बांगलादेशातील हिंदु समूदायामध्‍ये सध्‍या ३ सूत्रांवर चर्चा केली जात आहे. प्रथम वर्ष १९५४ मध्‍ये राबवण्‍यात आलेली निवडणूक प्रणाली पुन्‍हा अस्‍तित्‍वात आणणे, दुसरे हिंदूंसाठी स्‍वतंत्र राजकीय पक्ष स्‍थापन करणे आणि तिसरे अल्‍पसंख्‍यांकांसाठी संसदेत राखीव जागा ठेवणे.

हिंदु समाजाचे नेते रंजन कर्माकर म्‍हणाले की, राजकीय पक्ष स्‍थापनेविषयी चर्चा आणि मतांची देवाणघेवाण आमच्‍या प्राधान्‍यक्रमात आहे. अद्याप काहीही अंतिम झाले नसले, तरी चर्चेतून काय निर्णय होतो, हे आगामी काळात समोर येईल. प्रस्‍तावित राजकीय पक्ष देशात पालट घडवण्‍यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. येथील अल्‍पसंख्‍यांकांचे प्रतिनिधित्‍व आणि त्‍यांच्‍या समस्‍यांचे निराकरण केले जाईल, असेही त्‍यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

राजकीय पक्ष स्‍थापन करण्‍यासह स्‍वसंरक्षण करण्‍यावर आणि संघटित रहाण्‍यावरही हिंदूंनी भर देणे आवश्‍यक आहे !